Tuesday, October 7, 2025

जाणकार आणि कल्पनाकार | Knower And Imaginer

 




जागृतावस्था व स्वप्नावस्था यांच्यामध्ये असणाऱ्या सर्व मिथ्या पदार्थांना जाणणारे तसेच या पदार्थांची कल्पना करणारे कोण आहे ?  असा पूर्वपक्षीचा प्रश्न होता.  या प्रश्नाला श्रीगौडपादाचार्य उत्तर देतात की, स्वयंप्रकाशस्वरूप असणारा आत्मदेव स्वतःच्या मायाशक्तीच्या साहाय्याने स्वतःमध्येच रज्जुमधील सर्पाप्रमाणे पुढे सांगितल्या जाणाऱ्या सर्व भेदांची कल्पना करतो.  तोच सर्वांना जाणतो.  हाच वेदांतशास्त्राचा निर्णय आहे.  म्हणून ज्ञान व स्मृतीचा आश्रय म्हणजेच जागृतावस्था व स्वप्नावस्था या दोन अवस्थांचा आश्रय भिन्न नसून एकच आहे.  असे मानल्यामुळे आपोआपच बौद्धमताप्रमाणे ज्ञानस्मृति निराश्रय होत नसल्यामुळे निरात्मवादाचा निरास होतो.

 

या श्लोकामधून श्रीगौडपादाचार्य व भाष्यकार वेदांतशास्त्राचा निश्चय, सिद्धांत प्रतिपादन करीत आहेत.  राज्जुवर सर्पाचा भास होतो.  म्हणून सर्प ही दोरीमध्ये केलेली केवळ एक कल्पना आहे.  या कल्पित सर्पाला पाहणारा द्रष्टा हा अधिष्ठानभूत राज्जुपासून भिन्न आहे.  परंतु येथे मात्र जो स्वप्नाची कल्पना स्वतःमध्ये करतो तोच स्वप्नाला पाहणारा द्रष्टा आहे.  तो आत्मदेव होय.

 

येथे आचार्य ‘देव’ हा शब्द योजतात.  देव म्हणजेच द्योतनात्मकः इति देवः |  जो स्वतः प्रकाशस्वरूप असून दुसऱ्यांनाही प्रकाशमान करतो, त्यास ‘देव’ असे म्हणतात.  असा हा देव स्वतःच स्वतःमध्येच राज्ज्वादींच्यामध्ये सर्पादींच्या कल्पनेप्रमाणे अनेक भेदात्मक कल्पना निर्माण करतो व स्वतःच त्या सर्व भेदांना जाणतो.  म्हणजेच प्रकाशमान करतो.  थोडक्यात आत्मदेव स्वतःच या दृश्य, काल्पनिक, भेदजन्य पदार्थांची, विश्वाची निर्मिती करतो व तोच या सर्वांना प्रकाशमान करतो.  यामधून आचार्यांनी विश्वनिर्मितीच्या विषयी असणाऱ्या वैनाशिकादि अन्य सर्व मतांचे खंडन केलेले आहे.

 

 

- "माण्डूक्योपनिषत् या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, डिसेंबर २०
- Reference: "
Mandukyopanishad" by ParamPoojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, December 2016



- हरी ॐ