आचार्य
‘अथवा’ या पदाने पक्षांतर करून पुन्हा एकदा सर्वसामान्य साधकांच्यासाठी ‘नमः’चा
अर्थ सांगतात. मागील श्लोकामध्ये नमः
म्हणजेच ‘ध्यानम्’ असा अर्थ सांगितला. ध्यानसाधना किंवा निदिध्यासना करणे सर्वच
साधकांना शक्य नाही. अधिकारिभेदात् | साधकांच्यामध्ये मंद, मध्यम, अधम असे अनेक प्रकार असल्यामुळे जोपर्यंत
अंतःकरणामध्ये रजोगुण आणि तमोगुणाचा प्रभाव आहे, तोपर्यंत ध्यानसाधनेमध्ये मन
कधीही एकाग्र होऊ शकत नाही. इतकेच नव्हे,
तर रागद्वेषादि दोषांच्यामुळे शास्त्रप्रचीति, गुरुप्रचीति किंवा आत्मप्रचीतीही
शक्य नाही. म्हणून निदिध्यासना ही
फक्त उत्तम, सत्त्वगुणप्रधान, अंतर्मुख, विषयासक्तिरहित, वैराग्यशील असणाऱ्या
साधकांच्यासाठीच सांगितलेली आहे. यासाठीच
आचार्य येथे मंद, मध्यम अधिकाऱ्यांच्यासाठी सूचित करतात – अथवा दास एवाहं अहं दास इतीरणम् |
साधक
प्रार्थना करतो की, “हे भगवंता ! मी तुझा दास
आहे. मी निश्चितपणे तुझा दासच आहे. कारण मी अद्वैत ज्ञान जाणू शकत नाही. तू आणि मी दोघेही एकरूप झालो तर मी सेवा कोणाची
करावी ? हा मला प्रश्न आहे. सेवेशिवाय मी जीवन जगूच शकत नाही. म्हणून तू माझा स्वामी आणि मी सेवक आहे.” येथे ‘दासः’ या शब्दाची आचार्य मुद्दाम
द्विरुक्ति करून साधकांच्या मनामध्ये दास्यत्वाचा भाव ठसवितात. हाच ‘नमः’ या शब्दाचा अर्थ आहे. हाच अर्थ वेदांच्यामधून, शास्त्रामधून,
श्रीमद्भगवद्गीतेमधून सांगितलेला आहे.
“भगवंता
! मी अत्यंत अज्ञानी, मर्यादित आहे. माझ्या अंतःकरणामध्ये अनंत वासना थैमान घालीत
आहेत. मी भवसागरामध्ये पूर्ण बुडालो आहे. त्यामधून पार जाण्यासाठीच मी तुला अनन्य भावाने
शरण आलो आहे. माझ्यामध्ये कोणत्याही
प्रकारची साधना, उपासना, निदिध्यासना करण्याची शक्ति नाही. अद्वैत ज्ञान तर माझ्यापासून फारच दूर आहे. जपामध्ये माझे मन एकाग्र होत नाही. भजन करावे तर ताल, सूर याचे ज्ञान नाही.
भजनामध्ये, कीर्तनामध्ये, नामस्मरणामध्ये तमोगुणाचे आवरण येऊन मी निद्राधीन होतो. कोणतीच साधना जमत नसल्यामुळे मी निराश होतो. म्हणूनच भगवंता ! मी तुझी फक्त सेवा करू शकतो. मी तुझा सेवक आहे.”
- "ॐ नमः
शिवाय" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद
सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, मार्च
२०१५
- Reference: "Om Namah Shivay" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 3rd Edition, March 2015
- Reference: "Om Namah Shivay" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 3rd Edition, March 2015
-
हरी ॐ –
No comments:
Post a Comment