Tuesday, April 2, 2013

जगद्गुरूचा खरा अर्थ (Real meaning of the Supreme Guru)

एकदा एका माणसाने श्रीमद्शंकराचार्यांना प्रश्न विचारला, “तुम्ही कसे काय साऱ्या जगाचे गुरु? ‘जगद्गुरू’ हे पद काय म्हणून लावता? यावर त्यांनी मार्मिक उत्तर दिले,  “कोण म्हणतो मी जगाचा गुरु आहे?  मी सर्व जगाचा गुरु नाही.  जगद्गुरू म्हणजे ‘जगत् एव गुरुः यस्य सः |’  संपूर्ण जग ज्याचे गुरु आहे असा जगद्गुरू !  सर्व विश्व माझे गुरु आहे.

सर्व काही या विश्वातून शिकावे.  नदी व सागराच्या एकरूपतेतून अद्वैत शिकावे.  हंस या पक्ष्याकडून सारासार विवेक घ्यावा, कारण दूध व पाणी एकत्र मिसळल्यावर हा पक्षी दूध व पाणी वेगळे करून त्यातील फक्त सारभूत दूध घेतो व निःसत्व पाणी टाकून देतो.

आपल्याभोवती चांगले वा वाईट सर्वच आहेत.  विषय, प्रसंग व माणसे यांचे सद्गुण हेरून ते अंगी आणणे हे महत्वाचे आहे.  सतत जागरूक राहून नीरक्षीरविवेक माणसाने ठेवावा.  तसेच दुसऱ्यांच्या दुर्गुणांपासून आपण योग्य तो बोध घेऊन, ते आपल्याला चिकटणार नाहीत याची दक्षता घ्यावी.  त्याचप्रमाणे सदैव गुणग्राहकवृत्ति ठेवावी.  आपल्यापेक्षा सद्गुणांचा पूर्णपणे अभाव असलेल्या किंवा आपल्यापेक्षा जास्त वरचढ असलेल्या गुणी व्यक्तीचा निष्कारण मत्सर करण्याचे कटाक्षाने टाळावे.

श्री दत्तात्रेयांनी चोवीस गुरु केले ते एवढ्यासाठीच.  पर्वत, वृक्ष, नाग, वेश्या ई. त्यांना गुरुस्थानी होते.  त्यांच्यासारख्या महात्म्याचे विचार व अज्ञ माणसाचे विचार यात मूलतःच जमीन अस्मानाचा फरक असतो.  अशी उथळ स्वरूपाची विचारसरणी साधकाने ठेवू नये.

साधुसारखे विशाल मन करण्यासाठी, नव्हे, घडविण्यासाठी ही फार मोठी खडतर तपश्चर्या व त्याग आहे हे क्षणोक्षणी मनात रुजवावे.  पुस्तके वाचून किंवा अभ्यास करून हे सद्गुण आत्मसात होत नाहीत.



- "साधना पञ्चकम्" या परमपूज्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती लिखित पुस्ताकामधून,  तृतीय आवृत्ती, सप्टेंबर २००५   
- Reference: "Sadhana Panchakam" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, September 2005

- हरी ॐ

No comments:

Post a Comment