Friday, May 1, 2015

आस्तिक आणि नास्तिक | Believer and Non-Believer


सामान्यतः व्यवहारात ईश्वराचे अस्तित्व मानणारा तो आस्तिक आणि ईश्वराचे अस्तित्व न मानणारा तो नास्तिक असा समज आहे.  पण फक्त ईश्वर आहे किंवा नाही यावर श्रद्धेचा निकष होत नाही.  

जगात धर्म-अधर्म, न्याय-अन्याय, चांगले-वाईट असे काहीच नाही.  विश्वाचा कोणी निर्माता नाही.  थोडक्यात जीवनमूल्ये नाहीत, असे समजून स्वार्थी वृत्तीने ‘यावत् जीवं सुखं जीवेत् णं कृत्वा घृतं पिबेत् |’  म्हणजे ‘जीव असेपर्यंत सुखाने जगावे.  ऋण काढून सुद्धा तूप प्यावे’ या वृत्तीने जीवन जगणारा, ‘खाओ, पीओ, मजा करो’ अशी भूमिका असलेला तो नास्तिक.  आपण आणि आपल्यासमोरील जग, त्यातील सुखोपभोग एवढाच विचार करून विषयोपभोगाने जास्तीत जास्त सुख मिळवू पाहाणारा तो नास्तिक.  त्याला स्वैर, स्वच्छंद वर्तनाची, अनाचाराची चाड नसते.

याउलट, जीवनमूल्यांवर श्रद्धा ठेऊन सद्गुणांची जोपासना करीत सारासार विचाराने संयमित व शिस्तबद्ध जीवन जगणारा जो असतो तो आस्तिक.  मग तो ईश्वराचे अस्तित्व मानीत नसेल तरी तो आस्तिकच, कारण जीवनात न्याय-अन्याय, धर्म-अधर्म, योग्य-अयोग्य, नीति-अनीति असे काही आहे, जीवनमूल्ये आहेत, अशी त्याची श्रद्धा असते. ‘अस्ति इति बुद्धिः यस्य सः आस्तिकः |’ या न्यायाने निरीश्वरवादी पण जीवनमूल्ये जपणारा आस्तिक ठरतो.  ईश्वरावर श्रद्धा नसलेला मनुष्य पूजा-अर्चा, जपजाप्य, व्रत-वैकल्ये करणार नाही; पण आचार-विचार-उच्चार या बाबतीत तो शुद्ध असेल तर तो विवेक-वैराग्य-शमदमादि साधनसंपत्तीने युक्त होईल.

मनुष्याची स्वाभाविक ओढ अंतिम सुखाकडे (Absolute Happiness) असते.  सुखाची गुरुकिल्ली म्हणजे जीवनावर, जीवनमूल्यांच्यावर निष्ठा.  ईश्वरावर निष्ठा नसलेला, जपजाप्य, पूजा-अर्चा, व्रत-वैकल्ये करीत नसला, तरी दैवी गुण बाणविण्याचे प्रयत्न करीत तो निर्मळ जीवन जगत, आचार-विचार-उच्चार शुद्ध ठेवीत असेल तरी तोही आत्मानुभूतीच्या पायरीपर्यंत पोहोचला आहे असे समजायला हरकत नाही.


- "सत्संग" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, चतुर्थ आवृत्ति, २००१
- Reference: "
Satsang" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 4th Edition, 2001



- हरी ॐ

No comments:

Post a Comment