Tuesday, June 4, 2019

त्यागामधून जीवनमुक्तावस्था | Life-Liberation Through Renunciation




श्रुति म्हणते –
न कर्मणा न प्रजया धनेन त्यागेनैके अमृतत्त्वमानशुः |     (नारा. उप. २-१२)
कर्माने, प्रजेने अथवा धनाने अमृतत्त्वाची प्राप्ति होत नसून फक्त त्यागानेच होते.  

परमात्म्याने इंद्रियांची स्वाभाविक प्रवृत्ति बहिर्मुख बनविल्यामुळे जणु काही इंद्रियांची हिंसाच केलेली आहे.  त्यामुळे जीव बाह्य विषयांनाच पाहतो.  अंतरात्म्याला पाहत नाही.  एखादाच धीर पुरुष इंद्रियांच्या बहिर्मुख प्रवृत्तीवर संयमन करून अमृतत्त्वाची इच्छा करतो.  

किंवा –
यदा सर्वे प्रमुच्यन्ते कामा येSस्य हृदि श्रिताः |
अथ मर्त्योSमृतो भवति अत्र ब्रह्म समन्श्रुते ||            (कठ. उप. २-३-१४)
जेव्हा अंतःकरणामधील सर्व कामनांचा निःशेष त्याग होतो, तेव्हाच मर्त्य जीव अमृतस्वरूप होऊन त्याला ब्रह्मस्वरूपाची प्राप्ति होते.  या सर्व श्रुतींच्यावरून सिद्ध होते की, जोपर्यंत अज्ञानमूलक वासना नाहीशा होत नाहीत, तोपर्यंत साधकाला आत्मस्वरूपाची प्राप्ति होणे शक्य नाही.  

अज्ञानाच्या नाशाशिवाय निःशेष कामनात्याग शक्य नाही आणि आत्मज्ञानाच्या प्राप्तीशिवाय आत्मअज्ञानाचा ध्वंस होणे शक्य नाही.  म्हणूनच आचार्य येथे फार सुंदर शब्द वापरतात – विशिष्टधीमत्त्वमन्तरेण श्रोत्रादिआत्मभावः परित्यक्तुं न शक्यते |  म्हणून जो आत्मज्ञानाच्या साहाय्याने देहादि आत्मभावाचा, अहंभावाचा त्याग करतो, त्यालाच जीवनमुक्तावस्था प्राप्त होते.  तो जिवंत असतानाच, देहपातापूर्वीच या संसारबंधनातून मुक्त होतो.  


- "केनोपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१३
- Reference: "
Kenopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2013



- हरी ॐ


No comments:

Post a Comment