Tuesday, May 12, 2020

ईश्वरोपासनेचे फलित | Result of Worshipping





सर्व जीवांची धाव पूर्णतेकडेच आहे.  पूर्णता, कृतकृत्यता निरतिशय आनंद आणि शांति प्राप्त करणे हेच सर्व जीवांचे अंतिम साध्य आहे.  आम्ही सर्वजण पूर्णतेचे उपासक आहोत.  मी जर पूर्णस्वरूप असणाऱ्या परमेश्वराची उपासना केली तर त्यामुळे मी स्वतःच परमेश्वरस्वरूप होईल.  याउलट विषयांची उपासना केली तर दुःखी होईल.  म्हणून अत्यंत शुद्ध, आनंदस्वरूप, शांतस्वरूप परमेश्वराचीच उपासना करावी.  

ईश्वराच्या उपासनेमुळे माझे मन शुद्ध, रागद्वेषरहित होऊन अंतर्मुख, ईश्वराभिमुख व्हायला लागते.  ईश्वराव्यतिरिक्त अन्य विषयांच्या वृत्ति संपतात.  कामक्रोधादि विकारांचा प्रभाव कमी कमी होऊन मन विषयासक्तीपासून काही प्रमाणात निवृत्त होते.  विषयांचे आकर्षण कमी कमी होते.  विषयांची व्यर्थता, फोलपणा कळायला लागतो.  विषयांचे महत्व (value) कमी होऊन विषय मनाला विचलित करू शकत नाहीत आणि मनावर संयमन प्राप्त होते.  तेच मन ईश्वरचिंतनामध्ये तल्लीन, तन्मय, तद्रूप होते.  मन परमेश्वराच्या जवळ जायला लागते.  

ईश्वरोपसनेमुळे रजोगुण व तमोगुणाचा प्रभाव कमी होऊन मन सत्वगुणप्रधान होते.  अंतःकरणामध्ये दैवीगुणसंपत्तीचा उत्कर्ष होतो.  मनामध्ये विवेकजन्य तीव्र वैराग्य निर्माण होते.  जितके वैराग्य अधिक, तितका आनंद अधिक.  थोडे वैराग्य थोडा आनंद, जास्त वैराग्य जास्त आनंद, पूर्ण वैराग्य पूर्ण आनंद !  याप्रमाणे साधकाला पूर्ण वैराग्य प्राप्त होते.  शम, दम, उपरम, तितिक्षा, श्रद्धा, समाधान ही षट्गुणसंपत्ति प्राप्त होते.  हीच खरी अंतरंग साधना आहे.  म्हणून आध्यात्मिक साधना ही बहिरंगाची नसून पूर्णतः मनावर केंद्रीभूत असणारी अंतरिक साधना आहे.  यासाठीच ईश्वरोपासना अत्यंत आवश्यक आहे.



- "उपासना" या परमपूज्य स्वामी स्थिताप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, जुलै २०११
- Reference: "
Upasana" by Param Poojya Swami Sthitapradnyanand  Saraswati, 3rd Edition, July 2011



- हरी ॐ

No comments:

Post a Comment