Friday, April 24, 2015

पूजा आणि अनुराग | Worship with Love


पूजा हे एक कर्म आहे.  ते ईश्वराभिमुख आहे.  यामध्ये सगुण ईश्वराची पूजा केली जाते.  ही पूजा मूर्तीची असेल, किंवा प्रतिमेची असेल, किंवा प्रतीकाची सुद्धा असेल.  कदाचित प्राणप्रतिष्ठा करूनही केलेली असेल किंवा यज्ञयागादि रूपाने केलेली असेल.  विग्रहरूपाने असेल.  यात आवाहन, आसन, अर्घ्य, स्नान, उटी-चंदन आणि पंचामृतादि अशी विधिपूर्वक पूजा करून विग्रहाची स्थापना केली जाते.

त्यानंतर विग्रहाला वस्त्र-उपवस्त्र, यज्ञोपवित्, गंध, चंदन, अक्षता, दूर्वा, बेल, तुलसीपत्र, सुगंधी फुले, आभूषण अर्पण करून धूप, दीप, नैवेद्य दिला जातो.  त्यानंतर आरती, तांबूल देऊन स्तवन केले जाते.  कोणी कथेमधून स्तवन करेल, तर कोणी कीर्तनगायनामधून, कोणी नृत्य करून, तर कोणी जपध्यानामधून करेल.  अशा अनेक क्रियांच्यामधून ईश्वराला प्रसन्न केले जाते.

पूजा हे एक कर्म आहे परंतु केवळ कर्म करणे म्हणजे भक्ति नव्हे.  रोजच्या अनेक कर्मांच्यापैकी पूजा हे एक रोजचे कर्म होईल.  ते यंत्रवत् होईल.  म्हणून केवळ पूजा हे कर्म भक्तीच्या दृढ निश्चयाचे लक्षण होणार नाही.  यासाठी पूजादि कार्यात अनुराग असणे आवश्यक आहे.

‘अनुराग’ – ‘अनु’ या उपसर्गामध्ये पाठीमागून जाणे हा अर्थ अभिप्रेत आहे.  ‘सुखानुशयी रागः’ ज्याचे स्मरण केल्याने सुख मिळते त्याला ‘राग’ म्हणतात.  अनुराग म्हणजे प्रेम, प्रीति.  हा अनुराग विषयांमध्ये नसून तो पूजादि कर्मामध्ये आहे, कारण पूजादि कर्म शारीरिक असेल तरी ते अन्य कर्माप्रमाणे विषयाभिमुख करणारे नसून ईश्वराभिमुख करणारे आहे.  ईश्वरावर केंद्रीभूत आहे.  म्हणून पूजादि कर्मामध्ये अनुराग किंवा प्रीति निर्माण होणे यालाच भगवान व्यास भक्ति दृढ झाल्याचे लक्षण सांगतात.

- "नारदभक्तिसूत्र" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, एप्रिल २००६
- Reference: "
Narad Bhaktisutra" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, April 2006




- हरी ॐ

Sunday, April 19, 2015

साधु – अनन्य भक्त | Saint – Ardent Devotee


जेव्हा दोन साधु किंवा अनन्य भक्त एकत्र येतात त्यावेळी ते व्यावहारिक, सामाजिक, राजकीय घडामोडींची चर्चा करीत नाहीत.  त्यांना त्यामध्ये मुळीच रस नसतो.  त्यांना खरा आनंद होत असेल तर परमेश्वराचे स्वरूप आठवण्याने, चिंतनाने, त्यांच्या विभूति, माहात्म्य, कल्याणगुण गाण्याने, त्यावेळी ते स्वतःचे राहातच नाहीत.  त्यांचा रोम न् रोम भगवंताचे गुणगान गात असतो.  भावनांचा उद्रेक होऊन गुणगानामध्ये विरघळून गेलेले असतात.

शरीराचे भान विसरून, तहानभूक, देशकाळ विसरून तल्लीन झालेले असतात.  वेडे झालेले असतात.  शरीरावर रोमांच आलेले, कंठ दाटून आलेले, आनंदाश्रूंनी भारावलेले, देववेडे लोक अत्यंत दुर्लभ असतात.  ते परमानंदामध्ये आकंठ डुंबतात.  म्हणून म्हणतात, एकवेळ ईश्वरदर्शन घेतले नाही तरी चालेल परंतु साधूंचे दर्शन मात्र घ्यावे, कारण ‘साधुदर्शन हेच ईश्वरदर्शन होय’.

अनंत आणि अपार परब्रह्मस्वरूप सुखसागरामध्ये ज्याचे चित्त लीन झालेले आहे, त्या अनन्य भक्ताचे कुळ पवित्र होते.  त्याची माता अशा भक्ताला जन्म दिल्याने कृतार्थ होते.  वसुंधरा सनाथ होऊन कृतकृत्य होते.  असा हा अनन्य भक्त आपले मातृकुल आणि पितृकूल दोन्हींचा उद्धार करतो. त्याच्या तपःसामर्थ्याने आणि भक्तीच्या बलाने सर्व पितर पावन, मुक्त होतात.  आपल्या कुलामध्ये अनेक जन्मांच्या पुण्याईने भगवद्भक्त जन्माला आल्यामुळे त्यांना कृतकृत्यतेचा आनंद मिळतो.  तेही आनंदाने तृप्त होतात.  जन्मदात्री माता कृतार्थ होते.

शंभर मूर्ख पुत्रांपेक्षा एक भगवद्भक्त पुत्र हजारपटीने चांगला आहे, कारण भक्त जन्माला येणे अत्यंत दुर्लभ आहे.  कोट्यावधी पुत्रांच्यामध्ये एखादाच सत्कर्म, सदाचार, सद्विचाराने प्रवृत्त झालेला श्रद्धावान, सर्वगुणसंपन्न भगवद्भक्त जन्माला येतो.  त्याच्या स्पर्शाने वसुंधरा पावन होते.  सनाथ होते.  कृतकृत्य होते.


- "नारदभक्तिसूत्र" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, एप्रिल २००६
- Reference: "
Narad Bhaktisutra" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, April 2006



- हरी ॐ

Friday, April 10, 2015

अवर्णनीय प्रेम | Love is Indescribable


भगवत्प्रेम जरी अवर्णनीय असले, तरीही ते बाहेर जीवनात व्यक्त होत असल्यामुळे अल्पशा प्रमाणात का होईना वर्णन करता येईल असे कोणीतरी म्हणेल.  व्यवहारात प्रेम करणे म्हणजे काय ?  ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्या व्यक्तीची मी प्रशंसा करतो.  स्तुति करतो. वेळप्रसंगी त्या व्यक्तीची निंदा करून तिच्यावर रागावतो.  म्हणजे या प्रेमात स्तुति आहे, निंदा आहे.  कधी त्या व्यक्तीला खायला-प्यायला देऊन प्रेम व्यक्त करतो.  तर कधी तिच्या आरोग्यासाठी हे खाऊ नकोस म्हणुनही सांगतो.  म्हणजेच व्यवहारातील प्रेम वर्णन करता येईल.

उत्कट प्रेमाचे लक्षण कोणते ?  प्रेम ही एक वस्तु नाही.  प्रेमाचा भाव बाह्य आविष्कारामधून, कर्मामधून, संपूर्ण व्यक्त होईल असे नाही.  खायला घालणे, स्तुति करणे म्हणजे प्रेम नाही.  प्रशंसा केली नाही म्हणजे प्रेम नाही असे म्हणणे योग्य नाही.  प्रेमाचे वर्णन कसे करणार ?  माता आपल्या उदरात वाढणाऱ्या बाळावर, तसेच जन्मल्यापासून तिच्या अंतापर्यंत व्यक्त होणारे बहुरंगी प्रेम, जिव्हाळा, वात्सल्य वर्णन करता येत नाही.  तर आई होऊन ते अनुभवावे लागते.

म्हणजेच प्रेम शब्दांनी वर्णन करण्याचा विषय नाही.  प्रेम हा अनुभवण्याचा विषय आहे.  प्रेमाच्या भावात अनुभूति आहे.  तहानेने मन जसे आसुसलेले असते त्याप्रमाणे प्रेमाची तृष्णा कधीही शमत नाही.  तर ती अधिक वाढतच असते.  त्या भावामध्ये प्रियतम परमेश्वरामध्ये तल्लीन होतो.  तन्मय होतो.  त्याच्या चिंतनात देहभान विसरतो.  त्यात अंतरिक शांति आहे.  ते देश, काल, वस्तु, जात, धर्म, पंथ यांनी बद्ध नाही.  ते दाखविता येत नाही.  सांगता येत नाही.  ते अवर्णनीय आहे.


- "नारदभक्तिसूत्र" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, एप्रिल २००६
- Reference: "
Narad Bhaktisutra" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, April 2006



- हरी ॐ

Friday, April 3, 2015

आमचे प्रेम गौण का आहे ? | Why Is Our Love Inferior?


प्रेमाचा उत्कट भाव सर्वांच्या हृदयामध्ये अनुभवण्यास का येत नाही ?  जो भाव मनुष्याला शुद्ध करतो, ईश्वरचरणांवर समर्पण करावयास लावतो, मनुष्याला ईश्वराभिमुख बनवितो, नव्हे ईश्वरस्वरूप बनवून जीवन तृप्त करतो, कृतकृत्य करतो, तो भाव आमच्यात का बरे उदयाला येत नाही ?  याचे उत्तर नारदमहर्षि पुढील सूत्रात देतात –

प्रकाशते क्वापि पात्रे |
एखाद्याच अधिकारी पुरुषामध्ये (ते प्रेम) प्रकाशित होते.

हे अनिर्वचनीय प्रेम एखाद्याच अधिकारी पुरुषामध्ये प्रकाशित होते.  याचाच अर्थ हे परमप्रेम सर्वांच्या अंतःकरणामध्ये प्रकट होत नाही.  अनुभवण्यास येत नाही, कारण आम्ही जे प्रेम करतो ते व्यावहारिक प्रेम आहे.  मोहयुक्त प्रेम आहे.  येथे शंका निर्माण होईल की, आमचे प्रेम इतके कामुक का आहे ?  जसा आमच्या प्रेमाचा विषय असतो तसे आमचे प्रेम होते. आमच्या प्रेमाचा विषयच अशुद्ध, जड स्वरूपाचा आहे.  मग ते विषय असोत, लोक असोत, नातेवाईक असोत अगर स्थावर-जंगमादि मालमत्ता असो.  हे सर्व प्रेमाचे अशुद्ध विषय आहेत.  ते प्रेम विकार, वासनांनी ओतप्रोत भरलेले असून उपभोगण्यास प्रवृत्त करणारेच आहे. तेथे परमप्रेम उत्पन्न होणार नाही.

जर प्रेम तात्पुरते, तात्कालिक असेल, काळाच्या ओघात कमी कमी होत असेल, तसेच प्रेमाचा विषय सतत बदलत असेल तर ते प्रेम नाहीच.  ती फक्त कामुकता आहे.  ते अशुद्ध, राग-द्वेषांनी युक्त असलेले प्रेम आहे.  मग शुद्ध, परमप्रेम हवे असेल तर निश्चितपणे प्रेमाचा विषयही तितकाच शुद्ध, पवित्र, मंगलमय हवा.  तो जड, प्राकृत नसून चिन्मय, चैतन्यस्वरूप, अप्राकृत असला पाहिजे.  याप्रमाणे विषय जर शुद्ध असेल तर प्रेम शुद्ध असेल आणि असे शुद्ध प्रेम शुद्ध हृदयामध्येच निर्माण होईल.  हे शुद्ध हृदय अत्यंत दुर्मिळ आणि दुर्लभ आहे.


- "नारदभक्तिसूत्र" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, एप्रिल २००६
- Reference: "
Narad Bhaktisutra" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, April 2006




- हरी ॐ