आपण
आपल्या जीवनात कितीतरी कर्मे करतो, कर्मे संपतात आणि त्याची मला विस्मृति होते. सगळेच स्मृतीच्या आड जाते. काळ काय कर्म केले ? हे सुद्धा आठवत नाही, कारण सर्व कर्मे कालबद्ध
असल्यामुळेच आपोआप त्या सर्वांचीच काळाच्या ओघात विस्मृति होते. व्यावहारिक अपरा – निकृष्ट विद्या ही कालबद्ध
आहे. म्हणून काळाच्या ओघात हे ज्ञान
हळुहळू विस्मरण होते.
ब्रह्मज्ञानाची
विस्मृति ही शक्यच नाही. याचे पहिले कारण –
ब्रह्मज्ञान हे कालबद्ध असूच शकत नाही. ब्रह्मज्ञानामध्ये
कालविशेषाचा म्हणजे काळाच्या विभागांचा अत्यंत अभाव आहे. इतकेच नव्हे, तर ब्रह्मविद्येला कोणतेही नियत
असणारे निमित्त आवश्यक नाही. म्हणून
ब्रह्मविद्येमध्ये कोणत्याही काळामध्ये संकोच होत नाही. कोणत्याही काळामध्ये, अवस्थेमध्ये,
स्थितीमध्ये ब्रह्मविद्येची विस्मृति संभवत नाही.
आत्मवस्तु
काळाने बद्ध नाही, कारण ती वस्तु निर्मित नाही. त्या वस्तूला जन्मही नाही आणि जन्म नसल्यामुळे
मृत्यूही नाही. ती वस्तु कालबद्ध होऊ शकत
नाही. ब्रह्मविद्येचा प्रतिपाद्य विषयच
कालातीत असल्यामुळे ब्रह्मविद्या सुद्धा काळाने बद्ध, मर्यादित होऊ शकत नाही. नाहीतर आज एखादा साधक ब्रह्मज्ञानी झाला आणि
नंतर दोन वर्षांनी पुन्हा संसारी झाला, असे होईल.
परंतु
याठिकाणी सांगतात, एकदा जर ज्ञान प्राप्त झाले तर पुन्हा कधीही अज्ञान येऊ शकत
नाही. एकदा ब्रह्मविद्येचा उदय झाला तर
त्या विद्येचा कधीही नाश, ध्वंस किंवा विस्मरण होत नाही. कोणत्याही प्रकाराने या विद्येची हानि होऊ शकत
नाही. ब्रह्मज्ञानी पुरुष कोणत्याही
काळामध्ये किंवा अवस्थेमध्ये असेल तरी त्याचे ज्ञान अखंडपणे त्रिकालअबाधित राहते.
सर्व श्रुति आणि स्मृति हेच सिद्ध करतात.
- "मुण्डकोपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद
सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम
आवृत्ति, मार्च २००७
- Reference: "Mundakopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, March 2007
- Reference: "Mundakopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, March 2007
-
हरी ॐ –
No comments:
Post a Comment