Tuesday, April 26, 2016

आत्मज्ञान आणि सिद्धि | Self-Realization & Supernatural Powers


ज्ञानी पुरुषाचा संकल्प हा अत्यंत शुद्ध असतो.  शास्त्रकार सुंदर दृष्टांत देतात – दोरखंडाला असणाऱ्या घट्ट पिळ्याप्रमाणे अज्ञानी पुरुषाच्या कामना आहेत.  परंतु तोच दोरखंड जाळला तर जाळल्यानंतर सुद्धा पीळ दिसतात.  परंतु त्या पिळ्यांच्यामध्ये काहीही तथ्य राहत नाही.  त्याचप्रमाणे, ज्ञानी पुरुषाच्या कामना वर वर जरी दिसल्या, तरी त्या केवळ संकल्पमात्र आहेत.  त्यामध्ये कर्तृत्व, भोक्तृत्व, कामुकता, स्वार्थ, भोगवृत्ति यांचा अत्यंत अभाव आहे.  त्या कामना केवळ स्वतःसाठी नसून अन्य लोकांच्यासाठी, लोककल्याणासाठी आहेत.

त्याचे मन अत्यंत शुद्ध झालेले आहे.  पूर्ण शुद्ध अंतःकरण हे हिरण्यगर्भाचे लक्षण आहे.  हिरण्यगर्भ म्हणजेच समष्टि अंतःकरण होय.  म्हणून अंतःकरण अत्यंत शुद्ध होणे, म्हणजेच हिरण्यगर्भावस्था प्राप्त होणे होय.  त्याचे अंतःकरण समष्टि अंतःकरणाशी एकरूप होते.  म्हणूनच त्याने संकल्प करावा आणि तो पूर्ण व्हावा.  त्याला सर्व प्रकारच्या अणिमादि सिद्धि, वाक् सिद्धि, संकल्पसिद्धि प्राप्त होतात.  म्हणूनच तो – सत्यसंकल्पवान् भवति |

ज्ञानी पुरुष या सिद्धींचा उपयोग स्वतःसाठी किंवा दुसऱ्यांसाठी करतो.  म्हणून ज्या जीवांना ऐश्वर्याची, धन-धान्य-पुत्र-पौत्रादि ऐहिक कामना, तसेच स्वर्गादि कामना असतील, तर त्यांनी आत्मज्ञानी पुरुषाचीच पूजा करावी.  पादप्रक्षालन, पाद्यपूजा करावी.  शुश्रुषा म्हणजेच त्याची सेवा करावी.  त्याला अनन्य भावाने नतमस्तक व्हावे, कारण या संपूर्ण विश्वामध्ये आत्मज्ञानी पुरूषच सर्वश्रेष्ठ असून पूजनीय व वंदनीय आहे.

आत्मज्ञानी पुरुषाला जरी सर्व सिद्धि असतील, तरी सर्वच ज्ञानी पुरुष या सिद्धींचा उपयोग करीत नाहीत.  काही पुरुष हिरण्यगर्भावस्था प्राप्त केल्यानंतर दुर्दैवाने सिद्धींच्या आकार्षणामध्ये, प्रसिद्धीमध्ये, ऐश्वर्यामध्येच बद्ध होतात.  परंतु खरा ज्ञानी पुरुष कधीही सिद्धींच्या आकर्षणाला बळी पडत नाही.



- "मुण्डकोपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, ार्च २००७  
- Reference: "
Mundakopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, March 2007



- हरी ॐ

Tuesday, April 19, 2016

अविद्यारूपी बालके | Ignorant Babies


मूढ लोकं अविद्येमध्येच अनेक प्रकाराने रममाण होतात. ते स्वतःलाच कृतार्थ मानतात.  “ आम्ही आमच्या जीवनाचे प्रयोजन, इतिकर्तव्य पूर्ण केलेले आहे ”,  असा ते अभिमान निर्माण करतात.  ती सर्व लहान बाळे आहेत.  लहान मुले ज्याप्रमाणे स्वतःच्या कल्पनाविलासामध्येच रममाण होतात.  स्वतःला हुशार समजतात. पण ते खऱ्या अर्थाने अज्ञानी, अजाण असतात.  त्याचप्रमाणे संसाराला इतिकर्तव्य मानणारे, महान गृहस्थाश्रमी लोक सुद्धा लहान बालकेच आहेत.

याचे कारण त्यांना असे वाटते की, व्यावहारिक असणारी कर्तव्ये पूर्ण केली की, आपण कृतार्थ, परिपूर्ण झालो.  कनक-कांचन-कामिनी यामध्येच इतिकर्तव्यता मानणारे, कर्म-कर्मफळाच्या विषयामध्ये आसक्त झालेले असे हे अज्ञानी लोक तत्त्वस्वरूप जाणत नाहीत.  त्यामुळे ते अत्यंत दुःखी, कष्टी, निराश आणि हताश होतात.

स्वयंभू ब्रह्माजीने जन्मतःच सर्व इंद्रिये बहिर्मुख करून जणु काही नाश केलेला आहे.  आपली सर्व इंद्रिये ही स्वभावतःच बहिर्मुख आहेत.  त्यामुळे सर्व जीव बाह्यविषयांनाच पाहतात. स्वस्वरूपाला मात्र जाणत नाहीत.  दुर्दैवाने सर्वच जीव अज्ञानाने आवृत्त होतात. स्वतःविषयीच्या, विषयांबद्दलच्या, अन्य व्यक्तींबद्दलच्या कल्पने करतात आणि त्याच कल्पनाविश्वामध्ये जीवनभर वावरतात.  इतकेच नव्हे, तर त्याच कल्पना, अपेक्षा, महत्वाकांक्षा पूर्ण करण्याचा रात्रंदिवस प्रयत्न करतात.  लोकरूढीप्रमाणे भोगमय, स्वैर, उच्छृंखल, वैषयिक जीवन जगतात. त्यांनाच याठिकाणी ‘बालाः’ असे म्हटले आहे.

जशी लहान मुले क्रीडेमध्ये, खेळामध्येच रममाण होतात, तसेच हे सर्व जीव बाह्य प्रवृत्तीमध्येच रममाण झालेले असतात.  कर्मफळाचा क्षय झाला की, कर्मकर्मफळाच्या नियमाप्रमाणे ते मर्त्य लोकामाध्येच किंवा त्याहीपेक्षा नीच, निकृष्ट योनीमध्ये, तिर्यक् योनीमध्ये प्रवेश करतात.


- "मुण्डकोपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, ार्च २००७  
- Reference: "
Mundakopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, March 2007



- हरी ॐ

Tuesday, April 12, 2016

ब्रह्मविद्येची परंपरा | Transition of Supreme Knowledge


जी विद्या ब्रह्माजीकडून अथर्वाकडे आली, ती विद्या अङ्गिराला देत असताना अथर्वाने जी विद्या घेतली होती, तीच विद्या आपल्या शिष्याला प्रदान केली.  म्हणजेच ब्रह्मविद्येमध्ये आपले स्वतःचे मत, स्वतःच्या कल्पना, स्वतःचे ज्ञान, स्वतःचे राग आणि द्वेष, बुद्धीच्या मर्यादा येऊ शकत नाहीत.  नाहीतर गुरूंनी शिकविले एक आणि आपण दुसऱ्यांना शिकवीत असताना जर स्वतःच्या कल्पना, स्वतःची मते सांगितली तर ते ज्ञान यथार्थ होऊ शकत नाही.

म्हणून या संप्रदायामध्ये सर्वांनीच अध्ययन केले, तरी सर्वचजण ही विद्या दुसऱ्याला प्रदान करू शकत नाहीत.  जी विद्या घेतली आहे, ती तशीच्या तशी म्हणजेच त्या विद्येमध्ये स्वतःची भर न घालता किंवा जे ज्ञान घेतले आहे, त्यामधील काहीही न वगळता प्रदान करणे आवश्यक आहे.  मला जेवढे आवडले, तेवढेच सांगणे आणि जे पटले नाही, समजले नाही, तो भाग गाळणे हा फार मोठा दोष आहे.

व्यवहारामध्ये आपले ज्ञान दुसऱ्याला दिले तर माझे महत्त्व कमी होईल, अशी भीति वाटते.  म्हणून कोणत्याही क्षेत्रामध्ये सर्वजण माहितीवजा ज्ञान देतात, परंतु रहस्य मात्र स्वतःजवळ राखून ठेवतात.  आपले ज्ञान दुसऱ्याला सहजासहजी देत नाहीत.  ब्रह्मविद्या मात्र जेवढी गुरूंच्याकडून घेतली, तेवढी पूर्णतः आपल्या शिष्याला प्रदान केली जाते. हेच खरे ज्ञान होय.

ब्रह्मविद्येमध्ये कधीही तडजोड करता येत नाही.  जशी घेतली आहे, तशीच संपूर्ण विद्या दिली पाहिजे. म्हणून विद्या कधी हातची राखून देता येत नाही.  ज्या वेळी मी माझ्या गुरूंच्याकडून ज्ञान प्राप्त करेन, ते स्वतःजवळच न ठेवता, दुसऱ्यांना प्रदान करावे की, ज्यामुळे हा संप्रदाय, ही परंपरा अखंडपणाने चालू राहू शकेल.


- "मुण्डकोपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, ार्च २००७  
- Reference: "
Mundakopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, March 2007



- हरी ॐ

Thursday, April 7, 2016

गुढीपाडवा दुर्मुख संवत्सर (Gudhipadwa - Shree Shalivahan New Year 1938)

गुढीपाडवा 
 श्रीशालिवाहन शके १९३८
दुर्मुख नाम संवत्सर आरंभ

चैत्रे मासि जगद् ब्रह्मा ससर्ज प्रथमे S हनी |
शुक्लपक्षे समग्रे तु तदा सूर्योद्ये सति ||

      गुढीपाडवा म्हणजे नवीन संवत्सराचा आरंभ ! साडेतीन मुहूर्ताच्यापैकी एक महत्वाचा पूर्ण मुहूर्त ! हाच सृष्टीच्या निर्मितीचा दिवस ! सृष्टीचा वर्धापन दिन ! ब्रह्माजीने याच दिवशी सृष्टीच्या निर्मितीस प्रारंभ केला. याच दिवशी सत्ययुगाचा प्रारंभ झाला.

      श्रीगणेशयामल तंत्रशास्त्रामध्ये गुढीपाडव्याचे महत्व स्पष्ट केलेले आहे. २७ नक्षत्रांच्यापासून २७ लहरी निर्माण होत असतात. त्या २७ लहरींच्यापैकी प्रजापति लहरी, यमलहरी व सूर्यलहरी या तीन लहरी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. या तीन लहरींचा संपूर्ण सृष्टीवर व सर्व प्राणिमात्रांच्यावर परिणाम होत असतो. प्रजापति लहरींच्यामुळे अंकुरांच्या निर्मितीसाठी जमिनीची क्षमता वाढते. विहिरींना नवीन पाझर फुटतात. बुद्धीची प्रगल्भता वाढते व शरीरामध्ये कफ प्रकोप निर्माण होतो. यानंतर यमलहरींच्यामुळे पाऊस पडतो. बीजांना नवीन अंकुर फुटतात व शरीरामध्ये वायूचा प्रकोप निर्माण होतो. तसेच, सूर्यलहरींच्यामुळे जमिनीची उष्णता वाढते. त्यामुळे जमिनीची उत्पादन क्षमता कमी होते आणि शरीरामध्ये पित्त प्रकोप निर्माण होतो.

      याप्रमाणे प्रजापति, यम व सूर्य या तीन्हीही लहरींचे योग्य आणि उपयुक्त प्रमाणात एकत्रीकरण गुढीपाडव्याच्या दिवशी होत असते. यामुळे गुढीपाडव्याला विशेष महत्व आहे. या दिवशी सृष्टीच्या निर्मितीचा आनंद व्यक्त करण्यासाठी गुढी उभारली जाते व सृष्टीकर्त्या ब्रह्माजीचे पूजन केले जाते.पोकळ वेळूच्या काठीला भरजरी खण, नवीन वस्त्र लावून त्यावर तांब्याचा किंवा चांदीचा कलश उलटा ठेवला जातो. गुढीला कडुनिंबाचे, आंब्याचे डहाळे लावले जातात. अशी गुढी घरोघरी गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी अभ्यंग स्नान करून, घराच्या उंबऱ्याच्या बाहेर, उजवीकडे जमिनीवर स्वस्तिक रेखून सूर्योदयाच्या वेळी उभारली जाते. गुढीला 'ब्रह्मध्वज' असेही म्हणतात.

                सूर्योदयाला गुढी उभारल्यानंतर प्रजापति तत्व वेगाने तांब्याच्या कलशामध्ये व वेळूच्या काठी मध्ये येते. सूर्यास्ताच्या वेळी प्रजापति लहरी संपतात. तेव्हा ब्रह्मदेवाची पूजा करून -'ब्रह्मध्वजाय नम:|' असे म्हणून नमस्कार करून गुढी उतरविली जाते. गुढी आत आणल्यानंतर कलशामधील प्रजापति लहरी घरामध्ये प्रवेश करतात. यामुळे घरामध्ये सुख, शांति, ऐश्वर्य, आरोग्य नांदते. त्यादिवशी घराच्या दाराला लावलेले आम्रपानांचे तोरण हे मंगलसूचक आहे. 

      गुढीपाडव्याच्या दिवशी कडूनिंबाची पाने, फुले, गुळ, साखर, ओवा, चिंच, मिरे, हिंग हे पदार्थ एकत्र करून भक्षण केले जातात. यामुळे शरीरामधील कफ-वात-पित्त यांचा प्रकोप नाहीसा होऊन ते संतुलित होतात. त्यामुळे रक्तशुद्धी होऊन शारीरिक स्वास्थ्य प्राप्त होते. कडूनिंब-गुळ-चिंच वगैरे पदार्थांचे आंबट-गोड-कडू असे भिन्न-भिन्न स्वाद आहेत. याप्रमाणेच आपले जीवन म्हणजे सुख-दु:खादि अशा अनेक प्रसंगांचे मिश्रण असून त्यामध्ये मनाची समतोल वृत्ति ठेवावी, हाच संदेश मिळतो.

      गुढीपाडव्याच्या दिवशी पंचांगामधील संवत्सरफल जरूर वाचावे. त्यामध्ये ब्रम्हदेवाची सृष्टि, ब्रह्मदेवाचे आयुष्य व त्याप्रमाणे कालगणनेचे वर्णन केलेले असून या संवत्सराचे फल लिहीलेले असते. ते वाचल्यामुळे मनुष्याला समष्टीची, सृष्टीची व अव्याहत अखंड, प्रचंड मोठया कालचक्राची जाणीव होते. त्यामुळे मनुष्यामधील 'मी कोणीतरी फार मोठा आहे,' हा अंहकार कमी होऊन ईश्वराच्या अद्भुत निर्मितीच्या सत्तेच्या पुढे त्याचे मन नम्र, विनयशील होते.

      गुढी ही दैवी शक्तीचे प्रतीक आहे. त्यामधील कलश हे पूर्णतेचे प्रतीक आहे. गुढीमधून व्यष्टि व समष्टि म्हणजेच विश्व व जीव यांचा संबंध तसेच, सृष्टीच्या विराट स्वरुपाची व अद्भुत शक्तीची, ऊर्जेची संकल्पना केलेली आहे.

      गुढीपाडव्यापासून वसंत ऋतूला प्रारंभ होतो. अंकुरांना नवीन पालवी फुटतात. निसर्गामध्ये नवचैतन्य निर्माण होते. सृष्टीमधील नवचैतन्य मनुष्याच्या मनामध्ये प्रविष्ट होते. मनुष्याच्या जीवनामध्ये नवीन स्फूर्ति, चेतना, प्रेरणा, आत्मविश्वास, उत्साह, धैर्य निर्माण होते. मनुष्य हाच सृष्टीचा प्रमुख घटक असल्यामुळे मनुष्यामध्ये स्फूर्ति निर्माण झाली की, आपोआपच सृष्टि बदलते मनुष्याचे कुटुंब बदलते, समाज बदलतो. राष्ट्र, विश्व सर्वांच्यामध्येच नवचैतन्य निर्माण होते. म्हणूनच गुढीपाडवा हा उत्सव विजय व आनंदाचे प्रतीक असून कोणत्याही नवीन कार्याला या दिवसापासुनच प्रारंभ केला जातो.

      म्हणूनच मानवी जीवन भव्य, दिव्य, उदात्त व परिपूर्ण करणाऱ्या आर्य सनातन वैदिक हिंदु धर्माचा अत्यंत महत्वपूर्ण दिवस आहे गुढीपाडवा !

      यावरून लक्षात येते की,

सृष्टीची निर्मिती म्हणजे केवळ योगायोग नसून त्यामागे निश्चित नियोजन आहे. व आपल्या हिंदू संस्कृतीमधील प्रत्येक सण, परंपरा या महत्वपूर्ण, अर्थपूर्ण असून त्यामागे वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. 



परमपूज्य माताजी स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वतीगुढीपाडवा २०१६ श्रुतिसागर आश्रम

Tuesday, April 5, 2016

अज्ञानी जीवांचे जीवन चरित्र | Biography of Ignorant Beings



अविद्यायामन्तरे वर्तमानाः स्वयं धीराः पण्डितं मन्यमानाः |
जङ्घन्यमानाः परियन्ति मूढा अन्धेनैव नीयमाना यथाsन्धाः || (मुण्ड. उप. १-२-८)   
जोपर्यंत आपण अंधारामध्ये राहतो, अंधारामध्येच रममाण होतो, त्यावेळी आपली बुद्धि त्या अंधाराने आवृत्त होते. आपण आपल्याच मनाच्या कल्पनाविलासमध्ये जोपर्यंत जगतो, त्याच्या बाहेर येता येत नाही, तोपर्यंत कधीही मनुष्याची प्रगति होऊ शकत नाही.

याठिकाणी भाष्यकार विचारप्रवृत्त करतात – “ पशुपक्षी सुद्धा जगतात. कुत्री सुद्धा जन्माला येते, पिलावळ जन्माला घालते आणि मारून जाते.  मग मनुष्य आणि पशू यात फरक काय ?  राहणीमान, जीवनमान यामध्ये थोडाफार बदल असेल, परंतु अर्थ आणि कामाने प्ररित होऊन, हजारो, लाखो कामना निर्माण करून त्या पूर्ण करणे, त्याच्यासाठी एक नव्हे, हजारो-लाखो जन्म व्यर्थ घालविणे, हे खरोखरच योग्य आहे का ? ”  हा विचारही मनुष्याच्या मनाला शिवत नाही.  जसे, बैल घाण्याला जुंपल्यानंतर त्याला फिरत राहणे एवढेच माहीत आहे.  त्याच्या जीवनाला कोणतेही साध्य नाही, दिशा नाही.

तसेच आपण फक्त परिभ्रमण करतोय.  एक जन्म नव्हे, जन्मानुजन्मे सकाळी उठायचे, नंतर दिवसातून आठ-बारा-आठ वाजता खायचे, काहीतरी काहीतरी व्यर्थ वेळ घालवायचा, विषय आणि भोग यांचे वैषयिक जीवन जगायचे आणि दिवस मावळला की झोपायचे.  पुन्हा दुसऱ्या दिवशी उठायचे.  आचार्य वर्णन करतात -
बालस्तावत् क्रिडासक्तः तरुणस्तावत् तरुणीसक्तः |
वृद्धस्तावत् चिन्तासक्तः परमे ब्रह्मणि कोsपि न सक्तः ||  (भज गोविन्दम्)  
लहान मूल खेळामध्ये, तरुण युवक इंद्रियभोगांच्यामध्ये आणि वृद्ध लोक चिंतेमाध्येच रममाण होतात.  परंतु कोणीही परब्रह्मस्वरूपामध्ये आसक्त होत नाही.  हेच आपले जीवन चरित्र आहे.


- "मुण्डकोपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, ार्च २००७  
- Reference: "
Mundakopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, March 2007


- हरी ॐ