Tuesday, March 26, 2019

प्राण कसा निर्माण झाला ? | Origin of Life-Breath



सत्य, अक्षर, निरतिशय असणाऱ्या आत्म्यापासून प्राण उत्पन्न झाला.  तो प्राण कसा निर्माण झाला ?  हे सांगण्यासाठी श्रुति येथे दृष्टान्त देत आहे.  

जसे, पुरुषापासून त्याची छाया म्हणजेच सावली उत्पन्न होते, तसेच आत्म्यामधून प्राण निर्माण होतो.  पुरुषाला हात-पाय-डोके वगैरे अवयव असणारा पुरुष हा निमित्त होतो व त्यापासून नैमित्तिकी छाया निर्माण होते. हे लोकप्रसिद्ध आहे.  पुरुषाचा सावयव देह हा सत्य असून त्यामधून त्याची अनृत-असत्य भासात्मक असणारी सावली निर्माण होते. सावली ही पुरुषामध्ये समर्पित होते.  म्हणजेच सावली ही पूर्णतः पुरुषावर अवलंबून असते.  जसा पुरुष हलतो तशी छाया हलते.  छायेचे अस्तित्व सर्वस्वी पुरुषाच्या अस्तित्वावर अवलंबून आहे.  

त्याप्रमाणेच आत्म्यामधून प्राणरूपी छाया निर्माण होते.  आत्मा हा निमित्त असून प्राण हा नैमित्तिक आहे.  म्हणून प्राण हा आत्म्यामध्येच समर्पित होतो.  आत्मा हा सत्य असून प्राण हा अनृत, भासात्मक आहे.  या सर्व अध्यासाला आत्मा हेच सत्य अधिष्ठान आहे.  आत्माच प्राण व अप्राण या सर्वांना व्याप्त करतो.  

ज्याप्रमाणे पाण्यामधून तरंग-लाटा-बुडबुडे निर्माण होऊन पाण्यामुळेच त्यांना सत्ता प्राप्त होते, ते पाण्यामध्येच अस्तित्वात असतात किंवा आपल्याला आरशामध्ये एखादी नागरी दिसते त्या नगरीला आरशाचीच सत्ता असून आरशामध्येच ती अस्तित्वात असते.  त्याप्रमाणेच, प्राण हा आत्म्यापासून निर्माण होतो.  प्राणाला स्वतःची स्वतंत्र सत्ता नसून ती आत्म्याचीच सत्ता आहे.  वस्तुतः आत्मा हा स्वस्वरूपाच्या दृष्टीने, पारमार्थिक तत्त्वाच्या दृष्टीने प्राणरहित, मनरहित आहे.  मात्र उपाधीच्या दृष्टीने पाहिले तर आत्म्यामधूनच प्राणाची उत्पत्ति होते.  जसे देहामधून देहाची भासात्मक छाया उत्पन्न होते, तसेच आत्म्यामधून अध्यस्त प्राण निर्माण होतो.  


- "प्रश्नोपनिषत् " या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति,  एप्रिल २०१२ 
- Reference: "
Prashanopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand  Saraswati, 1st Edition, April 2012



- हरी ॐ


Tuesday, March 19, 2019

इंद्रियांच्या मागची शक्ति – प्राण | Force Behind the Senses




कोणाच्या प्रेरणेने हे मन विषयांच्यापर्यंत धावते ?  कोणाच्या प्रेरणेने प्राण, वाचा, नेत्र, कान वगैरे इंद्रिये स्वव्यापारामध्ये प्रवृत्त होतात ?  यावर श्रुति उत्तर देते –
श्रोत्रस्य श्रोत्रं मनसो मनो यत् |  वाचो ह वाचं स उ प्राणस्य प्राणः |  चक्षुषः चक्षुः |  (केन. उप. १-२)
कानाचा कान, मनाचे मन, वाचेची वाचा, प्राणाचा प्राण, नेत्राचा नेत्र जो आहे, तोच या सर्व इंद्रियांना प्रेरणा व स्फूर्ति देतो.  त्याच्याचमुळे ज्ञानेंद्रिये, कर्मेंद्रिये व अंतःकरणाचे सर्व व्यापार चालतात.  

ज्ञानेंद्रिये –    कर्ण               श्रवण (ऐकणे)
त्वचा              स्पर्शग्रहण (स्पर्श घेणे)
चक्षु               दर्शन (पाहणे)
जिव्हा             रसग्रहण (चव घेणे)
घ्राणेंद्रिय           गंधग्रहण (वास घेणे)
कर्मेंद्रिये -    वाक (वाचा)         बोलणे
पाणि (हात)         आदान-प्रदान करणे (देणे-घेणे)
पाद (पाय)          चालणे
पायु (गुदद्द्वार)      मलविसर्जन करणे
उपस्थ (प्रजनेन्द्रिय)  प्रजनन करणे
अंतःकरण -   मन               संकल्पविकल्प करणे
बुद्धि               निर्णय घेणे
चित्त              स्मरण करणे
अहंकार            अभिमान करणे

याप्रमाणे हे सर्व व्यापार प्राणाच्या अस्तित्वामुळेच चालतात.  प्रणामुळेच शरीराला सत्ता व पावित्र्य प्राप्त झालेले आहे.  जसे मंदिराच्या गाभाऱ्यात परमेश्वराच्या विग्रहाच्या स्थापनेनेच मंदिर पवित्र बनते.  म्हणूनच आपण त्यास “प्राणप्रतिष्ठा” असे म्हणतो.  प्राणप्रतिष्ठेशिवाय त्यास मांगल्य प्राप्त होत नाही.  


- "प्रश्नोपनिषत् " या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति,  एप्रिल २०१२ 
- Reference: "
Prashanopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand  Saraswati, 1st Edition, April 2012



- हरी ॐ


Tuesday, March 12, 2019

तीन प्रमाण | Three Bases





प्रत्यक्षानुमानागमैः |  प्रत्यक्ष, अनुमान व आगम प्रमाण या तीन्हींचा संबंध यावा.  जीवन जगत असताना मनुष्याने या तीन्हीही प्रमाणांच्या साहाय्याने विचार करावा.  प्रत्यक्ष प्रमाण याचा अर्थच – मला जे दिसते ते सर्व विश्व सत्य आहे.  परंतु प्रत्यक्ष प्रमाणाबरोबरच अनुमान प्रमाण आवश्यक आहे, कारण पुष्कळ वेळेला व्यवहारात सुद्धा जे मला प्रत्यक्ष डोळ्यांना सत्य दिसते, ते वस्तुतः भासात्मक असते.  तो केवळ एक भास असतो.  

जसे आपण धावत्या गाडीत बसल्यावर आपल्याला रस्त्यावरची झाडे पळताना दिसतात व आपण स्थिर बसलो आहोत, असे वाटते, परंतु प्रत्यक्षात मात्र बरोबर याच्या उलट असते.  आपण गतिमान असून झाडे मात्र स्थिर असतात.  म्हणून केवळ प्रत्यक्ष प्रमाण हे ज्ञानाचे साधन होऊ शकत नाही.  तर त्यासाठी काही वेळेस अनुमान प्रमाण आवश्यक आहे.  जसे – यत्र यत्र धूमः तत्र तत्र वन्हिः |  जेथे जेथे धूर आहे तेथे अग्नि हा असलाच पाहिजे.  येथे धुरावरून अग्नीचे अनुमान केले आहे.  अग्नि हा प्रत्यक्ष डोळ्यांना दिसला नाही तरी धुराच्या ठिकाणी अग्नि हा असतोच, हे अनुमान प्रमाण आहे.  

यानंतर तिसरे प्रमाण म्हणजे आगम प्रमाण होय.  आगम प्रमाण म्हणजे शब्द प्रमाण म्हणजेच वेद प्रमाण होय.  याप्रमाणे मनुष्याने प्रत्यक्ष-अनुमान-आगम या तीन प्रमाणांच्या साहाय्याने, निरपेक्ष बुद्धीने विचार करावा.  थोडक्यात आई-वडिल-आचार्य, वेदस्मृतिआचार्य व प्रत्यक्ष-अनुमान-आगम या तीन प्रकारच्या संबंधांच्यामधून मनुष्याची बुद्धि प्रगल्भ, शुद्ध होते.  



- "प्रश्नोपनिषत् " या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति,  एप्रिल २०१२ 
- Reference: "
Prashanopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand  Saraswati, 1st Edition, April 2012



- हरी ॐ

Tuesday, March 5, 2019

संस्कारवर्ग आणि वृद्धाश्रम | Behavior Classes and Old-age Homes




प्राचीन काळामध्ये गुरुकुल परंपरा होती.  गुरुकुल परंपरा हा आपल्या हिंदु संस्कृतीचा आत्मा आहे.  परंतु काळाच्या ओघात आधुनिकतेच्या नावाखाली गुरुकुल परंपरेचे आपल्या समाजातून उच्चाटन झाले.  यामुळे सांप्रतच्या समाजामध्ये स्वधर्म, आपली दिव्य संस्कृती, आपल्या परंपरा या सर्वांचे घोर अज्ञान आहे.  

अन्य धर्मांचे निरीक्षण केले तर दिसते की, प्रत्येक मुस्लिम व्यक्तीस कुराण माहीत असते, प्रत्येक ख्रिश्चन व्यक्तीस बायबल माहीत असते, परंतु आपल्यापैकी कित्येकांना वेद-उपनिषदे यांचे अज्ञान आहे.  आपल्या या ग्रंथांची नावे सुद्धा माहीत नसणे, ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे.  याचे कारण एकच आणि ते म्हणजे गुरुकुल परंपरेचा व संस्कारांचा अभाव !  म्हणून आज ठिकठिकाणी संस्कारवर्ग वाढत आहेत.  

संस्कारवर्गांच्याबरोबर वृद्धाश्रमांची संख्या ही वाढत आहे.  आपल्या शरीरामध्ये नऊ महिने जी माता गर्भाला आपला अविभाज्य भाग म्हणून संभाळते, जन्मल्यानंतर डोळ्यात तेल घालून संगोपन करते, वेळप्रसंगी स्वतः उपवाशी राहून आपल्या मुलाला भरवून त्याच्या डोळ्यातील आनंद निरखते, त्या आईला वेळ आल्यावर जो मुलगा घरात अडचण झाली म्हणून विभक्त करून घराच्या बाहेरील बाल्कनीमध्ये, अत्यंत दयनीय अवस्थेत तिची व्यवस्था करतो, किंवा तिथेही अडचण होते म्हणून वेळात वेळ काढून वृद्धाश्रमात जाऊन तिची नावनोंदणी करतोपरदेशातून दर महिन्याला तिच्या नावे कागदाच्या चेकवर सही करून पाठवितो, त्या मुलाला काय म्हणावे ?  सुशिक्षित, आधुनिक, प्रगत, विकसित यापैकी कोणती पदवी द्यावी ?  

ज्या भूमीत धरणीला सुद्धा मातृत्व प्रदान करून तिला परकियांच्या श्रुंखलांच्यामधून मुक्त करण्यासाठीवंदे मातरम् !  म्हणत हजारो क्रांतीवीरांनी, भारतमातेच्या सुपुत्रांनी स्वतःला मृत्यूच्या दरीत हसत-हसत लोटून दिले, त्याच भूमीत मातृत्वाच्या अत्यंत पवित्र पदाला इतकी अवकळा यावी, यापेक्षा अधिक दैवदुर्विलास तो कोणता ?  


- "प्रश्नोपनिषत् " या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति,  एप्रिल २०१२ 
- Reference: "
Prashanopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand  Saraswati, 1st Edition, April 2012



- हरी ॐ