हे रामा ! संसार हा वाळवंटाप्रमाणे अतिशय रूक्षस्थान आहे. कारण संसारामध्ये मनुष्याला अत्यंत यातना प्राप्त
होतात. मनामध्ये हजारो विषयांच्या तृष्णा असल्यामुळे
विषय उपभोगण्यासाठी मन सतत व्याकूळ होते. कितीही
उपभोगले तरी मनाची तृप्ति होत नाही. विषयांच्या
भयंकर कामना मनुष्याचे जीवन असह्य करतात. परंतु
त्याच मनामध्ये जर शम या गुणाचा उदय झाला तर ते मन अत्यंत शांत होते. शमाने मोक्ष प्राप्त होतो. शमाने परमपद प्राप्त होते. शम म्हणजे शिव व शम म्हणजेच शांति आहे. शम गुणामुळे मनामधील सर्व भ्रम नष्ट होतात. ज्याच्याजवळ शम हा गुण आहे, ज्याचे चित्त अत्यंत
शुद्ध व शांत झाले आहे, त्याचे शत्रु सुद्धा त्याचे मित्र होतात.
साधकाच्या अंतःकरणामध्ये शम या गुणाचा उदय झाला
की, त्याचे हृदयही अलंकार घातल्याप्रमाणे शोभून दिसते. त्याचे चित्त अतिशय शुद्ध होते. ज्या सत्पुरुषांच्या हृदयामध्ये शम हा गुण विकसित
होतो, असे सज्जन पुरुष जणु काही दोन-दोन कमलपुष्पांनी युक्त होतात. शम या गुणामुळे त्यांना सालोक्य, सामिप्य, सारूप्य
आणि सायुज्य या मुक्ति मिळून ते जणु काही भगवंतासारखे दिसतात. या विश्वामध्ये जितकी दुःखे आहेत, जितक्या कामना,
विषयतृष्णा आहेत, असह्य शारीरिक रोग आणि मानसिक व्याधि आहेत, संसारामधील अशा सर्व प्रकारच्या
यातना शमयुक्त चित्तामध्ये नाश पावतात. ज्याप्रमाणे
प्रकाशामुळे अंधाराचा समूळ ध्वंस होतो, त्याचप्रमाणे शम आल्यावर आधिव्याधि, तृष्णा-कामना
या सर्वांचा नाश होतो.
जो पुरुष शमयुक्त असून ज्याचे मन
अतिशय शांत झालेले असते तोच खऱ्या अर्थाने सर्व जीवांच्यावर प्रेम करतो. त्याच्यामधील ममत्व भाव, अपपर भाव नष्ट होतो. माझा-परका असा भेदभाव न करता उच्च-नीच, जात, पंथ,
धर्म, आश्रम, श्रीमंत, गरीब असा कोणताही भेदभाव न करता तो समत्वाच्या-एकत्वाच्या दृष्टीने
पाहतो. मन शमयुक्त झाले
की, ज्ञानी पुरुषाला जी शांति आणि जे परमसुख मिळते तेवढे सुख तर कुठल्याच रसायनाने
मिळत नाही. स्वर्गातील अमृत पिऊन मनुष्याला
कदाचित अमृतत्व मिळते. पण तेही नाशवान स्वरूपाचे
असते. त्यामुळे अमृतापेक्षाही शमामधील सुख
अधिक आहे. अधिक काय सांगावे ! रामा ! अरे
साक्षात् लक्ष्मीने आलिंगन देऊन सुद्धा असे सुख मिळत नाही, असे सुख शम या गुणाने प्राप्त
होते.
- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९
- Reference: "Yogavashishtha" by Param
Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019
- हरी ॐ–