परमेश्वराचा
अवतार कोणत्या स्वरूपाचा आहे ? तो
पारमार्थिक आहे का ? कधीच नाही, कारण परमेश्वराची
उपाधी मायिक असल्यामुळे अवतारकार्य सुद्धा मायिकच आहे. स्वप्नाप्रमाणे परमेश्वर मायेमधून विश्वरचना
करून अनेक प्रकारचे जीव निर्माण करतो. अशा
मायिक भासात्मक विश्वामध्ये तो माया – उपाधी निर्माण करतो आणि कार्य करतो. परंतु हा अवतार आणि कार्य स्वप्नाप्रमाणे काल्पनिक,
भासात्मक, मायिकच आहे. तो एक केवळ भास आहे.
सर्व
जीव अवताराचे खरे स्वरूप न समजता उपाधीला सत्यत्व देतात. त्यामुळे त्यांना अवतार आणि अवतार कार्य सत्य
वाटते. परंतु प्रत्यक्षात मात्र भगवान
कधीही आला नाही आणि गेलाही नाही. त्याने
काही कार्यही केलेले नाही. हेच पारमार्थिक
सत्य आहे. जे दिसते ते सर्व मायिक
आहे. न
जायते म्रियते वा कदाचित् | या वचनाप्रमाणे त्याला जन्म
नाही किंवा मृत्यु नाही.
मग
अवताराला कोणती सत्ता आहे ? रज्जुसर्पवत् | रज्जूवर सर्पाचा भास होतो त्याप्रमाणे ! सर्पाला कोणतीही व्यावहारिक सत्ता नसून
काल्पनिक, भासात्मक सत्ता आहे, कारण सर्पाची निर्मिति काल्पनिक आहे.
याप्रमाणे
भगवंताचा अवतार व्यावहारिक आणि पारमार्थिक नाही. तर सर्पाप्रमाणे प्रातिभासिक आहे. म्हणून येथे आत्ममायया
संभवामि | म्हटले आहे. किंवा - संभवामि देहवान् इव भवामि | या विधानामध्ये आचार्यांनी
‘इव’ हा शब्द योजला आहे. जणु काही मी
देहावान झाल्यासारखा भासवितो. परंतु परमेश्वर
स्वतः मात्र निर्गुण, निराकार आहे हेच भगवंताच्या अवताराचे रहस्य आहे.
- "श्रीमद्
भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द
सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, डिसेंबर २००२
- Reference: "Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, December 2002
- Reference: "Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, December 2002
-
हरी ॐ –
No comments:
Post a Comment