Tuesday, March 28, 2023

साध्याशी एकनिष्ठता | Commitment Towards the Goal

 



व्यवहारामध्ये कोणत्याही क्षेत्रामध्ये जर यश मिळवावयाचे असेल, मग ते क्रीडा असेल, कला असेल, संगीत असेल, नृत्य असेल, काहीही असेल, जर ते साध्य प्राप्त करावयाचे असेल, तर मी माझ्या साध्याशी एकनिष्ठ असले पाहिजे.  माझ्या मनामध्ये तळमळ, व्याकुळता निर्माण झाली पाहिजे.  मला साध्याचा ध्यास लागला पाहिजे.  ध्येयप्राप्तीसाठी मी रात्रंदिवस वेडे झाले पाहिजे.  तरच अथक प्रयत्नांच्यानंतर यशश्री प्राप्त होते.  परंतु जर माझे मन साध्याव्यतिरिक्त अन्य ठिकाणी असेल, तर दुर्दैवाने जीवनामध्ये कितीही परिश्रम करूनही साध्यप्राप्ति होत नाही.  काहीतरी तीर्थयात्रा करून, सोमवार ते सोमवार उपवास करून, व्रतवैकल्ये करून आत्मप्राप्ति होत नाही.

 

जीवनामध्ये कोणतीही एखादी विद्या आत्मसात करावयाची असेल, तर त्याच्यासाठी ध्यास लागला पाहिजे.  सर्वस्व अर्पण केले पाहिजे.  त्याच्यासाठी मी आयुष्य दिले पाहिजे.  सतत विचार केला पाहिजे की, “माझ्या साध्याशी मी किती एकनिष्ठ राहिलो ?  खरोखरच माझी तळमळ आहे का ?  जिज्ञासा आहे का ?”  ज्यावेळी मी सर्वस्व देईन, त्यावेळी कोठेतरी काही तरी मिळते.  म्हणून संतांना सुद्धा जीवनामध्ये सर्वस्व द्यावे लागले.  संत रामदास स्वामी सांगतात –

देवाच्या सख्यत्वासाठी पाडाव्या जीवलगांच्या तुटी |

सर्वस्व अर्पावे शेवटी प्राण तोही वेचावा ||                     (दासबोध)

वेळ जात नाही, काहीतरी शिकायचे म्हणून एक उपनिषद शिकलो, याला शिकणे म्हणत नाही.  याचे कारण शिकण्यासाठी मनामध्ये भाव पाहिजे.  Attitude पाहिजे.

 

श्रुति सांगते –

क्षुरस्य धारा निशिता दुरत्यया दुर्गं पथस्तत्कवयो वदन्ति |       (कठ. उप. १-३-१४)

हा मार्ग तलवारीच्या धारदार पात्यावर चालण्यासारखा अवघड आणि दुष्कर आहे.  याचे कारण विश्व नाही, शास्त्र किंवा गुरूही नाहीत.  तर माझेच मन हे कारण आहे.  या मार्गामध्ये अनेक आडवाटा आहेत.  एक मुख्य राजमार्ग आहे आणि या राजमार्गावरून जात असताना अनेक फाटे आहेत.  जर राजमार्ग सोडून आपण अन्य मार्गांच्यावर गेलो, तर कधीही साध्यप्राप्ति होणार नाही.  म्हणून या साधनेसाठी आपण आपलेच मन योग्य, अनुकूल व अधिकारी बनविले पाहिजे.

 


- "मुण्डकोपनिषत् " या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति,मार्च २००७
- Reference: "
Mundakopanishad" by ParamPoojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, March 2007


- हरी ॐ