Tuesday, May 5, 2020

उपासनेचा विषय कसा असावा ? | How should be the object of Worship?




येथे प्रश्न निर्माण होईल की, उपासना कोणाची करावी ?  विश्वामध्ये दोनच पदार्थ आहेत – १) विषय आणि २) परमेश्वर.  विषय विश्वामध्ये अनंत, अगणित आहेत.  आपले मन सतत कोणत्या ना कोणत्यातरी विषयाचे चिंतन करीत असते.  विषयचिंतनाने मन कधीही शांत होऊ शकत नाही.  विषयकामना केल्यानंतर विषयप्राप्तीपर्यंत चिंता, व्यग्रता आहे आणि विषय मिळाल्यावर एक क्षणमात्र आनंद मिळतो.  मात्र लगेचच तो विषय कोणीतरी पळवून नेईल, हरवेल, नष्ट होईल याची भीति निर्माण होते.  वस्तु जितकी प्रिय तितकी भीति अधिक !  

जीवनभर कितीही विषयांचा संग्रह केला, विषयांचे उपभोग घेतले, तरीही त्यामधून कोणताही मनुष्य सुखी, आनंदी आणि यशस्वी झालेला नाही.  वस्तुतः हा दोष विषयांचा, व्यक्तींचा अथवा प्रसंगांचाही नाही.  जन्मतिथीचा, पत्रिकेचा, शनि-मंगल युतीचा, ईश्वराचाही नाही तर दोष आपल्याच अंतःकरणामध्ये आहे.  विश्वामध्ये कोणत्याही विषयामध्ये आनंद नाही.  किंवा आनंद हा विश्वामधील घट, पटादि विषयांप्रमाणे एखादा विषयही नाही.  

विषयांच्या चिंतनाने आजपर्यंत कोणीही सुखी, आनंदी झालेला नाही.  तर उलट विषयचिंतनाने मन अधिक बहिर्मुख, स्वैर, उच्छृंखल अशांत आणि अस्वस्थ होते.  जसा चिंतनाचा विषय असेल त्याप्रमाणेच ते मन होते.  म्हणूनच साधकाला कधीही असत्, अनित्य विषयांची उपासना सांगितली जात नाही.  तर साधकाने अशा एका शुद्ध, नित्य, शाश्वत, पूर्ण विषयाची उपासना करावी की, ज्यामुळे त्याचे मनही अत्यंत शुद्ध होऊन तो स्वतःच कृतकृत्य, परिपूर्ण होऊ शकेल.  मग उपासना कोणाची करावी ?  साधकासाठी ईश्वर हा एकच उपास्य होऊ शकतो.  साधकाने ईश्वराची उपासना करावी.  

सर्व जीवांची धाव पूर्णतेकडेच आहे.  पूर्णता, कृतकृत्यता निरतिशय आनंद आणि शांति प्राप्त करणे हेच सर्व जीवांचे अंतिम साध्य आहे.  मी जर पूर्णस्वरूप असणाऱ्या परमेश्वराची उपासना केली तर त्यामुळे मी स्वतःच परमेश्वरस्वरूप होईन.  याउलट विषयांची उपासना केली तर दुःखी होईन.  म्हणून अत्यंत शुद्ध, आनंदस्वरूप, शांतस्वरूप परमेश्वराचीच उपासना करावी.  



- "उपासना" या परमपूज्य स्वामी स्थिताप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, जुलै २०११
- Reference: "
Upasana" by Param Poojya Swami Sthitapradnyanand  Saraswati, 3rd Edition, July 2011



- हरी ॐ