नाममंत्र
देणारा किंवा मंत्रदीक्षा देणारा एखादा गुरु न मिळाल्यामुळे जर एखादा साधक आपल्या
बुद्धीनुसार आपल्या इष्टदेवतेच्या नावाचा जप करीत राहिला किंवा एखाद्या मंत्राचा
जप करीत राहिला तर त्याचा तो जप वाया जाणार नाही. जोपर्यंत साधकाला गुरुप्राप्ति होत नाही
तोपर्यंत साधक श्रद्धेने ईश्वराची पूजा-अर्चना करीत असतो. त्याच्या नामाचा जप करतो. या अवस्थेत गुरुप्राप्तीपूर्वी ईश्वर हाच त्याचा
गुरु असतो.
तुम्ही
पूजा-अर्चा करून ईश्वरोपासना करा, नामसंकीर्तनाने करा किंवा मंत्राचा जप करून करा,
ती श्रद्धेने आणि सातत्याने केली असेल तर साधकाची निष्ठा किंवा श्रद्धा दृढ होत
जाते. त्या दृढ श्रद्धेमुळे एक वेळ अशी
येते की, ईश्वर आपणाला आध्यात्मिक प्रेरणा देणारा एखादा गुरु उपलब्ध करून देतो.
म्हणजेच
सश्रद्ध साधकाला योगायोगाने कोणी न कोणी गुरु लाभतोच. अशा वेळी ‘इष्ट देवतेच्या उपासनेने गुरुप्राप्ति
झाली’ असे तो साधक मानू लागतो. गुरुप्राप्ति
ही त्या साधकाच्या इष्टदेवतेच्या उपासनेचेच फळ होय. एकदा गुरुप्राप्ति झाली की, साधकाच्या
मनोवृत्तीतही बदल होतो. ‘गुरु हाच आपला
ईश्वर’ अशी त्याची श्रद्धा होते. प्रथम
ईश्वर हाच त्याचा गुरु असतो. गुरुप्राप्तीनंतर
गुरु हा त्याचा ईश्वर बनतो.
‘यस्य
देवे पराभक्तिर्यथा देवे तथा गुरौ | तस्यैते
कथिता ह्यर्थाः प्रकाशन्ते महात्मनः |’ गुरूंच्या
ठिकाणी त्याला सगुण-साकार ईश्वरच दिसू लागतो. अशा गुरूंकडून त्याला मंत्रदीक्षा मिळते. त्या मंत्राच्या जपाने साधक क्रमाक्रमाने
आत्मोन्नतीकडे वाटचाल करू लागतो. मंत्रोपासनेने
साधकाची निष्ठा दृढ होत जाते. गुरुकृपेने
त्याची साधनेच्या मार्गावर प्रगति होत जाते. म्हणून गुरुप्राप्तीपूर्वी साधक जे जे
करतो ते निष्फळ ठरत नाही.
- "सत्संग" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द
सरस्वती लिखित पुस्तकामधून, चतुर्थ आवृत्ति,
२००१
- Reference: "Satsang" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 4th Edition, 2001
- Reference: "Satsang" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 4th Edition, 2001
-
हरी ॐ –
No comments:
Post a Comment