Tuesday, August 14, 2018

मनुष्यजीवन आणि कमलपत्र | Human Life and Lotus Leaf
आचार्यांनी सुंदर दृष्टान्त दिला आहे.  कमळाचे फूल उगवले आहे.  त्या कमळाच्या पाकळीवर पाण्याचा एक थेंब आहे.  तो थेंब जेव्हा आपण दुरून पाहतो तेव्हा तो अतिशय सुंदर चकाकतो.  परंतु क्षणात एक वाऱ्याची छोटीशी झुळूक आली तरी तो थेंब खाली पडतो.  त्या थेंबाचे अस्तित्व इतके क्षणिक, अस्थिर व क्षणभंगुर आहे.  तसेच, त्या पाण्याच्या थेंबाला पाकळी – पान हे अधिष्ठान असते.  त्याचप्रमाणे आपले हे मानवी जीवन आहे. हे जीवन आपल्याला दिसताना अतिशय सुंदर दिसते.  विश्वामध्ये मनुष्याप्रमाणेच अनेक प्राणिमात्र आहेत.  परंतु त्या सर्वांच्यामध्ये मनुष्यजीवन हेच अतिशय श्रेष्ठ आहे, कारण फक्त मनुष्यामध्येच विवेकशक्ति आहे.  या सदसद्विवेकबुद्धीमुळे मनुष्यजीवनाला खऱ्या अर्थाने सौंदर्य प्राप्त झालेले आहे.  

मनुष्याजवळ अहर्निश विवेक जागृत असेल तर तो केवळ आकाशालाच गवसणी घालतो, असे नाही तर आकाशाच्याही अतीत, दृश्य विश्वाच्या अतीत, शरीराच्या अतीत असणाऱ्या शाश्वत, चिरंतन तत्त्वाची तो प्राप्ति करून घेतो.  म्हणूनच मनुष्याचे जीवन अत्यंत सुंदर व दुर्मिळ आहे.  हे सौंदर्य बहिरंगाचे नसून अंतरंगाचे, विवेकाचे सौंदर्य आहे.  मात्र असे असूनही मनुष्यजीवन दुसऱ्या बाजूला अत्यंत गतिमान, नदीच्या वेगवान प्रवाहाप्रमाणे अखंडपणे प्रवाहीत आहे.  एकेका क्षणाबरोबर, काळाच्या गतीबरोबर आपले जीवनही सतत पुढेपुढेच जात राहते.  काळच पाहता-पाहता अनपेक्षितपणाने कोणत्याही क्षणाला आपले अस्तित्व नष्ट करतो.  याचा विचार करायला पाहिजे.  

असे हे जीवन कमलपत्रावरील पाण्याच्या थेंबाप्रमाणे अतितरल, अतिचंचल, गतिमान, क्षणभंगुर तर आहेच.  याशिवाय आचार्य आणखी वर्णन करतात – मनुष्याचे शरीर अनेक भयंकर व्याधींनी ग्रस्त आहे व त्याचे अंतरंग अहंकार, ममकार, दंभ, दर्प, असूया, स्वार्थ, क्षोभ, संताप, चिंता, द्वेष, मत्सरादि विकारांनी ग्रस्त झालेले आहे.  जीवनाचे क्षणिकत्व समजावून घ्यावे व जेवढे काही आयुष्य मिळाले आहे, त्याचा सदुपयोग करून घ्यावा.  विकारांच्या आहारी जाऊन स्वतःच स्वतःचा नाश करवून घेण्यापेक्षा आपले जीवन उन्नत करण्याचा प्रयत्न करावा.  त्यासाठीच परमेश्वराला शरण जावे.  भज गोविन्दं भज गोविन्दं गोविन्दं भज मूढमते |  असे आचार्य इथे सांगतात.  


  
- "भज गोविंदम् |” या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २०१५   
- Reference: "
Bhaj Govindam" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2015
- हरी ॐ

No comments:

Post a Comment