आपल्या गुरूंचे दर्शन घेणे म्हणजे
हजारो ज्ञानी पुरुषांचे दर्शन घेण्याप्रमाणे आहे. एक साधु हा लाख लोकांइतका सामर्थ्यशाली असतो. साधूंच्या संगामध्ये - मृतिः अपि उत्सवायते
| म्हणजे मृत्युसारखा प्रसंग सुद्धा एखाद्या
उत्सवासारखा वाटतो. एखाद्या ठिकाणी कोणाचा
मृत्यु झाला आणि तेथे ज्ञानी पुरुष गेला, तर ज्ञानी पुरुषाच्या आगमनाने त्याच्या
दर्शनाने मृत्यूच्या भयंकर प्रसंगामध्येही अज्ञानी जीवांचे मन शांत होते. उद्वेग कमी होतो. साधूंचे पुण्यकारक दर्शन झाल्यामुळे
त्यांच्या मनाला आधार मिळतो. मृत्यूसारख्या
प्रसंगामध्ये सुद्धा उत्सव निर्माण करण्याचे सामर्थ्य या ज्ञानी पुरुषामध्ये असते.
सर्वसाधारणपणे जेथे मृत्यु होतो तेथे सर्व माणसे
दुःखी होऊन भकास चेहऱ्याने बसलेली असतात. परंतु
ज्ञानी पुरुषाच्या जाण्याने मात्र तेथिल वातावरण बदलते. सर्वांना त्या प्रसंगामध्ये ईश्वराचे स्मरण होते
आणि मृत्यूला सुद्धा उत्सवाचे स्वरूप येते.
त्याचप्रमाणे आपल्यावर एखादे मोठे संकट कोसळले
आणि त्यावेळी जर साधूंचे दर्शन झाले तर त्या संकटाचा प्रभाव एकदम कमी होतो - आपत्
सम्पत् इव आभाति | त्यावेळी विपत्ति सुद्धा
संपत्तीप्रमाणे वाटते. म्हणजे संकटकाळी
महात्म्यांचे दर्शन झाले तर आपण ते संकट क्षणभर विसरून जातो आणि अचानक एखाद्याला धनाचा
साठा मिळावा, तसा आनंद साधूंच्या दर्शनाने होतो. म्हणून साधूंचे दर्शन हे अत्यंत दुर्लभ आहे. रोज रोज दर्शन मिळाले तर त्याची किंमत कळत नाही.
मात्र मृत्यूच्या समयी संकटकाळी सत्पुरुषांच्या
दर्शनाचे महत्त्व समजते. असा हा सत्संग
अतिशय दुर्लभ व श्रेष्ठ आहे.
- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९
- Reference: "Yogavashishtha" by Param
Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019
- हरी ॐ–