Tuesday, March 14, 2023

योगभ्रष्ट पुरुष | Realization-Failed Person

 



योगभ्रष्ट म्हणजे योगमार्गापासून च्युत झालेला, किंवा अधःपतन झालेला योगी असा नाही.  तर या जन्मामध्ये श्रवणमनननिदिध्यासना करीत असताना शरीरपतनापूर्वी त्या योग्याला आत्मसिद्धि किंवा ज्ञाननिष्ठा प्राप्त होत नाही, म्हणून त्याला योगभ्रष्ट असे म्हटले आहे.  म्हणजेच त्याला याच शरीरामध्ये जीवन्मुक्तावस्था प्राप्त होत नाही.  याठिकाणी शंका येईल की, सर्व साधना करीत असून सुद्धा त्याला शरीर पडण्यापूर्वी ज्ञाननिष्ठा किंवा जीवन्मुक्तावस्था होत नाही ?

 

१) जरी साधक इंद्रियसंयमन, मनोनिग्रह करून श्रवणमनननिदिध्यासना ही साधना करीत असेल तरी सुद्धा त्याच्या मनामधील विषयभोगवासना संपूर्ण नाहीशी झालेली नसेल.  त्यामुळे अनेक प्रकारचे द्वन्द्व, रागद्वेषांचा प्रभाव, संकल्पविकल्प, कामक्रोधादि विकार निर्माण होतात.  ते ज्ञानसाधनेमध्ये सतत प्रतिबंध निर्माण करतात.  त्यामुळे साधना करूनही ज्ञाननिष्ठा प्राप्त होत नाही.

 

२) साधना करण्याची इच्छा असेल तरी रजोगुणाच्या प्राबल्यामुळे त्याचे मन सत्वगुणप्रधान नसते.  त्यामुळे तीव्र वैराग्य, जिज्ञासा आणि मोक्षेच्छा निर्माण होत नाही.  त्यामध्ये तरतमभाव दिसतो.  काही साधकांच्या अंतःकरणामध्ये अत्यंत तीव्र मोक्षेच्छा दिसते तर काहींच्या मध्ये सर्वसाधारण, तर काहींच्या मनामध्ये लुकलुकणारी असते.  त्यामुळे साधक आपापल्या कुवतीप्रमाणे साधना करीत असेल तरी त्याचे ते प्रयत्न योगनिष्ठेसाठी अपुरे पडतात.  हा दोष शास्त्राचा किंवा गुरूंचा नाही तर स्वतःमध्ये असलेल्या संस्कारांचा आहे.

 

३) साधक दैवीगुणसंपन्न, विवेकवैराग्यसंपन्न असून सत्वगुणप्रधान असतो.  त्याच्यामध्ये तीव्र वैराग्य, जिज्ञासा आणि मोक्षेच्छाही असते.  त्याप्रमाणे तो साधनाही करीत असतो.  परंतु तरी सुद्धा त्याला ज्ञाननिष्ठा प्राप्त होत नाही.  याचे कारण – प्रारब्धवशात् |  साधक टाळाटाळ न करता अत्यंत तत्परतेने श्रद्धा आणि निष्ठेने साधना करीत असेल तरी तो शरीराचे प्रारब्ध टाळू शकत नाही, बदलू शकत नाही.  ज्ञानसाधना पूर्ण होण्यापूर्वीच जर शरीराचे प्रारब्ध संपले तर त्याची साधना अपूर्णच राहाते.  त्याला ज्ञाननिष्ठा प्राप्त होत नाही.

 

योगभ्रष्ट पुरुष निश्चितपणे दुर्गतीला म्हणजेच निकृष्ट योनीला किंवा अधोगतीला जात नाही.  मोक्षमार्गामध्ये त्याची प्रगतीच होत असते.

 


- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002


- हरी ॐ