Tuesday, April 23, 2013

सत्संगाचे प्रकार (Types of Satsang)






सत्संगाचे तीन प्रकार असतात -

१.       सतः संगः इति | हा पाहिला प्रकार.  सत् म्हणजे आत्मा.  आत्मनः सतः संगः इति |  आत्म्याचा संग करावा म्हणजेच मनात आत्मस्वरूपाची वृत्ति निर्माण करावी व त्यायोगे आत्मस्वरूपाचा सत्संग करावा, स्वस्वरूपात स्वस्थ राहावे.  हा सर्वश्रेष्ठ, अत्युत्कृष्ठ सत्संग होय, कारण या विशिष्ठ वृत्तीमुळे द्वैतप्रपंच नाहीसा होतो.  द्वैतप्रपंचाचे कारण जे अज्ञान, ते या आत्मवृत्तीने नाश पावून पूर्णपणे संसारध्वंस होतो.


२.       ज्या लोकांमध्ये ही आत्मवृत्ति – अखंडकारवृत्ति निर्माण झाली आहे अशा सत्पुरुषांचा संग करावा.  आत्मसंगाच्या प्राप्तीसाठी हा दुसरा सत्संग साधन होतो.
सज्जनांच्या सहवासात केवळ शरीराने नव्हे, तर मनाने सत्संग करावा, कारण आत्मप्राप्तीचे साधन ‘मन’ आहे.  ज्ञानप्राप्तीने मनुष्याच्या बाहेर काही बदल दिसत नाही, तर मूलतः खरा बदल मनात होतो, अंतरंगात होतो.  यासाठी साधकाचे मन प्रथम उपलब्ध पाहिजे.  म्हणजेच ते रिकामे, शांत पाहिजे.  सर्व चिंता, विषयचिंतन व कल्पनांचे तरंग पूर्णपणे मनातून काढून टाकले पाहिजेत.  तरच श्रवणाचा सुपरिणाम होऊन ते सफल होईल.  प्रथम मनाचे भांडे पूर्ण रिकामे केले, तरच आचार्य त्यात ज्ञानगंगा भरू शकतील.


३.       सत्पुरुषाचा सहवास नसला तरीही सत्प्रतिपादन करणाऱ्या शास्त्र व तत्सम ग्रंथांचा संग करावा.  शास्त्राच्या अध्ययनात, वाचनात वा चिंतनात असताना सर्व विषयवृत्तींचा निरास होऊन मन असत् प्रवृत्तीपासून निवृत्त होऊन कालानुक्रमे सत्वृत्ति मनात स्थिर व दृढ होते. 



- "साधना पञ्चकम्" या परमपूज्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती लिखित पुस्ताकामधून,  तृतीय आवृत्ती, सप्टेंबर २००५   
- Reference: "Sadhana Panchakam" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, September 2005

- हरी ॐ

Tuesday, April 16, 2013

"मी" आनंदाचा खरा स्त्रोत ("I" the real source of Happiness)




आपल्याला असे आढळते की, मनुष्य पैशावर पैशासाठी प्रेम करत नाही. तो पुत्रावर पुत्रासाठी प्रेम करत नाही. विषयांवर तो विषयांसाठी प्रेम करत नाही. मनुष्य सत्तेवर सत्तेसाठी प्रेम करत नाही. तर या सर्वांवर तो स्वतःला आनंद मिळतो म्हणून प्रेम करतो.

यावरून हे स्पष्ट होते की, मनुष्य कशावरही व कुणावरही प्रेम करत नाही, मनुष्य फक्त आनंदावरच प्रेम करतो. परंतु अज्ञानामुळे ‘व्यक्ति’ हे आनंदाचे उगमस्थान वाटून मी मनुष्यावर प्रेम करतो. संपत्ति आनंद देईल असे वाटून मी संपत्तीवर प्रेम करतो. पुत्र प्रेम देईल असे वाटून मी पुत्रावर प्रेम करतो. याचाच अर्थ असा की, मी पैसा, पुत्र, विषय यांच्यावर प्रेम करत नाही तर मी आनंदावर प्रेम करतो. आनंदप्राप्ति हे माझे सर्वोच्च ध्येय आहे. विश्वात व्यक्ति, वस्तू व विषय हे आनंदप्राप्तीचे साधन होते.

शेवटी असा प्रश्न उपस्थित होतो की, आनंद हे कुणाचे स्वरूप आहे? कारण आनंद हा विषय नाही व आनंद हा विषयात ही नाही. आनंद हे आत्म्याचे स्वरूप आहे. कारण आत्मा आनंदस्वरूपत्वात् | श्रुति म्हणते – आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवति | 

स्वतःच्या सुखासाठी मनुष्याला सर्व गोष्टी प्रिय होतात. मी फक्त माझ्यावर प्रेम करतो व मला त्यात खूप आनंद मिळतो, कारण तो आनंद त्या ‘मी’ चे म्हणजे ‘आत्म्या’ चे स्वरूप आहे.




- "साधना पञ्चकम्" या परमपूज्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती लिखित पुस्ताकामधून,  तृतीय आवृत्ती, सप्टेंबर २००५   
- Reference: "Sadhana Panchakam" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, September 2005

- हरी ॐ

Wednesday, April 10, 2013

गुढीपाडवा विजय संवत्सर (Gudhipadwa - Shree Shalivahan New Year 1935)



गुढीपाडवा 
 श्रीशालिवाहन शके १९३५
विजय नाम संवत्सर आरंभ

चैत्रे मासि जगद् ब्रह्मा ससर्ज प्रथमे S हनी |
शुक्लपक्षे समग्रे तु तदा सूर्योद्ये सति ||

      गुढीपाडवा म्हणजे नवीन संवत्सराचा आरंभ ! साडेतीन मुहूर्ताच्यापैकी एक महत्वाचा पूर्ण मुहूर्त ! हाच सृष्टीच्या निर्मितीचा दिवस ! सृष्टीचा वर्धापन दिन ! ब्रह्माजीने याच दिवशी सृष्टीच्या निर्मितीस प्रारंभ केला. याच दिवशी सत्ययुगाचा प्रारंभ झाला.

      श्रीगणेशयामल तंत्रशास्त्रामध्ये गुढीपाडव्याचे महत्व स्पष्ट केलेले आहे. २७ नक्षत्रांच्यापासून २७ लहरी निर्माण होत असतात. त्या २७ लहरींच्यापैकी प्रजापति लहरी, यमलहरी व सूर्यलहरी या तीन लहरी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. या तीन लहरींचा संपूर्ण सृष्टीवर व सर्व प्राणिमात्रांच्यावर परिणाम होत असतो. प्रजापति लहरींच्यामुळे अंकुरांच्या निर्मितीसाठी जमिनीची क्षमता वाढते. विहिरींना नवीन पाझर फुटतात. बुद्धीची प्रगल्भता वाढते व शरीरामध्ये कफ प्रकोप निर्माण होतो. यानंतर यमलहरींच्यामुळे पाऊस पडतो. बीजांना नवीन अंकुर फुटतात व शरीरामध्ये वायूचा प्रकोप निर्माण होतो. तसेच, सूर्यलहरींच्यामुळे जमिनीची उष्णता वाढते. त्यामुळे जमिनीची उत्पादन क्षमता कमी होते आणि शरीरामध्ये पित्त प्रकोप निर्माण होतो.

      याप्रमाणे प्रजापति, यम व सूर्य या तीन्हीही लहरींचे योग्य आणि उपयुक्त प्रमाणात एकत्रीकरण गुढीपाडव्याच्या दिवशी होत असते. यामुळे गुढीपाडव्याला विशेष महत्व आहे. या दिवशी सृष्टीच्या निर्मितीचा आनंद व्यक्त करण्यासाठी गुढी उभारली जाते व सृष्टीकर्त्या ब्रह्माजीचे पूजन केले जाते. पोकळ वेळूच्या काठीला भरजरी खण, नवीन वस्त्र लावून त्यावर तांब्याचा किंवा चांदीचा कलश उलटा ठेवला जातो. गुढीला कडुनिंबाचे, आंब्याचे डहाळे लावले जातात. अशी गुढी घरोघरी गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी अभ्यंग स्नान करून, घराच्या उंबऱ्याच्या बाहेर, उजवीकडे जमिनीवर स्वस्तिक रेखून सूर्योदयाच्या वेळी उभारली जाते. गुढीला 'ब्रह्मध्वज' असेही म्हणतात.

                सूर्योदयाला गुढी उभारल्यानंतर प्रजापति तत्व वेगाने तांब्याच्या कलशामध्ये व वेळूच्या काठी मध्ये येते. सूर्यास्ताच्या वेळी प्रजापति लहरी संपतात. तेव्हा ब्रह्मदेवाची पूजा करून -'ब्रह्मध्वजाय नम:|' असे म्हणून नमस्कार करून गुढी उतरविली जाते. गुढी आत आणल्यानंतर कलशामधील प्रजापति लहरी घरामध्ये प्रवेश करतात. यामुळे घरामध्ये सुख, शांति, ऐश्वर्य, आरोग्य नांदते. त्यादिवशी घराच्या दाराला लावलेले आम्रपानांचे तोरण हे मंगलसूचक आहे. 

      गुढीपाडव्याच्या दिवशी कडूनिंबाची पाने, फुले, गुळ, साखर, ओवा, चिंच, मिरे, हिंग हे पदार्थ एकत्र करून भक्षण केले जातात. यामुळे शरीरामधील कफ-वात-पित्त यांचा प्रकोप नाहीसा होऊन ते संतुलित होतात. त्यामुळे रक्तशुद्धी होऊन शारीरिक स्वास्थ्य प्राप्त होते. कडूनिंब-गुळ-चिंच वगैरे पदार्थांचे आंबट-गोड-कडू असे भिन्न-भिन्न स्वाद आहेत. याप्रमाणेच आपले जीवन म्हणजे सुख-दु:खादि अशा अनेक प्रसंगांचे मिश्रण असून त्यामध्ये मनाची समतोल वृत्ति ठेवावी, हाच संदेश मिळतो.

      गुढीपाडव्याच्या दिवशी पंचांगामधील संवत्सरफल जरूर वाचावे. त्यामध्ये ब्रम्हदेवाची सृष्टि, ब्रह्मदेवाचे आयुष्य व त्याप्रमाणे कालगणनेचे वर्णन केलेले असून या संवत्सराचे फल लिहीलेले असते. ते वाचल्यामुळे मनुष्याला समष्टीची, सृष्टीची व अव्याहत अखंड, प्रचंड मोठया कालचक्राची जाणीव होते. त्यामुळे मनुष्यामधील 'मी कोणीतरी फार मोठा आहे,' हा अंहकार कमी होऊन ईश्वराच्या अद्भुत निर्मितीच्या सत्तेच्या पुढे त्याचे मन नम्र, विनयशील होते.

      गुढी ही दैवी शक्तीचे प्रतीक आहे. त्यामधील कलश हे पूर्णतेचे प्रतीक आहे. गुढीमधून व्यष्टि व समष्टि म्हणजेच विश्व व जीव यांचा संबंध तसेच, सृष्टीच्या विराट स्वरुपाची व अद्भुत शक्तीची, ऊर्जेची संकल्पना केलेली आहे.

      गुढीपाडव्यापासून वसंत ऋतूला प्रारंभ होतो. अंकुरांना नवीन पालवी फुटतात. निसर्गामध्ये नवचैतन्य निर्माण होते. सृष्टीमधील नवचैतन्य मनुष्याच्या मनामध्ये प्रविष्ट होते. मनुष्याच्या जीवनामध्ये नवीन स्फूर्ति, चेतना, प्रेरणा, आत्मविश्वास, उत्साह, धैर्य निर्माण होते. मनुष्य हाच सृष्टीचा प्रमुख घटक असल्यामुळे मनुष्यामध्ये स्फूर्ति निर्माण झाली की, आपोआपच सृष्टि बदलते मनुष्याचे कुटुंब बदलते, समाज बदलतो. राष्ट्र, विश्व सर्वांच्यामध्येच नवचैतन्य निर्माण होते. म्हणूनच गुढीपाडवा हा उत्सव विजय व आनंदाचे प्रतीक असून कोणत्याही नवीन कार्याला या दिवसापासुनच प्रारंभ केला जातो.

      म्हणूनच मानवी जीवन भव्य, दिव्य, उदात्त व परिपूर्ण करणाऱ्या आर्य सनातन वैदिक हिंदु धर्माचा अत्यंत महत्वपूर्ण दिवस आहे गुढीपाडवा !

      यावरून लक्षात येते की,
सृष्टीची निर्मिती म्हणजे केवळ योगायोग नसून त्यामागे निश्चित नियोजन आहे. व आपल्या हिंदू संस्कृतीमधील प्रत्येक सण, परंपरा या महत्वपूर्ण, अर्थपूर्ण असून त्यामागे वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. 

 
परमपूज्य माताजी स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती, गुढीपाडवा २०१३, श्रुतिसागर आश्रम