‘परमप्रेमरूप’
या शब्दाने नारदमहर्षि कामुक प्रेमापलीकडील अर्थ निर्देशित करतात, कारण प्रेम हा
शब्द व्यवहारात अत्यंत प्रसिद्ध आहे. तो
सर्व ठिकाणी सोपाधिक आहे. त्या प्रेमाला
विषय आहे. मग तो विषय इंद्रियगोचर असेल,
अगर सौंदर्य, स्त्री, पुत्र, धन, संपत्ति असेल, सगेसोयरे असतील, निसर्ग असेल किंवा
कोणताही बाह्य विषय असेल. त्यावर मनुष्य प्रेम करतो.
परंतु
हे प्रेम मर्यादित आहे. ते मनुष्याला क्षणिक सुखाचा अनुभव देते; परंतु सतत
अतृप्त ठेवते. त्यामुळे पुन्हा पुन्हा
उपभोगून सुख वृद्धिंगत करावे हीच इच्छा प्रबळ होते. परंतु कितीही प्रयत्न केला तरी ते प्रेम
तात्कालिक राहाते. काळाच्या ओघात ते
कमी झाल्यावर तेच प्रेमाचे विषय चिंता, दुःख देणारे होतात. म्हणून हे परम प्रेम नाही आणि त्यामुळे वैषयिक
प्रेम म्हणजे भक्ति नव्हे. परमप्रेम हे अत्यंत
उच्चकोटीचे, अत्युत्तम, अनन्यसाधारण असे आहे.
विश्व
आणि विश्वातील विषय परमप्रेमाचा विषय होऊ शकत नाहीत, तर स्वभावतः सर्वव्यापक,
परिपूर्ण असणारा परमात्मा हाच परमप्रेमाचा विषय आहे. तो आनंदस्वरूप परमात्मा ‘मी’ च्या
स्वस्वरूपापासून भिन्न नाही. तोच
परमप्रेमाचा विषय आहे. निरतिशय आनंद हाच
प्रेमाचा विषय आहे.
आनंद
ही वस्तु नाही. त्याला रंग-रूप नाही किंवा
कोणताही पंथ, धर्म, जात वगैरे नाही. तरी
सुद्धा प्रत्येक मनुष्य कळत-नकळत आनंदस्वरूप परमात्म्यावर प्रेम करतो म्हणजेच
तो स्वतःच्या स्वरूपावर प्रेम करतो. म्हणून
नारदमहर्षि सर्व विश्व प्रेमाच्या बाबतीत व्यर्थ ठरवितात आणि प्रेमाचा विषय
प्रत्यगभिन्नस्वरूप परमात्माच आहे हे सिद्ध करतात. व्यावहारिक प्रेमात द्वैतभाव आहे. परंतु परमप्रेमात जीव आणि परमात्मा वेगळे असूच
शकत नाहीत. ते एकरूप होतात.
- "नारदभक्तिसूत्र" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द
सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,
एप्रिल २००६
- Reference: "Narad Bhaktisutra" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, April 2006
- Reference: "Narad Bhaktisutra" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, April 2006
-
हरी ॐ –
No comments:
Post a Comment