Tuesday, June 24, 2025

साधुदर्शनाची पद्धती | Way Of Meeting A Saint

 




वसिष्ठ मुनि येथे साधुदर्शनाची पद्धती सांगतात.  साधूंचे रोजच सहज दर्शन मिळाले, तर डोके टेकवायचे आणि दर्शन घ्यायचे हा केवळ एक उपचार राहतो.  त्यामध्ये भावाची जागृति होत नाही.  नमस्कारामध्ये किंवा दर्शनामध्ये बाह्य क्रिया महत्त्वाची नाही.  आपण जसे बाहेरचे विषय पाहतो, तसे पाहणे म्हणजे दर्शन नाही.  दर्शन आणि नमस्कार हा मनाचा एक नतमस्तक भाव आहे.

 

साधु किंवा गुरु ही एक व्यक्ति किंवा शरीर नाही.  विश्वामधील अन्य माणसांच्याप्रमाणे एखादा मर्त्य मनुष्य नाही.  आपला कोणी आप्त, बंधु किंवा नातेवाईक सुद्धा नाही.  म्हणून महापुरुषांशी कोणीही कोणतेही नाते सुद्धा जोडू नये.  त्यांच्याकडे कोणत्याही नात्याने पाहू नये.  कारण असे महापुरुष किंवा गुरु म्हणजे तत्त्व असून साक्षात् परब्रह्मस्वरूप आहेत.  भगवान शिव सुद्धा माता पार्वतीला गुरुस्वरूपाचे वर्णन करताना म्हणतात –  

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः |  गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ||  (गुरुगीता)

या तत्त्वाकडे पाहताना साधकाचा भाव अत्यंत शरणागतीचा हवा.  या भवसागरामधून पार नेण्यासाठी साधकाने गुरूंच्या चरणी प्रार्थना करावी.  त्यासाठी आत्मज्ञानाची याचना करावी.

 

वसिष्ठ मुनि येथे हीच व्याकुळता सांगतात.  गुरुंच्याकडे केवळ शरीराने नव्हे तर मनाने जावे.  गुरुदर्शनाची मनामध्ये ओढ आणि व्याकुळता हवी.  ती सत्संगाची-ज्ञानाची व्याकुळता आहे.  म्हणून हे रामा !  दरिद्री माणूस जसा हिरे-माणके पाहण्यासाठी उत्सुक असतो, तसेच साधकाला सत्संगामध्ये जाण्याची, साधुदर्शनाची, ज्ञानश्रवणाची व साधनेची तीव्र इच्छा निर्माण झाली पाहिजे.  गुरूंचे उपदेशामृत श्रवण करण्यासाठी चातकाप्रमाणे आतूर झाले पाहिजे.  त्याशिवाय सत्संगाचे - गुरूंचे महत्त्व समजत नाही.  गुरुंच्याजवळ कसे जावे, कसे दर्शन घ्यावे, त्यांच्याशी कसे बोलावे, याचे शिष्टाचार आहेत.  केवळ शरीराने जवळ राहून उपयोग नाही.  जोपर्यंत भाव उदयाला येत नाही, तोपर्यंत सत्संगाचा उपयोग होत नाही.

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019



- हरी ॐ



Tuesday, June 17, 2025

सद्गुरू त्यांच्याच कृपेने भेटतात | Sadguru Meets By His Own Grace

 



कदाचित आपण स्वप्रयत्नाने महापुरुषांच्या जवळ जाऊ शकू परंतु त्यांची कृपा मिळेलच असे नाही.  याचे कारण प्रत्येकाचे प्रारब्ध !  येथे साधूजवळ आपपर भाव नाही.  कृपा सर्वांच्यावर आहे.  परंतु ज्यावेळी भाग्य फलोन्मुख होईल किंवा होण्याची वेळ येईल तेव्हाच ती कृपा मिळेल.  मग तुमची इच्छा असो वा नसो.  ते त्यांच्या सामर्थ्याने आपल्याला जवळ खेचतील.  नाहीतर कितीही प्रयत्न केला तरी मिळणार नाही.  अशा काही घटना घडतील किंवा प्रसंग येतील की आपली श्रद्धा त्यांच्यामध्ये निर्माण होणार नाही.  साशंक वृत्ति निर्माण होईल आणि आपण शरीराने कितीही जवळ असलो तरी मनाने साधुपुरुषाच्या जवळ जाऊ शकत नाही.  ते मन त्यांच्यापासून दूर खेचेल.

 

सर्वजण जरी माहात्म्याजवळ गेले तरी प्रत्येकाची अंतरिक इच्छा, तीव्रता भिन्न-भिन्न असते, काहींचा परमार्थ आवडीचा असतो, काहींचा सवडीचा तर काहींचा नडीचा असतो.  नडीने परमार्थ करणारेच जास्त असतात.  आवडीने करणारे फारच थोडे !  म्हणून जशी ज्यांची इच्छा असते त्याप्रमाणेच त्याला फळ मिळते.  त्यामुळे साधुमध्ये भेदभाव नाही.  सर्वांचा उद्धार व्हावा हीच त्यांची इच्छा असते.  परंतु आम्ही खरोखरच त्याला अधिकारी आहोत का ?  हा प्रश्न आहे.  सर्व शिष्यांच्यामधून स्वामी विवेकानंदानाच रामकृष्णांनी साक्षात्कार दिला.  का ?  याला व्यावहारिक उत्तर नाही.  फक्त एकच त्यांची तीव्र इच्छा, अंतरिक तळमळ ही पराकोटीची होती.

 

याचाच अर्थ महात्म्यांचा फक्त शारीरिक संग किंवा जवळीक असणे म्हणजे त्यांची कृपा नाही तर जेव्हा आमच्या मनात त्यांच्याविषयी अत्यंत एकनिष्ठा, श्रद्धा, अनन्य प्रेम निर्माण होऊन तीव्र तळमळ निर्माण होईल त्यावेळी मनाने त्यांच्याशी खरा संग निर्माण होतो आणि त्यावेळीच आमच्यावर त्यांची कृपा होईल.  त्यांच्या कृपेने आम्ही संसार पार करू शकू.  म्हणून त्यांच्याच कृपेने ते प्राप्त होतात.

 

 

- "नारदभक्तिसूत्र" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, एप्रिल २००६
- Reference: "
Narad Bhaktisutra" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, April 2006



- हरी ॐ




Tuesday, June 10, 2025

द्रष्टा आणि दृश्याचे खरे स्वरूप | The Reality Of Seer And Seen

 




या चार श्लोकांच्यामधून श्रीवसिष्ठ मुनि अत्यंत सखोल भाग स्पष्ट करतात व सिद्ध करतात की, द्रष्टा जीव व दृश्य विश्व हे सर्वच केवळ संकल्पामधून निर्माण झाले असून अत्यंत काल्पनिक व मिथ्या आहे.  जसे स्वप्नामध्ये आपण आपल्या स्वतःचाच मृत्यु पाहिला तर तेथे द्वित्व निर्माण होते.  म्हणजेच मरणारा मी - एक व त्याला पाहणारा मी - दुसरा !

 

जसे स्वप्नामध्ये आपल्याला आपण स्वतःच पांथस्थ असून चालताना दिसतो.  येथे स्वप्नात दिसताना आपल्याला आपला स्थूल देह जरी चालताना दिसला तरी तो देह प्रत्यक्ष स्थूल नसून स्वप्नामधील कल्पित देह असतो.  मात्र तरीही स्वप्नपुरुष स्वप्नकाळी त्या स्वप्नदेहाला स्थूल देह म्हणूनच पाहतो.  त्याचप्रमाणे परमात्मा सुद्धा आपल्याला चित्ताच्या कल्पनेने स्वतःच्या सूक्ष्म देहाची कल्पना करतो व तशीच पुढे जन्माला येणाऱ्या स्थूल देहाचीही - व्यष्टि जीवाची कल्पना करतो.  याचा अर्थच परमात्म्याचा सूक्ष्म देह व स्थूल देह हे दोन्हीही काल्पनिक व मिथ्याच आहेत.  परमात्म्याचा सूक्ष्म देह म्हणजे ईश्वर होय आणि परमात्म्याचा स्थूल देह म्हणजे संपूर्ण दृश्य जग होय.

 

"हे राघवा !  याप्रमाणे परमात्मा सूक्ष्म व स्थूल देहाने युक्त झाला की, मग तो परमात्मा आपल्या सूक्ष्म देहामध्ये म्हणजे आपल्या चित्तामध्येच सर्व दृश्य विषयांचा अनुभव घेत असतो.  आपणास डोळ्यांना सर्व विषय आपल्या बाहेर दिसत असतील तरीही वस्तुतः ते सर्व विषय आपण आपल्या चित्तामध्येच अनुभवत असतो.  त्यामुळे आपण खरे तर आपल्याच चित्तामध्ये त्या विषयांची कल्पना करून त्या काल्पनिक विषयांना पाहत असतो.  म्हणून जणू काही आपण बाहेरचे विषय बाहेरच त्याग करतो व चित्तामध्ये त्यांचा अनुभव घेतो."

 

"यावरून सिद्ध होते की, आपणास अनुभवायला येणारे हे संपूर्ण दृश्य विश्व व विषय हे वस्तुतः बाहेर नसून आपल्याच चित्तामध्ये कल्पित केलेले विषय आहेत.  त्यामुळे जे आपल्या चित्तामध्ये आहेत, ते विषय आपल्याला बाहेर असल्यासारखे वाटतात.  त्यामुळे रामा !  हे सर्व दृश्य विश्व असो, विषय असोत किंवा स्थूल उपाधि असो, हे सर्वच परमात्म्याच्या चित्ताची केवळ आणि केवळ कल्पना आहे.  त्याशिवाय या कशालाही लेशमात्रही अस्तित्व नाही.  हाच येथे अभिप्राय आहे.  म्हणून रामा !  हे सर्व दृश्य विषय बाहेर नसून चित्तामध्ये आहेत.  अर्थात चित्तकल्पित आहेत, हे तू लक्षात ठेव."


 

- "योगवासिष्ठ" (तृतीय उत्पत्ति प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, आदि शंकराचार्य जयंती २०२२   
- Reference: "Yogavashishtha
" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, Adi Shankaracharya Jayanti 2022



- हरी ॐ



Tuesday, June 3, 2025

करुणः | Empathetic

 




करुणा कृपा दुःखितेषु दया तद्वान् करुणः सर्वभूताभयप्रदः संन्यासी इत्यर्थः |  दुःखी, दीन-दुबळ्या लोकांच्यावर दया करणे म्हणजेच करुणा होय.  संत तुकाराम महाराज म्हणतात –  

जे का रंजले गांजले |  त्यासी म्हणे जो आपुले |  

तोचि साधु ओळखावा |  देव तेथेची जाणावा ||                       (अभंग-गाथा)

तापत्रयांनी होरपळलेले जे अत्यंत दुःखी, कष्टी, असाहाय्य, अगतिक जीव आहेत, सर्वच बाजूंनी संकटे आल्यामुळे जे धैर्यहीन, अत्यंत निराश झालेले आहेत, ज्यांना स्वतःच्या सामर्थ्याने या परिस्थितीमधून बाहेर पडता येत नाही, अशा जीवांच्यावर हा पुरुष कृपा, दया करतो.  त्यांना आनंद देण्याचा प्रयत्न करतो.

 

असे हे जीव दुःखामुळे अत्यंत दीन, व्याकूळ, आर्त झाल्यामुळे सतत परमेश्वराचा धावा करीत असतात.  त्यांच्या सर्व महत्त्वाकांक्षा पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे जमीनदोस्त झाल्यामुळे ते नैराश्याच्या अंधःकारात पूर्णपणे बुडून जातात.  जीवनामध्ये कधीतरी, कोणीतरी आशेचा उषःकाल दाखवेल म्हणून प्रतीक्षा करतात.  त्यासाठीच ते कसेतरी जीवन जगत राहातात.

 

अशा या दीनदुबळ्या जनांच्यावर दयेचा, कृपेचा वर्षाव करण्यासाठी परमेश्वर स्वतःच ज्ञानी पुरुषाच्या रूपाने अवतीर्ण होऊन या भूतलावरील दीन लोकांच्यावर कृपाकटाक्ष टाकतो.  ज्ञानी पुरुषाच्या मनामध्ये त्यांच्याविषयी अपार करुणा असते.  त्याच्या हृदयामध्ये दयेचा पाझर फुटून तो त्यांना सुखी करण्यासाठी रात्रंदिवस झटतो.  त्यांच्या दुःखाने तो स्वतःच व्याकूळ होतो.  आपल्याशिवाय अन्य व्यक्ति दुःखी-कष्टी आहे, ही कल्पनाच तो सहन करू शकत नाही.  ही त्याची व्याकुळता वरवरची नसते.  तो अंतरिक तळमळीने सतत त्यांच्यासाठी काया-वाचा-मनाने प्रयत्न करतो.  म्हणूनच तो करुणेचा सागर बनतो.  सर्वांची दुःखे निवारण करण्याचा प्रयत्न करतो.  यालाच ‘करुणा’ असे म्हणतात.  तो साक्षात करुणामय मूर्ति होतो.

 

या विश्वामध्ये दुसऱ्याच्या दुःखाने आनंदी होणारे लोक भरपूर आहेत; परंतु दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होणारे लोक अत्यंत दुर्लभ, विरळ आहेत.  तेच लोक जीवनभर दुसऱ्यांच्या जीवनामध्ये सुगंध निर्माण करण्यासाठी चंदनाप्रमाणे झिजतात.

 


- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ