Monday, September 24, 2018

सोनेरी तारुण्यावस्थेची दुर्दश | Plight of Golden Youth




तारुण्यावस्थेमध्ये इंद्रिय भोगांसाठी वखवखलेली असतात.  मनुष्य विषयलंपट, स्त्रीलंपट होतो.  पुरुष स्त्रीमध्ये तर स्त्री पुरुषामध्ये आसक्त होते.  एकमेकांच्याशिवाय ते एक दिवसही जगू शकत नाहीत.  त्यांचे मन, शरीर अत्यंत व्याकूळ व अस्वस्थ होते.  रात्रंदिवस भोग घेणे, हेच त्यांचे जीवन बनते.  

याप्रमाणे
- खाणे, पिणे, मजा करणे, टि. व्ही. पाहणे, हॉटेलमध्ये जाणे,
- नको-नको त्या पदार्थांचे व मादक द्रव्यांचे सेवन करणे,
- समोर भोग्य पदार्थ, सुंदर-आकर्षक वस्तु दिसली की, मागचा-पुढचा विचार न करता ती खरेदी करणे,
- मित्र-मैत्रिणींबरोबर दिवस-रात्र बाहेर थांबणे,
- मोबाईलवर तासनतास बोलणे,
- घरी आल्यावर येथेच्छ अथकपणे टि. व्ही. वरच्या सिरीअल पाहणे,
- नृत्य-गाणी, डान्स अशा गोष्टी करीत राहणे,
- पाश्चिमात्य मुलांच्याप्रमाणे फ्रेंड सर्कल निर्माण करणे,
- अश्लील हास्यविनोद करणे,
- तमोगुण अनावर होऊन झोपून राहणे,
- वडिलधाऱ्या मंडळींचा छोटाही सल्ला न ऐकणे,
असे एक नव्हे, दोन नव्हे, अनंत प्रकारचे अपराध करून स्वैरपणे तरुण पिढी अधःपतित होताना दिसते.  

याचे कारण तरुण पिढीसमोर निश्चित ध्येय नाही, आदर्श नाही, दिशा नाही व धर्माधार्माचे व जीवनाचे सम्यक् ज्ञान नाही.  कामनेने धुंद होऊन स्वैर, उच्छृंखल उपभोग घेता-घेता तारुण्य केव्हा संपले व आपण केव्हा ज्येष्ठ नागरिक झालो, हेही मनुष्याला समजत नाही.  

  
- "भज गोविंदम् |” या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २०१५   
- Reference: "
Bhaj Govindam" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2015




- हरी ॐ





Tuesday, September 11, 2018

जीवनातील व्यर्थता | Wasted Life




बालस्तावत्क्रीडासक्तः तरुणस्तावत्तरुणीसक्तः |
वृद्धस्तावच्चिन्तासक्तः परमे ब्रह्मणि कोSपि न सक्तः  (भज गोविन्दम् || ७ ||)
  
प्रथम मनुष्याचे आयुष्य अल्प आहे.  त्यामध्येही बाल्य, तारुण्य व वृद्धावस्था या तीन अवस्था आहेत.  बाल्यावस्थेमध्ये मनुष्य खेळण्यात, तारुण्यावस्थेमध्ये इंद्रियभोगांच्यामध्ये तर वृद्धावस्थेमध्ये मनुष्य नाना प्रकारच्या चिंतांच्यामध्येच रममाण होतो.  हेच त्याचे जीवन आहे.  हे जणु काही प्रत्येक मनुष्याचे आत्मचरित्रच आहे.  या तीनही अवस्थांच्यामध्ये कोणताही मनुष्य सुखी – आनंदी नसतो.  त्याला कधीच शांति मिळत नाही.  लहानपणापासून अनेक विषयांकडे मनुष्य आकर्षित होतो.  वृद्धावस्था आली तरी आकर्षण संपत नाही.  फक्त आकर्षणाचे विषय बदलत राहतात.  व्यक्ति बदलत राहतात.  

जीवनभर सर्व विषय व भोग भोगून माणसाचे मन मात्र सतत अतृप्त, अशांत, अस्वस्थ व निराशच राहते.  तारुण्यावस्थेमध्ये पाहिलेली सर्व स्वप्ने धुळीस मिळतात.  मनुष्य स्वतःच्या कामना पूर्ण करण्यासाठी आयुष्यभर झगडतो.  परिश्रम करतो.  संघर्ष करतो.  तोपर्यंत त्याच्या जीवनाची संध्याकाळ येते.  वृद्धावस्था येते.  तोपर्यंत कदाचित मनुष्याच्या इच्छा, आकांक्षा काही प्रमाणात पूर्ण होतात.  बहिरंगाने सुख, सोयी, सुविधा, विषय, भोग सर्वकाही मिळते.  परंतु अंतरंगामध्ये मात्र शांति मिळत नाही.  शुद्ध आनंद मिळत नाही.  

म्हणूनच आचार्य सांगतात की, हे मनुष्या !  तू वृद्धावस्थेमध्ये तरी थोडासा विचार कर.  अंतर्मुख हो.  आत्तापर्यंतचे आयुष्य तर व्यर्थ गेलेच.  परंतु निदान आता तरी आंतरिक शांतीचा शोध घे.  जगी सर्व सुखी असा कोण आहे | विचारी मना तूचि शोधोनि पाहे ||  खरोखरच सुख कोठे आहे ?  सुख किंवा आनंद विश्वामध्ये, विषयांच्यामध्ये किंवा भोगांच्यामध्ये नाही.  तर आनंद हे परमेश्वराचे स्वरूप आहे.  परमेश्वर हाच आनंदाचा, शांतीचा सागर आहे.  परमेश्वर हेच सर्व सुखाचे आगर आहे.  अशा परमेश्वरालाच तू अनन्यभावाने शरण जा.  भज गोविन्दं भज गोविन्दं गोविन्दं भज मूढमते |


  
- "भज गोविंदम् |” या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २०१५   
- Reference: "
Bhaj Govindam" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2015




- हरी ॐ


Tuesday, September 4, 2018

जीवनाची महायात्रा | Life as a Journey



मनुष्याचे जीवन म्हणजे एक महायात्रा आहे.  मनुष्य हा एक यात्रेकरू, प्रवासी आहे.  जसे आपण रेल्वे ने प्रवास करतो.  प्रथम रिझर्वेशन करतो.  प्लॅटफॉर्मवर उभे असतो.  गाडी आली की, आपली आरक्षित जागा शोधतो.  आपल्या आसनावर बसतो.  दुसरीकडून दुसरा माणूस येतो.  तोही त्याची जागा शोधून जागेवर बसतो.  सर्वजण आपापले सामान व्यवस्थित लावून घेतात.  थोडी वादावादी पण होते.  थोड्या वेळाने सर्व स्थिरस्थावर होते.  गाडी चालू होते.  

आपल्या गन्तव्य स्थानाच्या दिशेने गाडी भरधाव धावू लागते.  मग सर्वजण आपापसात गप्पा मारायला लागतात. तुम्ही कुठून आलात ?  कुठे चाललात ?  कुठे राहता ?  नाव-गाव वगैरे चौकशा होतात.  थोडीशी ओळख होते.  थोडासा स्नेह निर्माण होतो.  एकत्र चहा-पान होते.  जेवण होते.  आपापले स्टेशन जवळ यायला लागले की, मनुष्य पॅकिंग करतो.  आपला स्टॅाप आला की, आपण सर्वांचा निरोप घेऊन निघूनही जातो.  हीच यात्रा आहे.  

मनुष्याने यात्रेप्रमाणेच आपले प्रत्यक्ष जीवनही जगले पाहिजे.  बहिरंगाने सर्व व्यवहार करावा.  आपली कर्तव्ये पार पाडावीत.  सर्वांशी प्रेमाने, न्यायाने वागावे.  श्रेष्ठ आचारधर्मांचे पालन करावे.  धर्माला अनुसरून अर्थकामाची प्राप्ति करावी.  मात्र मनाने कुठे गुंतू नये.  मनाने सर्व विषयांच्यापासून, भोगांच्यापासून, माणसांच्यापासून अलिप्त, असंग राहावे.  तिथे ममत्व व आसक्ति निर्माण करू नये.  प्रेमच करायचे असेल, आसक्तच व्हायचे असेल तर मर्त्य शरीरामध्ये आसक्त होण्यापेक्षा परमेश्वरामध्ये नितांत श्रद्धा ठेऊन ईश्वरपारायण जीवन जगावे.  मनुष्याने आपल्या मनावर बाह्य कोणत्याही गोष्टींचा परिणाम होऊ देऊ नये.  सर्व प्रसंगांच्यामध्ये मन संतुलित, शांत ठेवावे.  आपला स्वतःचा मृत्यु समोर दिसला तरी आपले शरीर आनंदाने मृत्यूला समर्पित करावे.  

“ आचार्य किंवा वेदांती लोक जीवनाकडे नकारात्मक दृष्टीने पाहतात.  हे ऐकून लोक निराशावादी होऊन अधिक दुःखी होतील. ” – असा कोणी आक्षेप घेईल तर हा आक्षेप किंवा शंका अयोग्य आहे, कारण इथे आचार्यांनी जीवनाचा नकारात्मक दृष्टिकोन दिलेला नाही.  तर जीवनाचे वास्तव, सत्य वस्तुस्थिति सांगितलेली आहे.  जीवनाचे हे खरे स्वरूप जाणून जर मनुष्य जीवन जगेल तर मनुष्याला सामोरे जाण्याची एक शक्ति, प्रेरणा व स्फूर्ति मिळेल.  
  
- "भज गोविंदम् |” या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २०१५   
- Reference: "
Bhaj Govindam" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2015


- हरी ॐ