आधारभूत
आत्म्याचा निर्देश शब्दांनी करण्यास काय हरकत आहे ? दोन सत् वस्तूंच्यामध्ये संबंध येऊ शकतो. परंतु एक सत् व दुसरी असत् अशा वस्तूंच्यामध्ये संबंध येऊ
शकत नाही. कारण असत् वस्तु ही अवस्तुरूप आहे. म्हणजे रज्जुमधील
कल्पित सर्प ही वस्तुच प्रत्यक्ष अस्तित्वात नाही. त्यामुळे प्रत्यक्ष अस्तित्वात नसणाऱ्या असत् वस्तूमध्ये व सत् वस्तूमध्ये संबंध होऊ शकत नाही. त्यामुळे
त्याचे वर्णन शब्दाने करता येत नाही.
त्याप्रमाणेच
तुरीय आत्मस्वरूप हे ‘गाय’ वगैरेदींच्याप्रमाणे अन्य प्रमाणांचाही विषय होत नाही. गाय वागैरेदि विषय प्रत्यक्ष डोळ्यांना दिसतात. म्हणजेच ते विषय प्रत्यक्षादि प्रमाणाचे विषय
होतात. परंतु तुरीय आत्मस्वरूप हे
निरुपाधिक, निर्विशेष, इंद्रियअगोचर असल्यामुळे ते प्रत्यक्षादि प्रमाणांचा विषय
होत नाही. आत्मस्वरूप आपण डोळ्यांनी
पाहू शकत नाही. इंद्रियांनी अनुभवू शकत
नाही. ते ज्ञानेंद्रियांचा विषय होत नाही.
ते स्वरूप कर्मेंद्रियांनी ग्रहण करता येत
नाही. ते स्वरूप मन-बुद्धीला आकलन होऊ शकत
नाही. आत्मस्वरूपाचे अन्य कोणत्याही
गोष्टीवरून अनुमान काढता येत नाही. तसेच,
आत्मस्वरुपाला अन्य कशाचीही उपमा देता येत नाही, कारण आत्मस्वरूपाव्यतिरिक्त
अन्य दुसरी वस्तूच अस्तित्वात नाही. म्हणुनच
आत्मा हा कोणत्याही प्रमाणाचा विषय होत नसल्यामुळे त्याला ‘अप्रमेय’ असे म्हटले
जाते.
थोडक्यात,
तुरीय आत्मस्वरूपामध्ये कोणत्याही प्रकारचा संबंध, जाति, क्रिया, गुण, नाम, रूप
या सर्वांचा अत्यंत अभाव आहे. म्हणुनच ते
स्वरूप शब्दाने निर्देशित करता येत नाही. शब्द हे वस्तूचे नामरूप गुणधर्म जातिक्रियासंबंध
हे सांगण्यामध्ये प्रवृत्त होतात. इतकेच
शब्दांचे सामर्थ्य आहे. नामरूपादींच्याही अतीत
असणाऱ्या वस्तूंचे वर्णन करण्याची शक्ति शब्दांच्यामध्ये नाही. म्हणून आत्मस्वरूपाचा निर्देश श्रुति येथे
कोणत्याही विशिष्ठ नावाने करीत नसून- नान्तःप्रज्ञम् | असा निषेधरूपाने
करीत आहे.
- "माण्डूक्योपनिषत्” या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम
आवृत्ति, डिसेंबर २०१६
- Reference: "Mandukyopanishad" by ParamPoojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, December 2016
- Reference: "Mandukyopanishad" by ParamPoojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, December 2016
-
हरी ॐ–
No comments:
Post a Comment