Sunday, November 26, 2017

श्रवण साधनेमधील अडथळे | Obstacles in Shravan Sadhana



एखाद्या अपरिपक्व साधकाने कर्मानुष्ठान न करता हट्टाने संन्यास ग्रहण केला तर त्याला कधीही ज्ञाननिष्ठा प्राप्त होत नाही.  याउलट श्रावणादि साधनेमध्ये अनेक प्रकारचे प्रतिबंध आणि अडथळे येतात.  प्रतिबंध अनेक प्रकारचे आहेत –

१. मनामध्ये विषयासक्ति आणि विषयभोगवासना असल्यामुळे बाह्य सुंदर व मोहक असणारे विषय कामना निर्माण करून मन बहिर्मुख करतात आणि विषयभोगामध्ये प्रवृत्त करतात.  तो विषयांच्याशिवाय जगू शकत नसल्यामुळे विषयांचा त्याग करणे त्याला अत्यंत कठीण होते.  उलट तो विषयांच्या आकर्षणाला बळी पडतो.

२. एखादे वेळी विषयांच्या मगरमिठीमधून सुटका झाली तरी सुद्धा इंद्रिये अतिशय बलवान आणि प्रबल असतात.  त्यामुळे अनेक वर्षांच्या इंद्रियांना लागलेल्या सवयी सहजासहजी सुटत नाहीत.  इंद्रियांना विषयसुखाची चटक लागलेली असल्यामुळे ती साधकाच्या मनाला अत्यंत व्याकूळ करून विषयाकडे खेचून नेतात.  यामुळे इंद्रियसंयमन आणि मनःसंयमन सुटते आणि साधक पुन्हा विषयभोगामध्ये रममाण होतो.  

३. प्रयत्नाने आणि अभ्यासाने इंद्रियांच्यावर काही प्रमाणामध्ये संयमन केले, तरी त्याच्यामागे असलेल्या मनामधील अनेक प्रकारचे रागद्वेषादि दोष आणि कामक्रोधादि विकार नाहीसे होत नाहीत.  चित्तशुद्धि नसल्यामुळे ते दोष पुन्हा पुन्हा मनामध्ये उफाळून बाहेर येतात आणि मनामध्ये क्षोभ, संताप, विक्षेप निर्माण होतात. मनाची एकाग्रता खंडित होते.  त्यामुळे मन शास्त्रश्रवणामध्ये राहात नाही.  थोडक्यात मनःसंयमन आणि मनोनिग्रह नसल्यामुळे शास्त्राचा गूढार्थ आणि तत्त्वार्थ स्पष्ट, निःसंशय होत नाही.  

४. काही वेळेला मनामध्ये सुप्त असलेले विषयांचे सूक्ष्म संस्कार आणि विषयभोगवासना कोणत्यातरी प्रसंगाच्या निमित्ताने उफाळून बाहेर येतात व मनाला व्याकूळ, अस्वस्थ करून विषयभोगामध्ये प्रवृत्त करतात.  यामुळे साधकामधील विवेकवैराग्यादि गुणांचा ऱ्हास होतो आणि श्रवणाची साधना खंडित होते.  

५. सर्वात शेवटी, मनुष्यामधील अहंकार हा फार मोठा अडथळा आहे.  

  
- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002

           
- हरी ॐ

No comments:

Post a Comment