आपण पाहतो की, व्यवहारात एखादा मनुष्य
कितीही श्रीमंत असू देत, त्यालाही मृत्यूची भीति आहेच किंवा एखाद्याजवळ अन्य
लोकांचे साहाय्य असेल, व्यावहारिक लोक, आप्त आपल्याला अन्य सर्व सहकार्य करतील,
परंतु ते आपल्याला मृत्यूच्या भीतीमधून पार नेऊ शकत नाहीत. काही वेळेस आपण मृत्यूला टाळण्यासाठी अनेक
औषधींचे सेवन करू. अॅलोपॅथी-होमिओपॅथी-आयुर्वेदिक अनेक औषधी वनस्पती, अनेक उपाय करु.
परंतु मनुष्य मृत्यूच्या भीतीपासून मात्र
मुक्त होऊ शकत नाही. काही वेळेस एखादा
साधक खूप तपश्चर्या करेल, उग्र तपश्चर्या करून अनेक सिद्धि सुद्धा मिळवेल,
योगसाधना, प्राणायामादि साधना करून इंद्रियांवर, मनावर निग्रह करेल. परंतु यापैकी कशानेही साधक मृत्यूवर जय मिळवू
शकत नाही.
आत्मविद्येचे सामर्थ्य मात्र खरे सामर्थ्य
आहे. आत्मज्ञानाच्या सामर्थ्यानेच अज्ञानाचा
ध्वंस होऊन अज्ञानजन्य सर्व कल्पनांचा निरास होतो. अहंकार-ममकारादि प्रत्यय तसेच
कर्तृत्व-भोक्तृत्वाचा निरास होतो. साधकास
अभेदस्वरूपाने परब्रह्माचे ज्ञान होते. ‘मी’
स्वतःच चिदानंदस्वरूप, शिवस्वरूप, आनंदस्वरूप आहे, ही त्याला साक्षात ‘अपरोक्षानुभूति’
येते. हेच आत्मविद्येचे सामर्थ्य आहे.
म्हणुनच आत्मज्ञानी पुरुषाचे श्रुति वर्णन
करते -
न
बिभेति कुतश्चनेति |
(तैत्ति. उप. २-४-१)
आत्मज्ञानी पुरुष भयभीत होत नाही. समोर मृत्यु दिसला तरी आनंदाने, अत्यंत स्थिर
मनाने स्वतःच्याच मृत्यूचे स्वागत करतो. तो स्वतःचे शरीर मृत्यूला समर्पित करतो. हेच आत्मज्ञानाचे सामर्थ्य आहे. हे सामर्थ्य केवळ आत्मज्ञानानेच
मिळते.
अथर्व श्रुति सुद्धा म्हणते-
नायमात्मा
बलहीनेन लभ्यः | (मुण्ड. उप. ३-२-४)
बलहीन पुरुषाला आत्मस्वरूप प्राप्त होत
नाही. म्हणून मृत्यूवर विजय प्राप्त
करून अमृतत्त्वाच्या प्राप्तीसाठी ‘आत्मविद्या’, ‘प्रतिबोधाचे ज्ञान’ हेच मुख्य
साधन आहे, कारण आत्मविद्येनेच अमृतत्व, मोक्ष प्राप्त होतो.
- "केनोपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१३
- Reference: "Kenopanishad" by Param Poojya
Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2013
- हरी ॐ–