Tuesday, February 27, 2024

विश्वाचे पारमार्थिक स्वरूप | Spiritual Nature of The World

 



विश्व हे ब्रह्मस्वरूप आहे.  ज्ञान प्राप्त झाल्यानंतर ज्ञानी पुरुषाला विश्व दिसणारच !  ज्ञानी पुरुषाला हे सर्व मिथ्या आहे, हे समजले परंतु तरी सुद्धा डोळ्यांना विश्वच दिसेल.  परंतु आत तो – बाधितअनुवृत्या पश्यति |  ज्ञानानंतर जर तो विश्वामध्ये राहत असेल, व्यवहार करीत असेल, तर त्याचे हे सर्व व्यवहार, कर्म बाधितअनुवृत्तीने चालतात.

 

मरुमरीचिकावत् |  म्हणजेच जसे वाळवंटामधील वाळूवर पाणी नाही, हे समजते.  पाणी मिथ्या आहे, हे बुद्धीला समजल्यानंतर डोळ्यांना पुन्हा जरी पाणी दिसले तरी बुद्धि सतत सांगते की, तेथे पाणी नाही.  त्यामुळे तो पुरुष कधीही त्या पाण्यामध्ये प्रवृत्त होत नाही.  त्याचप्रमाणे ज्ञानी पुरुषाला या दृश्य विश्वाचे मिथ्यात्व समजले की, तो पुन्हा कधीही त्यात प्रवृत्त होत नाही.

 

याठिकाणी विश्वाचा निरास करून त्याच ठिकाणी ब्रह्मस्वरूपाचे दर्शन घेतले जाते.  म्हणून म्हणतात – आत्मा एव सत्यं अन्यत मिथ्या इति |  म्हणून अज्ञानी पुरुष अध्यास पाहतो आणि ज्ञानी पुरुष अज्ञानाचा निरास करून अध्यासाचे अधिष्ठान पाहतो.  म्हणून प्रथम विश्वाचा निरास केला पाहिजे आणि निरास करण्यासाठी प्रथम अध्यास केला पाहिजे.  अध्यारोपअपवादाभ्यां गुरुः शिष्यं उपदिशति |  विश्वाच्या दृष्टीने पाहिले तर विश्व ब्रह्मस्वरूप आहे आणि ब्रह्मस्वरूपाच्या दृष्टीने पाहिले तर विश्व मिथ्या आहे.  जसे, सर्पाच्या दृष्टीने पाहिले तर सर्प रज्जूस्वरूप आहे.  परंतु रज्जूच्या दृष्टीने पाहिले तर साप नाहीच.  तो मिथ्या, भासमान आहे.  याला म्हणतात – अन्वय आणि व्यतिरेक.

 

भाष्यकार शेवटी सिद्धान्त मांडतात – फक्त आत्मा हा एकच सत्य आहे.  जे दिसते ते सर्व विश्व मिथ्या, मनोकल्पित, भासात्मक आहे.  म्हणून आचार्य म्हणतात –  

श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तं ग्रंथकोटीभिः |

ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः ||       (शांकरभाष्य)

आचार्य सांगतात की, या अर्ध्या श्लोकामध्ये मी संपूर्ण शास्त्राचे सार सांगतो.  ब्रह्म हे सत्य आहे.  त्याव्यतिरिक्त अन्य सर्व मिथ्या आहे आणि जीव हा स्वतःच पारमार्थिक स्वरूपाने परब्रह्मस्वरूप आहे.  हाच संपूर्ण वेदांचा, श्रुतींचा निर्णय, सार, निश्चित असा अर्थ आहे.

 

 

- "मुण्डकोपनिषत् " या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मार्च २००७   
- Reference: "
Mundakopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, March 2007


- हरी ॐ




Tuesday, February 20, 2024

बंधन म्हणजे काय ? | What Is Bondage ?

 



हे रामा !  आता प्रथम मी तुला बंधन म्हणजे काय? ते सांगणार आहे.  सर्व जीवांना जन्मल्यापासून मृत्युपर्यंत बंधनाचाच अनुभव येतो.  "मी खूप बांधलो गेलोय", असे सर्वजण म्हणतात.  परंतु हे बंधन म्हणजे काय? हे समजले तर, आपोआपच मोक्षाचेही स्वरूप समजू शकेल.  म्हणून हे रामचंद्रा! तुला आता मी प्रथम बंधनाचे स्वरूप सांगतो.

 

द्रष्ट्याला दृश्याची सत्ता दिसणे म्हणजे बंधन होय.  कारण द्रष्टा हा दृश्यामुळेच बद्ध होतो.  आणि दृश्याचा अभाव झाला की द्रष्टा मुक्त होतो.  हे अंग !  हे रामचंद्रा !  दृश्य दिसणे म्हणजेच बंधन होय.  डोळे उघडले की, द्रष्टा-दर्शन-दृश्य हा व्यवहार चालू होतो.  विश्वामध्ये द्रष्टा आणि दृश्य या दोनच वस्तु आहेत.  त्याला 'अहं - मी' आणि 'इदं - हे' असे म्हणतात.  हे सर्व दिसते ते जग म्हणजे 'दृश्य' आणि दृश्याला पाहणारा 'मी' म्हणजे 'द्रष्टा' होय.  केवळ द्रष्ट्याची सत्ता असली असती,  तर काहीच समस्या नव्हती.  किंवा केवळ दृश्य असले असते तरीही काही समस्या नव्हती.  परंतु द्रष्टा आणि दृश्य एकत्र आल्याबरोबर दर्शनादि व्यवहार प्रारंभ होतो.

 

द्रष्टा-दर्शन-दृश्य हा व्यवहार चालू होणे म्हणजे द्वैताची निर्मिती आहे.  कारण जे माझ्यापासून भिन्न आहे, तेच मी डोळ्याने पाहतो.  मनाने अनुभवतो.  माझ्यापासून दृश्य भिन्न दिसू लागले की, मग समस्या निर्माण होतात.  मी, तू, हे सर्वजण, हे विश्व असे अनेक भेद निर्माण होतात.  तेथूनच सर्व संसार प्रारंभ होतो.  म्हणून दृश्य दिसणे म्हणजे बंधन आहे आणि दृश्याचा अभाव झाला की, जीव मुक्त होतो.

 

दृश्याला सत्य मानणे म्हणजेच बंधन आहे.  कारण दृश्याला सत्य मानले की, लगेचच मनामध्ये संकल्प-कामना निर्माण होतात आणि जीव बद्ध होतो.  याउलट दृश्य डोळ्यांनी पाहूनही जर मनामध्ये कामना निर्माण होत नसतील तर त्यालाच मुक्त असे म्हणतात.  म्हणून साधकाने संकल्परहित, कामनारहित होऊन व्यवहार करावा.

 

 

- "योगवासिष्ठ" (तृतीय उत्पत्ति प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, आदि शंकराचार्य जयंती २०२२   
- Reference: "Yogavashishtha
" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, Adi Shankaracharya Jayanti 2022


- हरी ॐ



Monday, February 12, 2024

बुद्धि म्हणजे काय ? | What is Intelligence ?

 



बुद्धिः अन्तःकरणस्य सूक्ष्माद्यर्थावबोधनसामर्थ्यं तद्वन्तं बुद्धिमान् इति हि वदन्ति |  बुद्धि म्हणजे – सूक्ष्म, सूक्ष्मतर आणि सूक्ष्मतम विषयांचा अर्थ म्हणजे ज्ञान घेण्याची अंतःकरणाची शक्ति होय.  यामुळे सारासार विचार करण्याची शक्ति बुद्धीला मिळते.  बुद्धीमध्ये सतत ज्ञानजिज्ञासा असल्यामुळे इंद्रियगोचर असलेल्या विषयांच्या किंवा अनुभवांच्या मागे काय आहे ?  हे जाणून घेण्याची जिज्ञासा असते.  शोधामध्ये केवळ विषयांचा विचार नसून त्याचे कारण शोधण्याची जिज्ञासा असते.

 

प्रत्येक कार्याला कारण हे असतेच.  परंतु प्रत्येक कारण हे स्वतःच कार्य असल्यामुळे त्यालाही कारण असतेच.  या नियमाने प्रत्येक करणाच्या मागे मागे जाण्यासाठी बुद्धि सतत कारणमीमांसा करीतच राहाते.  यामुळे क्रमाक्रमाने प्रत्येक कार्याचे कारण आणि कारणाचे कारण विचार करीत असताना वस्तु सूक्ष्म, सूक्ष्मतर आणि सूक्ष्मतम व्हावयाला लागते आणि बुद्धीही त्याप्रमाणे अधिक सूक्ष्म, सूक्ष्मतर आणि सूक्ष्मतम व्हावयाला लागते.  सूक्ष्मतर वस्तूंचे आकलन होऊन ज्ञान होते.  याप्रमाणे विषय कितीही सूक्ष्म असो किंवा सूक्ष्माहूनी अत्यंत सूक्ष्म असणारे प्रत्यगात्मस्वरूप असो, ते जाणण्याचे बुद्धि हेच साधन आहे.

 

श्रुति म्हणते –

मनसा एव अनुद्रष्टव्यम् |                            (बृह. उप. ४-४-१९)

दृश्यते त्वग्रयाबुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिभिः |            (कठ. उप. १-३-१२)

इंद्रिय, मन, बुद्धि यांच्याही अतीत असणारे तत्त्व मनानेच जाणता येते.  म्हणून अत्यंत शुद्ध आणि एकाग्र बुद्धीने सूक्ष्मदर्शी लोक ते तत्त्व जाणतात.

सुखमात्यन्तिकं यत्तद्बुद्धिग्राह्यमतीन्द्रियम् |                (गीता अ. ६-२१)

आत्यंतिक, निर्विषयक, निरतिशय असलेले अतींद्रिय आत्मसुख सूक्ष्म, शुद्ध, एकाग्र बुद्धीनेच ग्रहण होते.  थोडक्यात बुद्धीला अशी एक अत्यंत दुर्लभ शक्ति आहे की, जिच्या साहाय्याने सर्व विश्वाचे तर ज्ञान होतेच, परंतु सूक्ष्माहून अत्यंत सूक्ष्म असलेले तत्त्वही जाणता येते.  अशी ज्याला बुद्धि आहे, त्या पुरुषालाच शास्त्रकार बुद्धिमान असे म्हणतात.

 

 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002


- हरी ॐ



Tuesday, February 6, 2024

विचार कसा करावा ? | How To Think ?

 



हे रामा !  ज्या वेळेस साधक गुरूंच्या मुखामधून शास्त्राचे श्रवण करतो, त्यावेळी त्याची बुद्धि शुद्ध आणि परमपवित्र होते.  मनही विकाररहित, रागद्वेषरहित होऊन सत्त्वगुणप्रधान व अंतर्मुख होते.  अशा या सात्त्विक मनाने मग साधकाने अहर्निश विचार करावा.  सर्वप्रथम विचार असेल तर तो सारासार विचार होय.  चांगले-वाईट, योग्य-अयोग्य याचा सतत विचार आवश्यक आहे.

 

अविवेकी मनुष्य मनाच्या स्वाभाविक, स्वैर प्रवृत्तीनुसार वर्तन करतो.  त्यामुळे काही वेळेस मनुष्याच्या हातून वेदनिषिद्ध कर्मे घडतात.  मांसाहारादि भक्षण, अपेय पान तसेच हिंसादि क्रूर कर्मे यामध्ये मनुष्य प्रवृत्त होऊन अधःपतित होतो.  ही कर्मे करताना मनुष्याने विचारच केला नसल्यामुळे ती अनर्थाला कारण होतात.  मात्र विवेकी मनुष्य प्रत्येक कर्म करताना योग्यायोग्याचा, धर्माधर्माचा विचार करतो.  प्रयत्नपूर्वक वाईट कर्मांच्यापासून निवृत्त होऊन धर्मानुकूल वर्तन करतो.  तेच कर्म त्याला निश्चितपणे चांगले फळ देते.

 

तसेच साधकाने साधना करीत असताना साधनेला अनुकूल काय आणि प्रतिकूल काय, याचा विचार करणे आवश्यक आहे.  साधकाने विवेकाने कर्मजन्य असणाऱ्या सर्व भोगांना नाशवान जाणावे आणि त्यानंतर अनित्य, नाशवान असणाऱ्या ऐहिक व पारलौकिक उपभोगांच्यापासून निवृत्त व्हावे.  म्हणजे विचाराने पुत्रेच्छा-वित्तेच्छा-लोकेच्छा यांचा त्याग करावा आणि आत्मेच्छा पूर्ण करण्यामध्ये प्रवृत्त व्हावे.  हे विचाराचे लक्षण आहे.

 

याप्रमाणे मनुष्याने प्रथम आयुष्यात सारासार विचार करावा. नंतर धर्माधर्माचा विचार करावा.  त्यानंतर नित्य-अनित्य,सत्-असत्, आत्मा-अनात्मा हा विचार करावा.  यानंतर प्रमाणाचा विचार करावा.  आत्मस्वरूपाचे ज्ञान घेण्यासाठी केवळ आपली बुद्धि हे प्रमाण नाही.  तसेच प्रत्यक्ष, अनुमान, उपमान, अर्थापत्ति, अनुपलब्धि हेही प्रमाण नसून वेदांतशास्त्र हेच एकमेव प्रमाण आहे.  जसे आपल्याला आपला चेहरा पाहावयाचा असेल तर आरसा हेच एकमेव साधन आहे.  तसेच स्वस्वरूपाचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी वेदांतशास्त्र हेच प्रमाणभूत शास्त्र आहे.  वेदान्तो नाम उपनिषत्प्रमाणम् |  असा विचार करून साधकाने गुरुमुखामधून वेदांतशास्त्राचे श्रवण करावे.

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019


- हरी ॐ