Tuesday, September 10, 2024

वेदांतशास्त्र हे प्रमाण कसे ? | How Vedanta Shaastra is The Proof ?

 



वेदान्तशास्त्र हेच आत्मज्ञानाचे प्रमाण आहे.  यावर शंका येईल की, वेदान्तशास्त्र म्हणजे शब्द आहे.  व्यवहारामध्येही शब्दांच्या साहाय्याने आपण विषयांचे ज्ञान घेतो.  शब्द हे वाचक व विषय हे वाच्य आहेत.  जसे ‘घट’ हा शब्द उच्चारताक्षणी अंतःकरणामध्ये घटवृत्ति निर्माण होऊन ज्ञात्याला घटाचे ज्ञान होते.  याप्रमाणे प्रत्येक वाचक शब्द आपापल्या वाच्य विषयाला प्रकाशमान करतो.  याचप्रमाणे वेदान्तशास्त्र आत्मस्वरूपाचे ज्ञान द्यायला लागले तर आत्मा हा घटादिवत् विषय होईल.  शब्दांच्यामधून दृश्य, वाच्य, ज्ञेय विषयांचे नाम-रूप-जाति-क्रिया-गुण-धर्म-विकार यांचे वर्णन केले जाते.  परंतु आत्मस्वरूपाचे ज्ञान याप्रकारे शब्दामधून देणे शक्य नाही, कारण आत्मा हा – निर्विशेषस्वरूपत्वात् |

 

म्हणून आचार्य येथे स्पष्ट करतात की, वेदान्तशास्त्र हे जरी आत्मज्ञानाचे अंतिम प्रमाण असेल तरी ते आत्मसिद्धीसाठी नाही.  तर आत्मस्वरूपावर जो जो अध्यारोप झालेला आहे, त्याचा निरास करणे हेच शास्त्राचे प्रयोजन आहे.  सर्व श्रुति आत्मा काय आहे हे सांगत नसून, आत्मा काय नाही ?  हेचनेति नेतीति वाक्यतः |  सांगतात.  श्रुति सर्व दृश्याचा, नामरूपांचा निरास करतात.  यालाच साक्षात्कार म्हणतात – अध्यारोपापवादन्यायेन गुरुः शिष्यं उपदिशति |  हीच शास्त्राची पद्धती आहे.

 

म्हणून साधकाला आत्मज्ञान प्राप्त करावयाचे असेल तर शास्त्राची, श्रुतींची दृष्टि समजली पाहिजे.  श्रुतींचे रहस्य समजावून घेण्यासाठी केवळ स्वबुद्धि हे प्रमाण नाही.  अन्य सर्व व्यावहारिक ज्ञान बुद्धीच्या साहाय्याने घेता येते.  परंतु आत्मज्ञान घ्यावयाचे असेल तर साधकाला गुरूंची नितांत आवश्यकता आहे.  गुरु शिष्याला शास्त्राची दृष्टि देतात.  “अन्वयव्यतिरेक” किंवा “अध्यारोपअपवाद” न्यायाने गुरु शिष्याला श्रुतींचे रहस्य उलगडून दाखवितात.  शिष्याला जे ज्ञात आहे, जे माहीत आहे, जे दृश्य आहे, त्याचे ज्ञान देतात व नंतर त्याच दृश्याचा पूर्णतः निरास करतात.  सर्व अध्यास निरास झाल्यावर राहते ते अद्वय, निष्कल, मायारहित, शुद्ध चैतन्यस्वरूप !

 

 

- "प्रश्नोपनिषत् " या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति,  एप्रिल २०१२ 
- Reference: "
Prashanopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand  Saraswati, 1st Edition, April 2012



- हरी ॐ