Tuesday, September 11, 2018

जीवनातील व्यर्थता | Wasted Life




बालस्तावत्क्रीडासक्तः तरुणस्तावत्तरुणीसक्तः |
वृद्धस्तावच्चिन्तासक्तः परमे ब्रह्मणि कोSपि न सक्तः  (भज गोविन्दम् || ७ ||)
  
प्रथम मनुष्याचे आयुष्य अल्प आहे.  त्यामध्येही बाल्य, तारुण्य व वृद्धावस्था या तीन अवस्था आहेत.  बाल्यावस्थेमध्ये मनुष्य खेळण्यात, तारुण्यावस्थेमध्ये इंद्रियभोगांच्यामध्ये तर वृद्धावस्थेमध्ये मनुष्य नाना प्रकारच्या चिंतांच्यामध्येच रममाण होतो.  हेच त्याचे जीवन आहे.  हे जणु काही प्रत्येक मनुष्याचे आत्मचरित्रच आहे.  या तीनही अवस्थांच्यामध्ये कोणताही मनुष्य सुखी – आनंदी नसतो.  त्याला कधीच शांति मिळत नाही.  लहानपणापासून अनेक विषयांकडे मनुष्य आकर्षित होतो.  वृद्धावस्था आली तरी आकर्षण संपत नाही.  फक्त आकर्षणाचे विषय बदलत राहतात.  व्यक्ति बदलत राहतात.  

जीवनभर सर्व विषय व भोग भोगून माणसाचे मन मात्र सतत अतृप्त, अशांत, अस्वस्थ व निराशच राहते.  तारुण्यावस्थेमध्ये पाहिलेली सर्व स्वप्ने धुळीस मिळतात.  मनुष्य स्वतःच्या कामना पूर्ण करण्यासाठी आयुष्यभर झगडतो.  परिश्रम करतो.  संघर्ष करतो.  तोपर्यंत त्याच्या जीवनाची संध्याकाळ येते.  वृद्धावस्था येते.  तोपर्यंत कदाचित मनुष्याच्या इच्छा, आकांक्षा काही प्रमाणात पूर्ण होतात.  बहिरंगाने सुख, सोयी, सुविधा, विषय, भोग सर्वकाही मिळते.  परंतु अंतरंगामध्ये मात्र शांति मिळत नाही.  शुद्ध आनंद मिळत नाही.  

म्हणूनच आचार्य सांगतात की, हे मनुष्या !  तू वृद्धावस्थेमध्ये तरी थोडासा विचार कर.  अंतर्मुख हो.  आत्तापर्यंतचे आयुष्य तर व्यर्थ गेलेच.  परंतु निदान आता तरी आंतरिक शांतीचा शोध घे.  जगी सर्व सुखी असा कोण आहे | विचारी मना तूचि शोधोनि पाहे ||  खरोखरच सुख कोठे आहे ?  सुख किंवा आनंद विश्वामध्ये, विषयांच्यामध्ये किंवा भोगांच्यामध्ये नाही.  तर आनंद हे परमेश्वराचे स्वरूप आहे.  परमेश्वर हाच आनंदाचा, शांतीचा सागर आहे.  परमेश्वर हेच सर्व सुखाचे आगर आहे.  अशा परमेश्वरालाच तू अनन्यभावाने शरण जा.  भज गोविन्दं भज गोविन्दं गोविन्दं भज मूढमते |


  
- "भज गोविंदम् |” या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २०१५   
- Reference: "
Bhaj Govindam" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2015




- हरी ॐ


No comments:

Post a Comment