Tuesday, November 8, 2016

परमेश्वर अवतार का घेतो ? | Why God Incarnates ?सर्व वर्णाश्रमादि प्राणिमात्रांच्या अभ्युदयासाठी आणि निःश्रेयसप्राप्तीसाठी धर्म हेच साधन आहे.  त्याच्या सम्यक अनुष्ठानाने मनुष्याच्या ऐहिक आणि पारलौकिक इच्छा पूर्ण होऊन समृद्धी, भरभराट व स्वर्गप्राप्ति होते.  तसेच तोच धर्म निष्काम वृत्तीने अनुसरण केल्यास चित्तशुद्धीद्वारा मोक्षप्राप्तीचे साहाय्यकारी साधन होतो.  अशा प्रकारच्या प्रवृत्ति आणि निवृत्ति लक्षणांनी युक्त असलेला धर्म नाश पावतो.  म्हणजेच त्याचे अनुसरण करणारे लोक समाजामध्ये कमी होतात.  त्यामुळे त्याचा प्रभाव कमी झाल्यासारखा दिसतो.

याचे कारण अर्थ आणि कामाने प्रेरित झालेले, राजोतमोगुणांनी युक्त असलेले, असुरीसंपत्तीने  युक्त असलेले असुरी वृत्तीचे भोगवादी कामांध लोक त्यांच्या शस्त्रास्त्रांच्या धाकाने आणि सत्तेच्या सामर्थ्याने व स्वबलाने धर्माचरण करणाऱ्या लोकांना अनेक प्रकारचा त्रास, पीडा देतात.  धर्माचरणामध्ये विघ्ने आणून सर्वत्र दशहतीचे आणि भीतीचे वातावरण निर्माण करतात.  सर्वसामान्य धार्मिक लोकांचे जीवन विस्कळीत करतात.  त्यांना धर्माने आणि सदाचाराने जगू देत नाहीत आणि बळजबरीने धर्माचरणापासून निवृत्त करून अधर्मामध्ये प्रवृत्त करतात.  यामुळे समाजात गोंधळ निर्माण होऊन असुरी प्रवृत्तीच्या आचारामुळे धर्माचरण व धर्मानुष्ठान करणाऱ्यांची संख्या कमी होते.  यामुळे वैदिक धर्माचा ऱ्हास होतो आणि अधर्माचा उत्कर्ष होतो.

सर्व वर्णाश्रमामध्ये कर्तव्याचा त्याग झाल्यामुळे, भोगवासना प्रबल झाल्यामुळे समाजामध्ये हिंसाचार वगैरे वाढतो आणि पर्यायाने समाजाचे, कुटुंबाचे आणि व्यक्तीचे अधःपतन होते.  लोकांच्या जीवनावर धर्माचे असलेले नियमन नाहीसे होते.  थोडक्यात सर्व समाजामध्ये धर्माचे अनुष्ठान कमी होऊन अधर्माचा उत्कर्ष होतो.  अशा वेळी धर्माचे अनुसरण करणाऱ्या धार्मिक लोकांच्यावर अनुग्रह करण्यासाठी व अधार्मिक हिंसाचारी लोकांचा नाश करण्यासाठी, तसेच त्यांचे नियमन करण्यासाठी मी - परमेश्वर कालानुरूप माझ्या योगमायेच्या साहाय्याने अनुरूप देह धारण करतो.  अवतार घेतो.


- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002
- हरी ॐ

No comments:

Post a Comment