Tuesday, March 11, 2025

कर्मफलत्याग साधना कोणाला ? | “Result-Sacrifice” Meant For Whom?

 



कर्म अथवा कर्मफळ हे कधीही मोक्षाचे साधन होऊच शकत नाही.  कर्म आणि कर्मफळ हे दोन्हीही अज्ञानामधून निर्माण झालेले आहेत.  कर्म व कर्मफळ अज्ञानाच्या विरोधी नसल्यामुळे अज्ञानाचा नाश करू शकत नाही.  यावरून सिद्ध होते की, कर्म व कर्मफळ मोक्षप्राप्तीचे साधन होऊच शकत नाही.  फक्त ज्ञानानेच अज्ञानाचा व अज्ञाननिर्मित कार्याचा ध्वंस होऊ शकतो.  म्हणून ज्ञान हेच मोक्षसाधन आहे.  हाच सर्व श्रुतींचा, शास्त्राचा, गीतेचा सिद्धांत आहे.  हे त्रिवार सत्य आहे.

 

परंतु तरीही भगवान येथे अज्ञानी, कामुक पुरुष डोळ्यासमोर ठेऊन त्याची साधनेमध्ये प्रवृत्ति होण्यासाठी कर्मफलत्यागाची स्तुति करतात.  याठिकाणी हा उपदेश ज्ञानी पुरुषाला दिलेला नाही.  ज्ञानी पुरुष हा direct श्रवणादि साधना करून – (मामेव प्राप्नुवन्ति |)  माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो.  ज्ञानी त्वात्मैव मे मतम् |  ‘ज्ञानी’ आणि ‘मी’ यांच्यामध्ये द्वैतभाव राहातच नाही.  त्यामुळे ज्ञानी पुरुषाला उपदेशाची आवश्यकताच नाही.

 

परंतु जे मंद-मध्यम अधिकारी आहेत.  ज्यांचे मन अजूनही अशुद्ध, अपरिपक्व आहे, त्यांचाही उद्धार करण्याची भगवंतांची तळमळ आहे.  ते सर्व श्रद्धावान आहेत.  परंतु मनामध्ये असणाऱ्या दोषांच्यामुळे ते माझ्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत.  त्यामुळेच ते व्याकूळ झालेले आहेत.  अत्यंत दुःखी-कष्टी आहेत.  या भावसागरामध्ये पूर्णपणे बुडाल्यामुळे ते अत्यंत घाबरलेले, हीन-दीन, अगतिक, असहाय्य झालेले आहेत.  ते दुःखाने आकांत, आक्रोश करीत आहेत.  पाहि मां, त्राहि मां |  असा टाहो फोडीत आहेत.  त्यांना स्वतःला या भावसागरामधून तरून जाण्याचे सामर्थ्य नाही.

 

अशा या भक्तांच्यावर परमकृपाळु, दयेचा सागर, करुणार्णव, करुणानिधि, भक्तपालक, भक्तरक्षक असणारे भगवान कृपाकटाक्ष टाकतात आणि म्हणताततेषामहं समुद्धर्ता |  अशा भक्तांना भगवान दिलासा देतात, अभयदान देतात आणि सुलभ-सोप्या साधना सांगून त्यांना त्यामध्ये प्रवृत्त करतात.  बाळाS, तुला काहीच जमले नाही तरी हरकत नाही.  तू निराश होऊ नकोस.  तू फक्त कर्मफलत्याग करण्याचा अभ्यास कर.  हीच तुझी साधना आहे.  यामध्ये तू निष्ठा प्राप्त केलीस की, मग पुढची साधना पाहू.  याप्रमाणे त्याच्या कलाने घेऊन त्याला झेपेल अशा साधना देतात.

 

 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ