Tuesday, January 27, 2015

अनात्मज्ञ | Knower of Unreal




ज्यांना ईशबुद्धि, सर्व ठिकाणी ईश्वर पाहणे शक्य नाही, ज्यांच्यामध्ये ज्ञाननिष्ठा नाही, यत् दृष्टं तत् सत्यम् |  अशीच ज्यांची बुद्धि आहे त्यांना direct अज्ञानी म्हणत नाहीत तर ‘अनात्मज्ञ’ असा शब्द वापरतात.  श्रीसमर्थ सुद्धा अशा माणसांना ‘पढतमूर्ख’ असा शब्द वापरतात.  तसेच याठिकाणी भाष्यकार ‘आत्मअज्ञानी’ असे म्हणत नाहीत तर ‘अनात्मज्ञ’ असे म्हणतात.

हे लोक अनात्म्याला जाणतात, म्हणजेच जे दृश्य, स्थूल आहे, तेच जाणणारे, विषयांनाच सत्यत्व देऊन विषयासक्त होणारे कामुक, विषयाभिमुख, प्राकृत, वैषयिक लोक होत.  असे लोक आत्म्याचे ग्रहण करण्यासाठी अशक्त आहेत, म्हणजेच ते आत्मज्ञानप्राप्तीसाठी असमर्थ आहेत.  बाकी सगळ्या ठिकाणी मात्र ते सशक्त असतात.  ‘इकडे काय चालले आहे, तिकडे काय चालले आहे? हा कोण, तो कोण?’ अशा प्रकारे ते व्यवहारकुशलज्ञ असतात.  गल्लीपासून दिल्लीपर्यंत साऱ्या जगाचे ज्ञान त्यांना असते.  स्वतःच्या १० x १० च्या खोलीत बसून विश्व कसे चालावे ?  याची मनमुराद चर्चा ते करतात.

परंतु असे लोक स्वतःचे स्वरूप, मीचे पारमार्थिक स्वरूप समजावून घेण्यात अत्यंत असमर्थ असतात. मी कोण?  या प्रश्नाचे उत्तर त्यांना मिळत नाही.  अशा लोकांसाठीच श्रुतिमाता अत्यंत कृपाळूपणे यापुढील मंत्रामधून ‘कुर्वन् एव’ असे आश्वासन देते.  कर्ममार्ग सांगते.  कर्म हा शब्द ऐकल्याबरोबरच सामान्य माणसाला बरे वाटते, कारण आपल्याला सतत काही ना काहीतरी करायला आवडते.  म्हणूनतरी आपण दिवसभर ‘काय करू, काय करू ?’  असा प्रश्न विचारतो. म्हणून श्रुति पुढील मंत्रामध्ये कर्मनिष्ठा प्रतिपादित करते.

                    कुर्वन्नेवेह कर्माणि जिजीविषेच्छतसमाः |
एवं त्वयि नान्यथेतोस्ति न कर्म लिप्यते नरे ||

- "ईशावास्योपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २००९
- Reference: "
Ishavasya Upanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2009



- हरी ॐ

Tuesday, January 20, 2015

एका रात्रीत प्रचीति | Overnight Realization


अध्यात्ममार्गामध्ये वरवरची इच्छा, त्याग किंवा वैराग्य उपयोगी पडत नाही.  आम्ही संसारही करू, विषयही उपभोगू आणि हे सर्व करता करता जमेल तशी, वेळ मिळेल तशी साधनाही करू, असा सर्वसामान्यतेने सर्वांचा विचार दिसतो.  म्हणूनच या मार्गामध्ये अनेक साधक अनेक वर्षे काहीतरी करीत राहतात.  वर्षानुवर्षे करूनही हाताशी काहीही येत नाही.  मग गुरूंना, शास्त्राला, परंपरेला, अन्य व्यक्तींना, समाजाला, परिस्थितीला किंवा भगवंतालाही ते दोष देतात.  परंतु दोष हा बाहेर नसून आपल्या अंतरंगामध्येच आहे.  अजूनही आपल्या मनामध्ये त्या प्रतीची तळमळ नाही.

एक शिष्य रोज गुरुंच्याकडे येतो.  ज्ञान मागतो, मुक्ति मागतो.  गुरु रोज उपदेश देत राहतात, परंतु शिष्याला अपेक्षा असते की, गुरूंनी काहीतरी करावे आणि मला एका क्षणात आत्मसाक्षात्कार किंवा मुक्ति द्यावी.  एक दिवस गुरु त्याला नदीकाठी घेऊन जातात.  त्याला पाण्यामध्ये नेतात. आत जेथे गळयापर्यंत पाणी आलेले असते, तेथे नेऊन त्याचे डोके आत दाबतात.  तो डोके पाण्याच्या बाहेर काढतो.  एक सेकंदानंतर गुरु पुन्हा जोराने खाली दाबतात.  तो पुन्हा डोके बाहेर काढतो.  पुन्हा तिसऱ्यांदा डोके दाबतात, तो पुन्हा डोके बाहेर काढतो.

नंतर त्याला ते काठावर घेऊन येतात व विचारतात ‘तुला काय वाटले ?’ त्यावेळी तो शिष्य उत्तर देतो ‘गुरुजी !  हे तुम्ही काय केलेत ?  जगतो की मरतो असे झाले.  माझा जीव वाचविण्यासाठी मी अत्यंत कासावीस झालो, गुदमरलो आणि म्हणून वेगाने डोके बाहेर काढले.  बस्स !  त्याक्षणी दुसरे काहीही आठवले नाही.’  यांवर गुरु उत्तर देतात ‘बाळा !  ज्यावेळी परमेश्वराच्या प्राप्तीसाठी इतकीच तीव्र तळमळ, व्याकुळता निर्माण होईल, मुक्तीसाठी तुझा जीव तळमळेल, त्याचवेळी तुला आत्मसाक्षात्कार होईल.


- "ईशावास्योपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २००९
- Reference: "
Ishavasya Upanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2009



- हरी ॐ

Tuesday, January 13, 2015

अपरिग्रह | Non-Possession



ज्या साधकाला खरोखरच अभ्यास करायचा असेल, शास्त्राध्ययन करायचे असेल, श्रवण, मनन, निदिध्यासना करायची असेल तर संग्रहाचा त्याग करणे अत्यंत आवश्यक आहे.  यालाच ‘अपरिग्रह’ असे म्हणतात. किंवा भगवान म्हणतात –

विविक्तदेशसेवित्वमरतिर्जनसंसदि | (गीता अ. १३ – १०)

साधना करीत असताना निदान सुरुवातीला काही काळ जनसंपर्काचा त्याग करून एकांतवास आवश्यक आहे.  खरोखरच अत्यंत कमीत कमी गरजांच्यामध्ये विषयांच्याशिवाय, भोगांच्याशिवाय इतकेच नव्हे, तर माणसांच्याशिवाय मी जगू शकतो, हे स्वतःच अनुभवले पाहिजे.  परमेश्वरावर खऱ्या अर्थाने निर्भर होऊन जीवन जगण्याची मनाची धारणा झाली पाहिजे.

कारण जितके आपल्या सभोवती विषय, भोग, माणसे आहेत, तितके विक्षेप वर्धन पावतात.  एकेक क्षुल्लक विषय किंवा कामना सुद्धा अनेक विकल्पांना कारण होते.  श्रवणादि साधनेमध्ये अनेक द्वंद्व, विक्षेप, प्रतिबंध निर्माण होतात.  आपण विषयांच्यावर, माणसांच्यावर अवलंबून राहतो.  शरीराने अवलंबून असणे हा दोष नाही, परंतु मनाने दुसऱ्यावर अवलंबून असणे हा प्रचंड मोठा दोष आहे.


कदाचित शरीराने आपण एकटे राहू शकू परंतु विषय, माणसे नसतील की, मी अस्वस्थ होतो, व्याकूळ होतो.  काय करावे ?  काहीच सुचत नाही.  एकांतवास असह्य होतो.  मन सतत कोणालातरी पकडण्याचा प्रयत्न करते.  असे मन साधना करण्यास अत्यंत प्रतिकूल आहे.  म्हणूनच येथे – मा गृधः |  यामधून श्रुति संग्रहवृत्तीचा त्याग करण्यास सांगते.


- "ईशावास्योपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २००९
- Reference: "
Ishavasya Upanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2009


- हरी ॐ

Wednesday, January 7, 2015

संग्रह्वृत्ती | The Attitude of Accumulation



मा गृधः | गृधिं मा कार्षिः इत्यर्थः |

धनाबद्दल असणारी जी आसक्ति किंवा इच्छा तिचा त्याग करावा.  आज सर्व जीवांची धनसंग्रह करण्याचीच प्रवृत्ति आहे.  मनुष्य जन्मल्यापासून मृत्युपर्यंत अनेक विषय, उपभोग, संपत्ति, स्थावरजंगम मालमत्ता, सत्ता, कीर्ति, यश, मान-सन्मान या सर्वांचा संग्रह करीत असतो.  ‘जितका आपण संग्रह करू, तितके आपण जास्तीत जास्त सुखी होऊ’ अशी त्याची कल्पना असते.

संग्रह केल्यामुळे कदाचित काही प्रमाणामध्ये आपल्या दैनंदिन समस्या, problems कमी झालेले दिसतात.  परंतु हीच संग्रहाची वृत्ति अत्यंत घातक ठरते.  संग्रह करणे वाईट नाही. परंतु संग्रहवृत्ति मात्र अत्यंत वाईट आहे.  त्या संग्रहाच्या वृत्तीमुळेच मनामध्ये अनेक प्रकारचे विक्षेप येतात, मन त्याच संग्रहीत विषय, भोग आणि व्यक्तींच्यामध्येच गुंतून राहते.

Planning करण्यामध्येच आयुष्य निघून जाते.  पैसे किती मिळवावेत, कसे मिळवावेत, १ लाखाचे २ लाख कसे करावेत, पैशाचा विनियोग कसा करावा, पैसे कोठे व कसे गुंतवावेत ?  या सगळ्या नियोजनामध्ये मन अत्यंत बहिर्मुख होते.

मनुष्य तेथेच थांबत नाही तर त्याची संग्रहवृत्ति दिवसेंदिवस वृद्धिंगत होत जाते.  या वृत्तीमुळे तो स्वतःचे जीवन शांत जगू शकत नाही.  तो विषयांच्याशिवाय, भोगांच्याशिवाय राहू शकत नाही.


- "ईशावास्योपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २००९
- Reference: "
Ishavasya Upanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2009



- हरी ॐ