अध्यात्मविद्या
ही प्रश्नोत्तर रूपानेच दिली जाते. तो
गुरुशिष्यांचा प्रश्नोत्तररूप संवाद असतो. शिष्य प्रश्न विचारतो व गुरु त्यास यथार्थ व
सम्यक् ज्ञान देतात. त्यामुळे
दुर्विज्ञेय, समजण्यास अत्यंत कठीण असणारे आत्मतत्त्व शिष्याला सुलभ, सुविज्ञेय
होते. मात्र शिष्याने अत्यंत नम्र
भावाने व खऱ्या जिज्ञासेने प्रश्न विचारावेत. प्रश्न विचारण्याचेही अनेक प्रकार किंवा अनेक
प्रयोजने असतात.
पुष्कळ
वेळेला प्रश्न विचारायचे म्हणून सहज विचारले जातात. काही वेळेला गुरूंना किती ज्ञान आहे, हे
तपासण्यासाठी प्रश्न विचारतात. तर काही
वेळेला शिष्य स्वतःचे ज्ञान प्रदर्शित करण्यासाठी प्रश्न विचारतो. सह-अध्ययन करताना काही वेळेला दुसऱ्या शिष्यांना
कमी लेखून हिणवण्यासाठी प्रश्न विचारले जातात. काही वेळेला दुसऱ्याचे मत खंडन करण्यासाठी तर
काही वेळेला - हे असेच का ? अशा
दुराग्रहासाठी प्रश्न विचारले जातात.
अशा
प्रकारे विचारलेल्या प्रश्नांचा तसा काहीही उपयोग होत नाही. कारण त्यामागे जिज्ञासा, जाणून घेण्याची इच्छाच
नसते. केवळ शब्दाला शब्द, तर्काला कुतर्क,
वादाला प्रतिवाद होऊन त्यामुळे मन शांत न होता उलट अधिक अशांत, उद्विग्न व अस्वस्थ
होते. येथे पिप्पलाद
मुनींनी सांगितले की, यथाकामं प्रश्नान्
पृच्छत | तुमच्या मनाप्रमाणे, इच्छेप्रमाणे प्रश्न विचारा. याचा अर्थ, मन मानेल तसे प्रश्न विचारा असा होत
नाही. तर येथे - यथाकामम् | म्हणजे तुमची ज्या विषयाची जिज्ञासा असेल, जे काही तुम्हाला जाणून घ्यावयाचे
असेल त्याविषयी तुम्ही प्रश्न विचारावेत.
यानंतर
ही पिप्पलाद मुनि नम्रतेने या शिष्यांना सांगतात की, तुम्ही विचारलेल्या सर्वच
प्रश्नांची उत्तरे गुरूंनी दिलीच पाहिजेत, असे गुरूंच्यावर बंधन नाही. एखाद्याने अहंकाराने किंवा वर सांगितलेल्या
प्रकाराप्रमाणे प्रश्न विचारल्यास त्याची उत्तरे देण्यास गुरु बांधील नाहीत. शास्त्राचा नियम आहे की, हे ज्ञान अनाधिकारी,
उन्मत्त, उद्धट शिष्यास देऊ नये. अधिकारी,
नम्र, विनयशील साधकाला हे ज्ञान द्यावे.
- "प्रश्नोपनिषत्
" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद
सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम
आवृत्ति, एप्रिल २०१२
- Reference: "Prashanopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2012
- Reference: "Prashanopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2012
-
हरी ॐ –
No comments:
Post a Comment