Tuesday, February 11, 2014

भगवान कृष्ण - उद्ध्रुतनग | Lord Krishna and Govardhan

 
आदि शंकराचार्यकृत षट्पदी स्तोत्रात ‘ उद्ध्रुतनग ’ याचा अर्थ, ज्याने पर्वताला उचलले तो परमेश्वर होय.
 
श्रीमद्भागवतामध्ये मोठी सुंदर कथा येते.  गोकुळवासियांनी एकदा दरवर्षीप्रमाणे इंद्राची पूजा न करता गोवर्धन पर्वताची पूजा केल्यामुळे इंद्रदेव कोपतो व तो आपल्या मेघगणांना वृंदावनात अतिवृष्टि करण्याचा आदेश देतो.  व्रजामध्ये धो-धो पाऊस पडू लागतो.  हत्तीच्या सोंडेएवढी एक धार याप्रमाणे मुसळधार पाऊस पडून व्रजामध्ये सर्वत्र पाणीच पाणी होऊन हाहाःकार माजतो.  घरे, गोठे पाण्याने भरून जातात.  सर्व व्रजवासी आपल्या परिवारास, गाईगुरांना घेऊन भगवान श्रीकृष्णांना शरण येतात.
 
हे सर्व इंद्राचे कारस्थान आहे, हे भगवंताच्या लक्षात येते.  भगवान सर्वांचे रक्षण करण्यासाठी गोवर्धन पर्वताचा आश्रय घेतात.  आपल्या करांगुलीवर गोवर्धनाला धारण करतात व वर उचलतात.  भयभीत झालेले व्रजवासी, गोप-गोपी, गाई-गुरे सर्वजण गोवर्धनाखाली आश्रयाला येतात.  भक्तसहाय्यक भगवंताला साहाय्य करावे म्हणून आपापल्या काठ्या गोवर्धनाला लावतात.
 
याप्रकारे भगवंतांनी गोवर्धनाला उचलून सर्वांचे रक्षण केले, म्हणून त्याला ‘ उद्ध्रुतनग ’ असे म्हणतात.  भगवंतांनी शरण आलेल्या गोपगोपींचे तर रक्षण केलेच.  परंतु मुक्या गाईंचेही रक्षण केले.  गायींच्यामध्ये तर शरण येण्याची किंवा भगवंताला प्रार्थना करण्याचीही बुद्धि नव्हती.  परंतु त्या गायींच्या चेहेऱ्यावरील केवळ दीनभाव पाहूनच कृपाघन परमेश्वराने त्यांचे रक्षण केले.
 
इतकेच नव्हे, तर हे भगवंता !  तू अभिमानी असणाऱ्या इंद्राचेही रक्षण केलेस.  त्याच्यामधील अभिमानाचा नाश केलास.  एकाच गोवर्धनधारण लीलेमधून तू गाई-गोप-गोपी-वासरे-गोवर्धन व इंद्र या सर्वांचाच तू उद्धार केलास.  म्हणूनच तू ‘ उद्ध्रुतनग ’ आहेस !
 
- "शरणागती" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, २०१३
-
Reference: "Sharanagati" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, 2013
 
 
 
 - हरी ॐ 
 
 
 
 

No comments:

Post a Comment