Tuesday, February 25, 2014

जेथे ज्ञान तेथे आनंद | Happiness comes with Knowledge


गतासूनगतासूंश्च नानुशोचन्ति पण्डिताः  (श्रीमद् भगवद्गीता २-११)

 या श्लोकामध्ये ज्ञान आणि अज्ञानाची दृष्टि व त्याचे फळ सांगितलेले आहे.  दोघांच्या दृष्टीत जमीन-अस्मानाचे अंतर आहे.  एक अंधाराची तर दुसरी प्रकाशाची, एक अविद्येची आणि दुसरी विद्येची, एक नानात्वाची व दुसरी अखंडत्वाची, एक द्वैताची तर दुसरी अद्वैताची दृष्टि आहे.  म्हणून जेथे ज्ञान आहे तेथे आनंद आहे आणि जेथे अज्ञान आहे तेथे दुःख, संसार आहे.

उदा.  आजोबा नातवाबरोबर फुग्याचा खेळ खेळतात.  खेळताना फुगा फुटतो.  परंतु दोघांच्यावर भिन्न परिणाम होतो.  नातु फुगा फुटला म्हणून आक्रोश करतो, तर आजोबा फक्त हसतात.  याचे कारण फुगा नाशवान आहे.  तो फुटणारच.  हे फुग्याचे तत्त्व जाणून आजोबा खेळत असतात.  त्यामुळे फुगा फुटल्यानंतर त्यांच्यावर काहीही परिणाम होत नाही.  ते फक्त हसतात !

परंतु नातु मात्र फुग्याचे तत्त्व जाणत नसल्यामुळे त्याला सत्यत्व देतो.  फुगा नित्य राहील अशी त्याची कल्पना असते.  परंतु फुग्याचे फुटणे थांबत नाही.  तो शोकाकुल होतो.  येथे वस्तु एकच, प्रसंग एकच, परंतु दोन भिन्न प्रकारच्या दृष्टि आहेत.  एक ज्ञानाची आणि दुसरी अज्ञानाची.  त्यामुळे ज्ञानी आजोबा हसतात आणि अज्ञानी नातु शोकाकुल होतो.

त्याचप्रमाणे जगामध्ये दोन प्रकारची दृष्टि दिसते. एक तत्त्वाच्या ज्ञानाची आणि दुसरी अज्ञानाची.  तत्त्व कधीही येत नाही आणि जातही नाही.  ते कधीही नाश पावत नाही.  जाणारे फक्त नाम आणि रूप आहे.  म्हणून ज्ञानी पुरुष नाशवान शरीरामधील अविनाशी तत्त्व जाणत असल्यामुळे गेलेल्या शारीराबद्दल किंवा जाणाऱ्या शरीराबद्दल कधीही शोकाकुल होत नाहीत.  ते शांत राहतात.  त्याउलट अज्ञानी पुरुष अविनाशी तत्त्व जाणत नसल्यामुळे अज्ञानाने शरीराला सत्यत्व देतात.  ते शरीर नाहीसे झाल्यावर अत्यंत शोकाकुल होतात.  निराश होतात.  

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "Shreemad Bhagavad Geeta
" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002


- हरी ॐ

No comments:

Post a Comment