ज्याला विवेकरूपी नेत्र नाही, तो जन्मतःच अंध
आहे असे समजावे. असा हा जन्मांध मनुष्य अत्यंत
शोचनीय असून दुर्बुद्धीने युक्त असतो. असा
दुष्ट, अविचारी मनुष्य धर्माचा सन्मार्ग सोडून अधर्मामध्ये प्रवृत्त होतो. अविचारी मनुष्याची झालेली दुर्गति पाहून सर्व लोक
त्याची कीव करतात. याउलट ज्याच्याजवळ विवेकरूपी
दिव्य चक्षु आहेत, म्हणजे ज्याला विचाराची सुंदर दृष्टि असून जीवनाला वैचारिक बैठक
आहे, तोच विश्वामध्ये विजयी होतो. कारण त्याच्या
व्यावहारिक किंवा आध्यात्मिक कोणत्याही निर्णयामध्ये दोष येत नाही. त्याचा प्रत्येक निर्णय शास्त्रप्रणित विचारामधून
झाल्यामुळे तो निर्णय धर्माला, न्यायला, नीतीला अनुसरून असतो. त्या सद्विचारी पुरुषाला जीवनामध्ये सर्व ठिकाणी
उत्तुंग यशाची प्राप्ति होते.
म्हणून हे रामा ! मनुष्याने एक क्षणभर सुद्धा विचाराचा त्याग करू नये.
विचार हाच मनुष्याचा खरा मित्र-गुरु-मार्गदर्शक
आहे. कारण विचार मनुष्याला परमात्मस्वरूपाचे
ज्ञान करून देतो. विचार साधकाला केवळ शाब्दिक
ज्ञानच नव्हे तर त्याला महान निरतिशय आनंद प्राप्त करून देतो. म्हणून विचारी मनुष्य म्हणजे गंभीर, उदास बसलेला
मनुष्य नव्हे, तर जो विचारी आहे तोच सर्वात आनंदी व सर्वदा प्रसन्न मनुष्य असतो. प्रसन्न चित्तामध्येच विचार उदयाला येतो. दुःखी,
उदास, निराश मनामध्ये किंवा कामनायुक्त मनामध्ये विचाराची निर्मिती होत नाही. मनुष्याच्या जीवनाला विचारांचे अधिष्ठान असेल तर
त्याला क्रमाक्रमाने आत्मज्ञान आणि निरतिशय आनंद प्राप्त होतो. म्हणून साधकाने विचाराचा त्याग करू नये. साधकाने विचार केल्याशिवाय एक पाऊलही टाकू नये.
येथे वसिष्ठांनी आम्रफळाचा दृष्टांत दिला आहे.
ज्याप्रमाणे झाडावर परिपक्व झालेला आंबा जसा
अत्यंत गोड लागतो, त्यामुळे आंब्याचे फळ सर्वांनाच खूप आवडते. त्याचप्रमाणे ज्याच्या अंतःकरणात परिपक्व व सुंदर
विचार आहेत, तो विचारी मनुष्य साधु-माहात्म्यांना सुद्धा खूप आवडतो. महात्मे, संत पुरुष अशा विचारी साधकाला भरभरून आशीर्वाद
देतात. आंब्याचे फळ पिकले नसेल किंवा खराब
झाले असेल तर ते चांगले लागत नाही. मात्र परिपक्व
झाल्यावर अत्यंत मधुर लागते. तसेच मनुष्यामध्ये
विचारांची परिपक्वता विचारांचे अधिष्ठान लाभलेला मनुष्य सर्व महात्म्यांच्या स्तुतीला
पात्र होतो. संत महात्मे सर्वांच्यावर प्रेम
करतातच, परंतु त्यांना विचारी मनुष्य अधिक आवडतो. विचारी मनुष्याच्या पाठीशी साधुसंतांचे संकल्प व
आशीर्वाद असतात.
- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९
- Reference: "Yogavashishtha" by Param
Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019
- हरी ॐ–