Tuesday, November 29, 2016

जीवनात कर्माचे प्रयोजन | Role of Karma (Action) in Life


कर्म करावे की न करावे हे मनुष्यावर अवलंबून नाही.  जीवाने स्वकर्तृत्वाने कर्माची निर्मिति केलेली नसून विश्वकर्त्या परमेश्वराने विश्व निर्माण करीत असतानाच सर्व जीवांची उन्नति व्हावी म्हणून कर्म हे साधन दिलेले आहे.  त्यामुळे कर्म हे ईश्वरनिर्मित आहे.  जे ईश्वराने निर्माण केलेले आहे ते कोणीही थांबवू शकत नाही किंवा टाळूही शकत नाही.  म्हणून विश्वामध्ये कर्म हे अटळ आहे.  हा विश्वाचा नियम आहे.

त्यानुसार शरीर धारण केलेल्या प्रत्येक जीवाला सुद्धा हे कर्म अटळ आहे.  फक्त त्या कर्माचा उपयोग कसा करावयाचा, याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला दिलेले आहे.  ज्याप्रमाणे, चाकू एखाद्याचा प्राण घेवू शकेल किंवा तोच चाकू एखाद्याचा जीव वाचवू शकेल.  चाकूने काय करावयाचे व काय करावयाचे नाही, हे चाकू ठरवीत नसून ज्याच्या हातामध्ये चाकू असतो त्या मनुष्याच्या मनामधील संकल्प ठरवितो.  त्याचप्रमाणे कर्माचा योग्य रीतीने सदुपयोग केला तर ते कर्म जीवनामध्ये सुसंगति आणि उत्कर्षाचे साधन होईल.

थोडक्यात कर्म करण्याचे स्वातंत्र्य जरी मनुष्याला असले तरीही कर्म करावे की न करावे याचे स्वातंत्र्य त्याला नाही, कारण कर्म हे ईश्वरनिर्मित असल्यामुळे ती ईश्वराज्ञा आहे.  जिज्ञासु मोक्षार्थी मनुष्याने कर्मफळाची अपेक्षा न करता वेदप्रतिपादित विहित कर्म ईश्वरार्पणबुद्धीने, सेवावृत्तीने करून जीवन जगावे.  यामुळे परमेश्वराची कृपा प्राप्त होवून त्याचे अंतःकरण शुद्ध, निर्मळ होईल आणि तो साधनचतुष्टयसंपन्न होवून आत्मज्ञानप्राप्तीसाठी अधिकारी होईल.  क्रमाने गुरूंच्या कृपेने ज्ञानप्राप्ति होवून मोक्षप्राप्ति होईल.


- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ

No comments:

Post a Comment