Tuesday, September 4, 2018

जीवनाची महायात्रा | Life as a Journeyमनुष्याचे जीवन म्हणजे एक महायात्रा आहे.  मनुष्य हा एक यात्रेकरू, प्रवासी आहे.  जसे आपण रेल्वे ने प्रवास करतो.  प्रथम रिझर्वेशन करतो.  प्लॅटफॉर्मवर उभे असतो.  गाडी आली की, आपली आरक्षित जागा शोधतो.  आपल्या आसनावर बसतो.  दुसरीकडून दुसरा माणूस येतो.  तोही त्याची जागा शोधून जागेवर बसतो.  सर्वजण आपापले सामान व्यवस्थित लावून घेतात.  थोडी वादावादी पण होते.  थोड्या वेळाने सर्व स्थिरस्थावर होते.  गाडी चालू होते.  

आपल्या गन्तव्य स्थानाच्या दिशेने गाडी भरधाव धावू लागते.  मग सर्वजण आपापसात गप्पा मारायला लागतात. तुम्ही कुठून आलात ?  कुठे चाललात ?  कुठे राहता ?  नाव-गाव वगैरे चौकशा होतात.  थोडीशी ओळख होते.  थोडासा स्नेह निर्माण होतो.  एकत्र चहा-पान होते.  जेवण होते.  आपापले स्टेशन जवळ यायला लागले की, मनुष्य पॅकिंग करतो.  आपला स्टॅाप आला की, आपण सर्वांचा निरोप घेऊन निघूनही जातो.  हीच यात्रा आहे.  

मनुष्याने यात्रेप्रमाणेच आपले प्रत्यक्ष जीवनही जगले पाहिजे.  बहिरंगाने सर्व व्यवहार करावा.  आपली कर्तव्ये पार पाडावीत.  सर्वांशी प्रेमाने, न्यायाने वागावे.  श्रेष्ठ आचारधर्मांचे पालन करावे.  धर्माला अनुसरून अर्थकामाची प्राप्ति करावी.  मात्र मनाने कुठे गुंतू नये.  मनाने सर्व विषयांच्यापासून, भोगांच्यापासून, माणसांच्यापासून अलिप्त, असंग राहावे.  तिथे ममत्व व आसक्ति निर्माण करू नये.  प्रेमच करायचे असेल, आसक्तच व्हायचे असेल तर मर्त्य शरीरामध्ये आसक्त होण्यापेक्षा परमेश्वरामध्ये नितांत श्रद्धा ठेऊन ईश्वरपारायण जीवन जगावे.  मनुष्याने आपल्या मनावर बाह्य कोणत्याही गोष्टींचा परिणाम होऊ देऊ नये.  सर्व प्रसंगांच्यामध्ये मन संतुलित, शांत ठेवावे.  आपला स्वतःचा मृत्यु समोर दिसला तरी आपले शरीर आनंदाने मृत्यूला समर्पित करावे.  

“ आचार्य किंवा वेदांती लोक जीवनाकडे नकारात्मक दृष्टीने पाहतात.  हे ऐकून लोक निराशावादी होऊन अधिक दुःखी होतील. ” – असा कोणी आक्षेप घेईल तर हा आक्षेप किंवा शंका अयोग्य आहे, कारण इथे आचार्यांनी जीवनाचा नकारात्मक दृष्टिकोन दिलेला नाही.  तर जीवनाचे वास्तव, सत्य वस्तुस्थिति सांगितलेली आहे.  जीवनाचे हे खरे स्वरूप जाणून जर मनुष्य जीवन जगेल तर मनुष्याला सामोरे जाण्याची एक शक्ति, प्रेरणा व स्फूर्ति मिळेल.  
  
- "भज गोविंदम् |” या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २०१५   
- Reference: "
Bhaj Govindam" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2015


- हरी ॐ

No comments:

Post a Comment