श्री
दक्षिणामूर्ति हे श्रुतिसागर आश्रमाचे आराध्य दैवत ! श्री दक्षिणामूर्ति म्हणजेच गुरुस्वरूपामधील
शंकराचा अवतार होय. दक्षिणा म्हणजेच
सुंदर होय. गुरुस्वरूपामधील शंकराची ही
मूर्ति अत्यंत सुंदर असल्यामुळे हिला ‘श्रीदक्षिणामूर्ति’ असे म्हणतात.
किंवा
या मूर्तीचे मुख दक्षिणेकडे असल्यामुळेही हिला ‘श्रीदक्षिणामूर्ति’ असे म्हणतात. दक्षिण दिशा ही मृत्यूची, अज्ञानाची दिशा आहे. साहजिकच दक्षिणामूर्तीकडे जे शिष्य, साधक येतील
त्यांचे मुख उत्तरेकडे होते. म्हणजेच श्रीदक्षिणामूर्ति
शरण येणाऱ्या आपल्या शिष्यांच्या अंतःकरणामधील आत्मअज्ञानाचा ध्वंस करून त्यांना
आत्मज्ञान प्रदान करतात आणि जन्ममृत्युरूपी संसारामधून मुक्त करतात.
श्रीदक्षिणामूर्तीचे
मौन हेच व्याख्यान आहे. मौन म्हणजेच शांतस्वरूप होय. ते स्वतःच मौनस्वरूप असून मौनस्वरूप आत्म्याचा
उपदेश शिष्यांना देतात व शिष्य सुद्धा स्वतःच मौनस्वरूप, शांतस्वरूप,
परब्रह्मस्वरूप होतात.
श्रीदक्षिणामूर्तीस
चार हात असून त्यामध्ये चार मुद्रा धारण केलेल्या आहेत. वरील उजव्या हातातील रुद्राक्षमाळेच्या
साहाय्याने प्रत्येक साधकाने ‘जपसाधना’ करावी हे सूचित केलेले आहे. वरील डाव्या हातातील सर्प जीवाच्या अंतःकरणामधील
भोगवासनांचे प्रतीक असून साधकाने कामना हळुहळू कमी कराव्यात हे सूचित
केलेले आहे. खालील डाव्या हातातील योगदंड योगसाधना,
ध्यान वगैरेदि अंतरंग साधना करावी हे सुचवितो. तर खालील उजवा हात
ज्ञानमुद्रेमध्ये असून त्यामधून जीवब्रह्म्यैक ज्ञान प्रतिपादित केलेले
आहे.
श्रीदक्षिणामूर्तीच्या
चरणाखाली जन्ममृत्यूयुक्त संसाररुपी सर्पाच्या विळख्यामध्ये बद्ध असणारा जीव
म्हणजेच अहंकार होय. श्रीदक्षिणामूर्ति आपल्या
शिष्यांच्या अहंकाराचा पूर्णपणे नाश करतात, हे यामधून सूचित केलेले आहे. श्रुतिसागर आश्रमामध्ये अत्यंत दुर्मिळ अशी
श्रीज्ञानदक्षिणामूर्ति सर्व शिष्यांना अखंडपणे आत्मज्ञान प्रदान करीत विराजमान
झालेली आहे.
- "सत्संग" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द
सरस्वती लिखित पुस्तकामधून, चतुर्थ आवृत्ति,
२००१
- Reference: "Satsang" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 4th Edition, 2001
- Reference: "Satsang" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 4th Edition, 2001
-
हरी ॐ –
No comments:
Post a Comment