Tuesday, September 3, 2024

मोक्ष म्हणजे दृश्याचा निरास | Liberation - Dismissal Of Visual World

 



जोपर्यंत दृश्य विश्वाचा निरास होत नाही, तोपर्यंत त्या दृश्यापासून निर्माण होणारे दुःखही नाहीसे होत नाही.  तोपर्यंत द्रष्ट्याचे किंवा ज्ञात्याचे केवळ अद्वयस्वरूप सिद्ध होत नाही.  परंतु दृश्याचा निरास झाला की, ज्ञात्याचे ज्ञातृत्व सुद्धा निरास होते.  त्यालाच ज्ञाते लोक 'मोक्ष' असे म्हणतात.

 

श्रीवसिष्ठ मुनि या श्लोकामध्ये अत्यंत थोडक्यात या सर्गाचे सार सांगतात.  जोपर्यत आपल्या डोळ्यांना दृश्य दिसते, तोपर्यंत त्यापासून दुःखाची निर्मिती होतेच होते !  जोपर्यंत द्रष्टा स्वतःपासून भिन्न स्वरूपाने दृश्याला पाहत राहतो, तोपर्यंत त्याच्यावर दृश्य जगाचा परिणाम होतो.  परंतु हाच साधक ज्यावेळी पुन्हा-पुन्हा ज्ञानाचे श्रवण करू लागतो, त्यावेळी ढग विखरून जावेत, त्याप्रमाणे दृश्य निरास पावू लागते.  दृश्य निरास पावणे म्हणजे दृश्याला दिलेली सत्यत्वबुद्धि निरास पावणे होय.  शास्त्रश्रवणाच्या सामर्थ्याने ही सत्यत्वबुद्धि कमी-कमी होऊन शेवटी निरास पावते.  दृश्याला दिलेले महत्त्व कमी होते.  त्यावेळी द्रष्ट्याने पाहण्याचा प्रयत्न केला तरी त्याला दृश्य दिसेनासे होते.  द्रष्ट्याचे द्रष्टेपणही संपते.

 

सर्व लाटा पाणीस्वरूप आहेत, असे समजल्यानंतर आपण लाटा पाहतो म्हणजे खरे तर पाण्यालाच पाहतो.  त्याप्रमाणे हे संपूर्ण दृश्य विश्व चैतन्यस्वरूप आहे, हे एकदा बुद्धीला समजले, हा बोध अंतःकरणामध्ये दृढ झाला की, मग आपल्या चर्मचक्षूंना दृश्य नामरूपे दिसली तरीही एका परब्रह्मतत्त्वाशिवाय अन्य कोणताही बोध होत नाही.  'मी' द्रष्टा ब्रह्मस्वरूप आणि हे दृश्य विश्वही ब्रह्मस्वरूप झाले तर मग कोण कोणाला पाहणार ?

 

या अद्वैत दृष्टीमध्ये दृश्याचे दृश्यत्व आणि द्रष्ट्याचे द्रष्टेपण निघून जाते.  त्या दोघांनाही प्रकाशमान करणारे, त्या दोघांचेही अधिष्ठान असणारे परब्रह्मस्वरूप केवळ शिल्लक राहते.  त्यालाच ज्ञाते लोक 'मोक्षावस्था' असे म्हणतात.  त्या स्थितीमध्ये कर्म, वासना, कर्तृत्व, भोक्तृत्व, सुखदुःखादि अनुभव या सर्व संसाराचा अत्यंत अभाव होतो.  अशी ती केवलस्थिति म्हणजेच परमोच्च मोक्षावस्था आहे.

 

 

- "योगवासिष्ठ" (तृतीय उत्पत्ति प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, आदि शंकराचार्य जयंती २०२२   
- Reference: "Yogavashishtha
" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, Adi Shankaracharya Jayanti 2022





- हरी ॐ