हे
प्राणा ! ज्या प्रजापतीचे श्रुतीने पूर्वी
वर्णन केले तोच तू प्रजापतिरूप असून तू सर्व गर्भांच्यामधून संचार करतोस. गर्भामध्ये प्राण प्रतिष्ठित असतो. तू पित्याच्या गर्भात रेतरूपाने व मातेच्या
गर्भात पुत्ररूपाने संचार करतोस. त्या
गर्भामधून तूच प्रतिरूपाने जन्माला येतोस. तूच माता-पिता यांचे प्रतिरूप होतोस. सर्व देहांच्यामधून एकच प्राण अनेक प्रकारचे
वेष धारण करतो. ब्रह्माजीपासून
पिपीलिकापर्यंत सर्व देहांची या प्राणाला एकेक आकृति प्राप्त होते. देहाकृति या भिन्न-भिन्न आहेत. मात्र त्यामधील प्राण एकच असून तो सर्वात्मा,
सर्वांतर्यामी आहे.
यामुळेच
हे प्राणा ! मनुष्यादि प्रजा आपल्या
चक्षुरादि इंद्रियांच्या साहाय्याने तुलाच बलि अर्पण करतात, कारण तूच या
कार्यकारणसंघातरूपी शरीरामध्ये निवास करतोस. सर्व चक्षुरादि इंद्रिये आपल्या कक्षेत
येणाऱ्या आपापल्या शब्दस्पर्शरूपरसगंधादि विषयांचे ग्रहण करतात आणि ते विषय
प्राणाला उपहार म्हणून अर्पण करतात. याचा
अर्थच या सर्व विषयांच्या संवेदना प्राणाला पोहचवितात. म्हणून प्रणालाच सर्व विश्वाची जाणीव होते.
येथे
श्रुति कल्पना करते की, सर्व इंद्रिये प्राणाची जणु काही पूजा करून त्यास सर्व
अर्पण करतात, कारण पूर्वी कथा सांगितलेली होती की, सर्व इंद्रिये स्वतःलाच श्रेष्ठ
समजत होती. परंतु त्यांना नंतर अनुभवाने
प्राणाचे श्रेष्ठत्व समजून त्यांनी प्राणाची स्तुति केली. यासाठीच सर्व इंद्रिये प्राणाची पूजा करून त्यास
बलि, सर्व विषयांचे ग्रहण केलेले ज्ञान संवेदना अर्पण करतात, कारण त्या सर्व
इंद्रियांमध्ये, शरीरांच्यामध्ये प्राणच संनिविष्ट आहे. “प्राण” हाच या विश्वामध्ये एकच भोक्ता असून
अन्य सर्व भोग्य आहे. त्यामुळे ते सर्व
भोग्य भोक्ता असणाऱ्या प्राणाला अर्पण करणे, हेच योग्य आहे. म्हणूनच हे प्राणा ! आम्ही हे सर्व तुलाच अर्पण करीत आहोत, असे
इंद्रिये म्हणतात.
- "प्रश्नोपनिषत्
" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद
सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम
आवृत्ति, एप्रिल २०१२
- Reference: "Prashanopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2012
- Reference: "Prashanopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2012
-
हरी ॐ –
No comments:
Post a Comment