आचार्य
म्हणतात की, ही सृष्टि म्हणजे देवाचा स्वभाव आहे. आप्तकाम पुरुषामध्ये इच्छा कशी काय निर्माण होऊ
शकेल ? असे सांगून आचार्यांनी येथे सृष्टिविषयक
अन्य सर्वच मतांचे खंडन केले आहे. ईश्वर
हा आप्तकाम म्हणजेच पूर्णकाम आहे. ज्याच्या
सर्व इच्छा पूर्ण झालेल्या आहेत, जो पूर्ण तृप्त आहे. त्याच्यामध्ये कोणतीही यत्किंचित् इच्छा निर्माण होत नाही. अतृप्त, अपूर्ण पुरुषामध्येच सतत कामना किंवा
इच्छा निर्माण होत असतात. ईश्वर हा
स्वस्वरूपाने परिपूर्ण, तृप्त, आप्तकाम असल्यामुळे त्याच्यामध्ये विश्वनिर्मितीची
इच्छा, कामना किंवा संकल्प निर्माण होणे शक्य नाही. त्यामुळे भोगासाठी किंवा क्रीडा करण्याच्या
इच्छेने सुद्धा विश्वनिर्मिती होणे शक्य नाही.
म्हणूनच
येथे आचार्यांनी अन्य सर्व मतांचे खंडन करून सांगितले की, विश्वनिर्मिती हा देवाचा
स्वभाव आहे. येथे ‘स्वभाव’ म्हणजेच ‘माया’
होय. परमात्म्याच्या स्वभावाने म्हणजेच
मायेने विश्वाची निर्मिती होते. म्हणून
विश्व हे मायेचे कार्य आहे. जसे
राज्जुमधून निर्माण झालेल्या सर्पाचे कारण केवळ रज्जूचे अज्ञान व सर्पभ्रांति हे
आहे. सर्पनिर्मितीसाठी रज्जूच्या
अविद्येशिवाय दुसरे कोणतेही कारण सांगू शकत नाही. त्याचप्रमाणे केवळ माया हेच विश्वनिर्मितीचे
कारण आहे.
दोरीवर
आपणास साप दिसत असेल तर मग त्या सापाच्या उत्पत्तीचे कारण काय आहे ? साप कोठून निर्माण झाला ? कसा निर्माण झाला ? सापाचे स्वरूप काय ? तो साप कोणत्या जातीचा आहे ? अशा सर्व विषयांच्यावर उहापोह, सखोल, सर्वांगीण
चर्चा केली तरीही “दोरीचे अज्ञान” हेच सर्पभ्रांतीचे एकमेव कारण आहे. दोरीच्या अज्ञानामुळेच दोरीमधून सर्पभ्रम
निर्माण होतो. हेच एकमेव उत्तर आहे. यापेक्षा वेगळे उत्तर कोणीही देऊ शकत नाही.
त्याप्रमाणे
हे दिसणारे दृश्य विश्व म्हणजेच परमात्मस्वरूपाच्या अधिष्ठानामध्ये मायेमुळे
निर्माण झालेला केवळ भ्रम आहे. विश्व हे देवाचा
स्वभाव म्हणजेच देवाची माया आहे. मायाकार्य
आहे. मायेच्या साहाय्याने हे सृष्टिचक्र (उत्पत्ति-स्थिति-लय)
अखंडपणे, अव्याहतपणे चालू आहे.
- "माण्डूक्योपनिषत्” या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम
आवृत्ति, डिसेंबर २०१६
- Reference: "Mandukyopanishad" by ParamPoojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, December 2016
- Reference: "Mandukyopanishad" by ParamPoojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, December 2016
-
हरी ॐ–
No comments:
Post a Comment