Tuesday, February 5, 2019

आत्मज्ञानाची आवश्यकता | Necessity of Self-Realization
सर्व संसारसागरामधून मुक्त व्हावयाचे असेल तर वरवरची दुःखे नाहीशी करून उपयोग नाही.  तर त्यासाठी संसारास कारण असणाऱ्या अध्यासाचा निरास केला पाहिजे.  अध्यासाचा निरास करावयाचा असेल तर अध्यासाला कारण असणाऱ्या स्वस्वरूपाच्या अज्ञानाचा निरास केला पाहिजे आणि अज्ञानाचा निरास करण्यासाठी अज्ञानाच्या विरोधी घटक पाहिजे.  तमः प्रकाशवत् इति |  

जसे, अंधाराचा निरास करावयाचा असेल तर अंधाराच्या विरोधी असणाऱ्या घटकाची म्हणजेच प्रकाशाची आवश्यकता आहे.  प्रकाशाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही साधनाने अंधार नाहीसा होत नाही.  तसेच, संसाराच्या निवृत्तीसाठी म्हणजेच अध्यासाच्या-अज्ञानाच्या निवृत्तीसाठी अज्ञानाच्या विरोधी असणारे ज्ञान हेच एकमेव साधन आहे.  ज्ञानाव्यतिरिक्त अन्य कोणतेही साधन नाही.  

संसारनिवृत्ति होण्यासाठी जीवब्रह्मैक्यज्ञानाशिवाय अन्य कोणताही मार्ग नाही.  याचे कारण  जीवब्रह्मैक्यज्ञानामध्येच अध्यासाची पूर्णतः निवृत्ति होते.  कर्तृकारकादि प्रत्यय निरास होतात.  कर्तृत्व-भोक्तृत्व बुद्धि संपते.  ब्रह्मज्ञानी पुरुष पाहणे, ऐकणे, स्पर्श करणे, वास घेणे, खाणे, जाणे, झोपणे, बोलणे, त्याग करणे, ग्रहण करणे, पापण्यांची उघडझाप करणे या शरीराच्या सर्व क्रिया चालू असताना इंद्रीयेच त्यांच्या त्यांच्या स्वव्यापारामध्ये प्रवृत्त झालेली असून ‘मी’ मात्र काहीही करत नाही, हे निःसंशयपणे जाणतो.  

‘मी’ शरीर-इंद्रिये-प्राण-मन-बुद्धि-चित्त-अहंकार-अज्ञान नाही.  ‘मी’ कोणत्याही कर्माचा कर्ता नाही.  ‘मी’ कोणत्याही कर्मफळाचा भोक्ता नाही.  शरीर शरीराचे काम करते.  ‘मी’ मात्र या सर्वांच्यापासून अलिप्त, अस्पर्शित, अपरिणामी, अविकारी स्वरूप आहे.  मला कोणतीही सुखदुःखे, विकार स्पर्श करीत नाहीत.  ‘मी’ सुखी-दुःखी, संसारी, मर्त्य नाही.  तर ‘मी’ स्वतःच आनंदस्वरूप, चैतन्यस्वरूप, शांतस्वरूप आहे.  हीच खरी स्वस्वरूपाची, सहजस्वाभाविक, निरतिशय सुखाची स्थिति आहे.  यालाच ‘मोक्षावस्था’ असे म्हणतात.  ही अवस्था फक्त आत्मज्ञानानेच प्राप्त होते.  


- "कठोपनिषत् " या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति,  मे २०११ 
- Reference: "
Kathopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2011- हरी ॐ

No comments:

Post a Comment