Monday, November 21, 2016

मूढ व दुष्टांचा नाश | Fools and Wicked are Destroyed


श्रद्धावान, असूयारहित साधकांच्या विपरीत असलेले जे अविवेकी, अहंकारी, दुष्ट बुद्धीचे अविद्वान लोक अहंकारामुळे परमेश्वराचा आदेश मानीत नाहीत.  त्यांची बुद्धि असूयेने आणि अहंकाराने प्रवृत्त झालेली असल्यामुळे सर्वगुणसंपन्न, कर्तुं-अकर्तुं परमेश्वराची सत्ता मानायला तयार होत नाही.  परमेश्वराचा आदेश हा प्रमाणभूत न मानता स्वबुद्धीला प्रमाण मानून मीच कर्तुं-अकर्तुं आहे, या भावाने अहंकाराने प्रेरित होवून मन मानेल त्याप्रमाणे कर्मामध्ये प्रवृत्त होतात.

ते असुरी संपत्तीने युक्त असलेले वेदप्रतिपादित कार्मानुष्ठान न करण्यातच सुख मानणारे आणि खावे, प्यावे, मजा करावी अशा प्रकारच्या तमोगुणप्रधान कर्मामध्येच रममाण होणारे विपरीत बुद्धीचे लोक नष्ट होतात.  म्हणजेच पुण्यलोक असणाऱ्या मनुष्यलोकापासून च्युत होतात.  मनुष्य देह धारण करूनही ते पशुतूल्य जीवन जगतात.

जे दुराग्रही लोक माझ्या मताचे म्हणजेच निष्काम कर्मयोगाचे अनुसरण न करता कर्मफलाच्या इच्छेने स्वउपभोगासाठीच कर्मप्रवृत्त होतात ते निश्चितपणे हळूहळू नाश पावतात, कारण कर्मफलाच्या अपेक्षेमुळे स्वतःच्या कर्तृत्वानेच ते कामक्रोधादि विकार निर्माण करतात.  यामुळे त्यांचे मन अत्यंत अशुद्ध, अस्वस्थ, क्षुब्ध होवून त्यांचे जीवन असह्य होते.

थोडक्यात परमेश्वरावर श्रद्धा असूनही कामुकतेने प्रेरित झाल्यामुळे त्यांना आयुष्यामध्ये चित्ताची शुद्धि आणि निर्मळता प्राप्त होत नाही.  तसेच, सद्गुणांची जोपासना होत नाही आणि आंतरिक सुख, शांति प्राप्त होत नाही.  उलट त्यांचे जीवन दुःख आणि यातनेनेच भरलेले असते.  हाच मनुष्याचा नाश होय.


- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ

No comments:

Post a Comment