Wednesday, May 29, 2019

अनात्म्याचे तादात्म्य | Mis-Identification with the Non-Conscious




वस्तुतः जन्म व मृत्यु शरीराला आहेत.  परंतु शरीर जन्माला आले की, मी जन्माला आलो, ही पहिली कल्पना करतो.  ‘मी’ जन्माला आलो असेन तर ‘मी’ मारणार, ही दुसरी कल्पना निर्माण करतो.  तसेच, शरीर भिन्न-भिन्न अवस्थेमधून जात असताना ‘मी’ बालक, ‘मी’ तरुण, ‘मी’ उंच, ‘मी’ कृश, ‘मी’ लठ्ठ, अशा कल्पना करतो.  शरीराला रोग झाला की, ‘मी’ रोगी किंवा ‘मी’ निरोगी असे म्हणतो.  इंद्रियांच्या अनुषंगाने ‘मी’ अपंग, ‘मी’ बहिरा, ‘मी’ अंध वगैरे म्हणवून घेतो.  प्राणाशी तादात्म्य पावून ‘मी’ क्षुधातृषार्त होतो.  

मनाशी तादात्म्य पावून जसे मन तसा ‘मी’ बनतो.  मनाचे तर अनंत विकार आहेत.  क्षणाक्षणाला मन बदलते.  काही वेळेस चांगल्या वृत्ति व पुष्कळ वेळेस वाईट वृत्ति, उर्मी, कामक्रोधादि विकार निर्माण होतात.  मन प्रसन्न असेल तर ‘मी’ प्रसन्न होतो व मन निराश, भकास झाले की, ‘मी’ सुद्धा निराश व उद्विग्न होतो.  याप्रमाणे आज आपले जीवन पूर्णतः मनाशी तादात्म्य पावल्यामुळे मनावर अवलंबून आहे.  मन मला नाचविते.  मनामध्येच घोर संसाराचा अनुभव येतो.  

यानंतर बुद्धीशी तादात्म्य पावून ‘मी’ स्वतःला ज्ञानी किंवा अज्ञानी समजतो.  चित्ताशी तादात्म्य पावल्यामुळे मला स्मृति किंवा विस्मृति यांची जाणीव होते.  अहंकाराशी तादात्म्य पावल्यामुळे आपल्यामध्ये गर्व, मानित्व किंवा अभिमानाची वृत्ति निर्माण होते.  ‘मी’ स्वतःभोवती खोट्या प्रतिष्ठेच्या अनेक कल्पना निर्माण करतो.  याप्रमाणे मी – अनात्मनि आत्मभाव निर्माण करतो.  अनात्मस्वरूप असणाऱ्या कार्यरूप, दृश्य, जड, अचेतन, अनित्य, क्षणभंगुर देहादि संघाताशी तादात्म्य पावून घोर शोकमोहरूपी संसारामध्ये बद्ध होतो.  जन्ममृत्युरूपी चक्रामध्ये अडकतो.  




- "केनोपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१३
- Reference: "
Kenopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2013 


- हरी ॐ


No comments:

Post a Comment