Tuesday, October 13, 2020

अमृतत्व आणि मोक्ष | Immortality & Salvation


 

प्रतिबोधविदितं मतं अम्रुतत्वं हि विन्दते |  आत्माना विन्दते वीर्यं विद्यया विन्दतेSमृतम् |  यामधून श्रुति आत्मज्ञानाचे फळ सांगत आहे.  प्रतिबोधाच्या ज्ञानाने साधकाला अमृतत्वाची प्राप्ति होते.  अमरणभाव, मृत्युरहित अवस्था म्हणजे अमृतत्व होय. स्वर्गामध्ये सुद्धा अमृतत्वाची प्राप्ति होते.  परंतु स्वर्गलोकप्राप्ति म्हणजे आत्मज्ञानाचे फळ किंवा अमृतत्वाची प्राप्ति होऊ शकत नाही.  

 

स्वर्गलोकाचे वर्णन केले जाते –

स्वर्गे लोके भयं किंचन्नास्ति न तत्र मृत्युं जरया बिभेति |             (कठ. उप. १-१-१२)

स्वर्गामध्ये स्थूल शरीराच्या अनुषंगाने असणारी जन्ममृत्यूची भीति नाही, व्याधि, वार्धक्य नाही.  तेथे तहान-भुकेने व्याकुळ होऊन होणाऱ्या यातना नाहीत.  म्हणून स्वर्गादि ऊर्ध्वलोकांना अमृतत्व म्हटले असेल तरीही हे अमृतत्व नित्य शाश्वत तसेच निरतिशय स्वरूपाचे नाही.  त्यामुळे स्वर्गादि ऊर्ध्वलोकप्राप्ति म्हणजे मोक्ष नव्हे, कारण ते सर्व लोक कर्मजन्य असल्यामुळे अनित्य, नाशवान स्वरूपाचे, मर्यादित स्वरूपाचे आहेत.  

 

भगवान म्हणतात – पुण्यसंचय संपल्यावर जीव पुन्हा मर्त्यलोकामध्येचप्रवेश करतात.  ब्रह्मलोकापासून सर्व ऊर्ध्वलोक पुनरावर्ती स्वरूपाचे असून अल्प, अनित्य आहेत.  त्यामुळे स्वर्गप्राप्ति म्हणजे मोक्षप्राप्ति नव्हे, असे आचार्य स्पष्ट करतात.  मग मोक्ष म्हणजे काय ?  आचार्य येथे सुंदर व्याख्या करतात - अमृतत्वं अमरणभावं स्वात्मानि अवस्थानं मोक्षः |

 

मृत्युरहित, अमृतत्त्वाची अवस्था, म्हणजेच स्वस्वरूपामध्ये सुस्थिति प्राप्त करणे, म्हणजेच ‘मोक्ष’ होय.  या अवस्थेमध्ये अमरणभाव प्राप्त होतो, म्हणजे मोक्षावस्थेमध्ये ‘मी मरणार’ ही अज्ञानजन्य असणारी मृत्यूची कल्पनाच गळून पडते.  जसे गाढ झोपेमध्ये ‘मी मरणार’ ही कल्पनाच लय पावल्यामुळे आपल्याला तेथे कधीही मरणाची भीति वाटत नाही.  म्हणजेच मृत्यूची कल्पना निरास झाली की, मृत्यूची भीति सुद्धा संपते, कारण मृत्यूची भीति ही मृत्यूच्या कल्पनेमधून उगम पावली आहे.  कल्पना संपली की, भीतीही नष्ट होते.

 

 

- "केनोपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१३
- Reference: "
Kenopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2013


- हरी ॐ