साधकाने
निश्चित जाणून घ्यावे की, व्यावहारिक कर्तव्य हेच जीवनाचे अंतिम साध्य नाही. तर ते प्रसंगानुरूप व अवस्थेनुरूप साधन आहे. जीवनाचे साध्य आत्मशांति प्राप्त
करणे हेच आहे. आत्मकल्याणं
एव कर्तव्यम् | आत्मकल्याण हेच खरे कर्तव्य आहे. तोच जीवनाचा परमपुरुषार्थ आहे. म्हणून शास्त्राचे श्रवण-मनन करून जीवनाचा
उद्धार करून घ्यावा, कारण भगवान म्हणतात स्वतःचा उद्धार स्वतःच केला पाहिजे. स्वतःला कधीही कमी लेखू नये. आपणच आपले मित्र व आपणच आपले शत्रु आहोत. म्हणून – वाळूचे कण रगडीता तेलही गळे | या न्यायाप्रमाणे स्वतःचा पुरुषार्थ कधीही
टाकू नये. त्यामध्ये चालढकल, टाळाटाळ करू
नये. व्यवहाराला फाजील महत्व देऊ नये.
यासाठी
व्यवहारामध्ये वाहत न जाता त्यावर संयम ठेवावा आणि आयुष्याचा उपयोग श्रवणमननादि
साधना करण्यामध्ये घालवावा. बाकी सर्व
व्यवहार त्याला अनुरूप करावा. हेच योग्य
आहे. आहारविहार, व्यावहारिक कर्म यावर
संयमन आवश्यक आहे. त्याचप्रमाणे झोप आणि
जागण्यावर सुद्धा साधकाचा संयम पाहिजे. म्हणजेच
आवश्यक तेवढी झोप घ्यावी व आवश्यक तेवढे जागावे. योग्य आणि आवश्यक तितक्या निद्रेने शरीर व मन
अत्यंत उत्साही, प्रसन्न होते. आळस वगैरे
कमी होऊन मनाची व बुद्धीची अंतरिक सावधानता आणि एकाग्रता वाढते. सूक्ष्म विचार करण्याची शक्ति वाढते. त्यामुळे इंद्रियांचा सर्व व्यापार सुद्धा
संयमित होतो. गुणांचा उत्कर्ष होतो. असे मन श्रवणमननादि साधनेला अनुकूल होते.
अशा
प्रकारे ज्या साधकाचे जीवन नियमित आणि संयमित आहे, आचार-विचार शुद्ध आहेत,
त्याला योगाभ्यास करताना अडथळे येत नाहीत. जरी आले तरी निराश न होता तो आत्मविश्वासाने आणि
जिद्दीने प्रयत्न करून सहजपणे पार करतो. हळूहळू मनाचे विक्षेप, व रागद्वेषांचा होणारा
परिणाम कमी होतो आणि अभ्यासाने अप्रतिबद्ध स्वरूपाची सुस्थिति प्राप्त होते. ज्ञाननिष्ठा प्राप्त होते. सर्व मानसिक दुःखांचा निरास होऊन सहजस्वाभाविक
असलेली आत्मशांति प्राप्त करतो. थोडक्यात
त्या साधकाला योगसिद्धि प्राप्त होते.
- "श्रीमद्
भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द
सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, डिसेंबर २००२
- Reference: "Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, December 2002
- Reference: "Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, December 2002
-
हरी ॐ –
No comments:
Post a Comment