Tuesday, December 12, 2023

मनोजय | Victory Over Mind

 




कैवल्यप्राप्तीसाठी विवेकी साधक काहीही करीत नाही.  हाता-पायाची कोणतीही विचित्र हालचाल करीत नाही.  म्हणजे योगासने, प्राणायामादि करीत नाही.  मोक्षासाठी अनेक तीर्थयात्रांना, देशांतराला जाण्याची आवश्यकता नाही.  म्हणजे मोक्षप्राप्तीसाठी देश किंवा स्थान बदलण्याची गरज नाही. मोक्षासाठी शरीराला क्लेश देण्याचीही अवशक्यकता नाही.  जर कोणी म्हणेल की, "मी माझे शरीर स्वस्थ ठेवेन, हातापायाची चालना करेन, योगासने करून अंग लवचिक ठेवेन, शेकडो प्राणायामे करेन, अनेक स्थानांच्यामध्ये जाईन, तीर्थयात्रा करेन, शरीराला खूप क्लेश देईन, उपवास करेन, अनवाणी पायाने चालत जाईन, अघोर तपश्चर्या करेन आणि आत्मप्राप्ती करेन." या कशानेही अज्ञानाचा निरास होत नाही व आत्मप्राप्ती होत नाही.  या सर्व साधकाच्या चुकीच्या कल्पना आहेत.

 

वसिष्ठ मुनि येथे आत्मप्राप्तीमध्ये सर्व बहिरंग साधनांचा निषेध करीत आहेत.  कारण या सर्व साधना केवळ अंतःकरणाच्या शुद्धीसाठी आहेत.  या साधना ज्ञानप्राप्तीसाठी साहाय्यकारी आहेत.  पण केवळ या साधना केल्या म्हणजे आपण सर्व काही मिळविले, असे साधकाने वाटून घेऊ नये.  याचे कारण आत्मप्राप्ती ही केवळ आणि केवळ पुरुषार्थानेच साध्य होते.  मनामधील वासनांचा संपूर्ण त्याग हाच केवळ आत्मप्राप्तीसाठी एकमात्र पुरुषार्थ आहे.  मनोजयानेच परमपदाची प्राप्ति होते.

 

मनोजय म्हणजे वासनांचा क्षय करणे होय.  ही फार मोठी साधना आहे.  अन्य सर्व साधना केल्या परंतु मनामध्ये अनेक भोगवासना असतील तर केलेल्या सर्व साधना व्यर्थ आहेत.  तसेच बहिरंगाने अन्य कोणतीही साधना केली नाही, परंतु मनामध्ये एकही विषयवासना नसेल म्हणजे मन पूर्णतः वैराग्यसंपन्न असेल तर आपोआपच मनावर जय प्राप्त होतो.  मन पूर्णतः संयमित होते.  संयमित मन कामरहित होते आणि याच वासनारहित मनामध्ये साधकाला निरंकुश तृप्तीचा, आत्मतत्त्वाचा अनुभव येतो.

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019


- हरी ॐ