प्रत्येक
साधकाने स्वतःच स्वतःचा उद्धार करून घ्यावा. स्वतःची तीव्र जिज्ञासा, तळमळ असल्याशिवाय
उद्धार होणे शक्य नाही. म्हणून स्वतःचा
उद्धार करण्यासाठी आपले स्वतःचे योग्य-अनुकूल मन हेच साधन आहे. यासाठी आचार्य येथे सुंदर दृष्टांत देतात –
ज्याप्रमाणे
एखादा पुरुष ज्वर वगैरेदि एखाद्या महारोगाने व्याधिग्रस्त झाला तर तो स्वतःच
स्वतःच्या प्रयत्नाने रोगमुक्त होतो. वैद्य
तपासतील, रोगाचे निदान करतील, त्यावर योग्य औषधे देतील, पथ्य सांगतील. परंतु या
सर्वांचे यथायोग्य अनुसरण हे रोग्यानेच केले पाहिजे. अन्य प्रिय व्यक्तीने जरी पथ्य पाळले तरी
रोग्याचा रोग बरा होत नाही. फार तर लोक
सहकार्य करतील, सेवा-शुश्रुषा करतील, उत्तेजन देवून मनोधैर्य वाढवतील, परंतु औषध
आणि पथ्य हे रोग्यानेच घेतले पाहिजे. जे
आपल्याला योग्य-अनुकूल आहे त्याचेच ग्रहण करून इतर प्रतिकूल गोष्टींचा जाणीवपूर्वक
त्याग केला पाहिजे.
तसेच
औषध अत्यंत श्रद्धेने, माझा रोग निश्चित बरा होईल या विश्वासाने घेतली पाहिजेत. जे वैद्य आपल्यावर उपचार करून मार्गदर्शन करतात,
त्यांच्यावरही श्रद्धा पाहिजे. तसेच निराश,
दुःखी, उतावीळ न होता रोग बरा होईपर्यंत सातत्याने औषधांचे योग्य प्रमाणात योग्य
वेळी वैद्यांनी सांगितल्याप्रमाणेच सेवन केले पाहिजे. या सर्व गोष्टी काटेकोरपणे पाळल्यास त्या रोगावर
नियंत्रण करता येते.
त्याचप्रमाणे,
जीव या भवरोगाने ग्रस्त झालेला आहे. अनादिकाळापासून जीवाला या रोगाची बाधा झालेली
आहे. भयंकर यातना, असह्य वेदना होत
असल्यामुळे हा रोगग्रस्त जीव अत्यंत त्रस्त झालेला आहे. जीवनामधील अनेक प्रसंग, संघर्ष, सुखदुःखांचे
आघात त्याच्या मनावर होत आहेत. या
भयंकर दुःखामधून, या भवरोगामधून मुक्त व्हावयाचे असेल तर प्रथम अपथ्याचा, म्हणजे
सर्व अंतरिक दुर्गुण, आसुरीगुणसंपत्ति, यांचा त्याग केला पाहिजे. प्रतिकूल गोष्टी टाळण्याचा जाणीवपूर्वक अभ्यास
केला पाहिजे.
- "श्रीमद्
भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द
सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, डिसेंबर २००२
- Reference: "Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, December 2002
- Reference: "Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, December 2002
-
हरी ॐ –