Tuesday, August 7, 2018

स्त्रीकडे पाहण्याची उदात्त दृष्टी | Perceiving a Woman


आचार्य आदेश देतात – हे मूढबुद्धि पुरुषा !  तू स्त्रियांच्या सौंदर्याला बळी पडू नकोस.  स्त्री हे सौंदर्याचे प्रतीक आहे.  परंतु बाहेरून कितीही सुंदर दिसले तरीही विवेकाने त्याची मीमांसा कर.  हे स्थूल शरीर म्हणजे अनेक कृमींचे, जंतूंचे संकुल आहे.  स्वभावतःच शरीर हे दुर्गंधी, अशुद्ध व अनित्य आहे.  शरीराला कितीही अत्तर लावले अथवा स्प्रे मारले तरी थोड्या वेळाने ते पुन्हा दुर्गंधीयुक्त होते.  म्हणून तरी आपण सतत स्नान करून शरीर स्वच्छ ठेवतो.  तसेच, स्थूल शरीराची निर्मितीच अशौचामधून झालेली आहे व या शरीराचा सर्वात मोठा दोष म्हणजे ते अनित्य आहे.  इतकेच नव्हे तर शरीर म्हणजे मलमूत्र यांचा साठा आहे.  

ज्या शरीरावर आसक्त होऊन मनुष्य इंद्रियभोगांच्या आहारी जातो, वर्षानुवर्ष नव्हे जन्मानुजन्म कामुक, भोगलंपट, स्त्रीलंपट होऊन स्वैर उपभोग घेतो, त्या मनुष्याने शरीराचे खरे स्वरूप जाणावे.  जीवनाचे वास्तव जाणावे.  स्त्रीचा उपभोग घेणे हेच जीवन नाही.  मूढ, अज्ञानी व कामुक लोकच स्त्रीमध्ये आसक्त होतात.  स्त्रीवेड्या लोकांच्यामधील पौरुषत्व, पुरुषार्थ क्षीण होत जातो.  

यासाठी स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे.  स्त्री ही समाजातील, विश्वामधील एक अत्यंत महत्वाचा घटक आहे.  स्त्री ही अबला नाही.  स्त्री ही भोग्य किंवा शोभेची वस्तु नाही.  तर स्त्री हे शक्तीचे प्रतीक आहे.  स्त्रीमध्येच निर्माणशक्ति, धारणाशक्ति व संहारशक्ति आहे.  स्त्री हे तर आदिमायाशक्तीचे, जगज्जननीचे रूप आहे.  स्त्री ही मातृरूप आहे.  स्वतःच्या स्त्रीशिवाय विश्वामधील अन्य सर्व स्त्रिया म्हणजे आपल्या माता आहेत.  म्हणून ‘स्त्री’ हे स्थान सर्वांना वंदनीय, अत्यंत पवित्र व मातृतुल्य आहे.  

स्त्रीकडे पाहण्याची ही उदात्त दृष्टि ठेवली तर आपोआपच मनामधील सर्व काम-लोभ-मोह-कामुकता-भोगलालसा या वृत्ति गळून पडतात. मन मोहवश होत नाही.  विवेकामधुनच अन्तःकरणामध्ये वैराग्यवृत्ति उदयाला येते.  विवेकजन्य वैराग्यच खरे वैराग्य असून ते दीर्घकाळ टिकते.  ही विरक्तवृत्ति मनुष्याला वाममार्गापासून, दुराचारापासून, व्यभिचारापासून निवृत्त करते.  त्यामुळे मनुष्याचे जीवन अंतर्बाह्य शुद्ध होते.  याच मनामध्ये शांतीचा, शुद्ध आनंदाचा अनुभव येतो. 


- "भज गोविंदम् |” या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २०१५   
- Reference: "
Bhaj Govindam" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2015


हरी ॐ –

   

No comments:

Post a Comment