Saturday, August 25, 2018

जीवनाच्या नाटकातून सुटका | Going Beyond ‘Play’ of Life



आपले जीवन हे एखाद्या नाटकाप्रमाणे आहे.  नाटकामध्ये अनेक प्रात्र असतात.  अनेक प्रकारचे प्रसंग असतात.  प्रत्येक पात्र आपली भूमिका चोख बजावते.  भूमिका संपली की, ते पात्र स्टेजवरून निघूनही जाते.  तसेच, जीवन ही एक रंगभूमी असून तिथे अखंडपणे हे नाटक म्हणजेच हा सर्व व्यवहार, प्रसंग चाललेले आहेत.  सर्वच नाटकी व कृत्रिम आहे.  पैशासाठी, ऐश्वर्यासाठी स्वार्थाने हपापलेली माणसे आपल्याजवळ काही काळ येतात व स्वार्थ पूर्ण झाला की, निघून जातात.  आपला त्याग करतात.

म्हणून मनुष्याने जीवनात मनाने दुसऱ्यावर अवलंबून राहू नये.  माणसांनी आपला त्याग करण्याआधी आपणच त्यांच्यामधील आसक्तीचा, ममत्वाचा मनाने त्याग करावा.  त्यातच खरा आनंद आहे.  काळाची पावले ओळखावीत.  जीवनात सतत सावध राहावे.  परमेश्वरालाच अनन्य भावाने शरण जावे.  हाच एकमात्र उपाय आहे.  
 ज्याप्रमाणे एखादी मारकी उधळलेली गाय असेल तर आपण तिला दाव्याने बांधतो व दाव्याची दोरी एका घट्ट खुंटीला बांधतो.  त्याचप्रमाणे आज आपले मन चंचल, अस्थिर, अस्वस्थ, असुरक्षिततेच्या भावनेने युक्त आहे.  ते मन आपल्याला शांत बसू देत नाही.  या मनाला शांत करण्यासाठी स्थिर खुंटी पाहिजे.  ती स्थिर खुंटी म्हणजेच परमेश्वर होय.  परमेश्वर हाच विश्वाचे व माझ्याही जीवनाचे अधिष्ठान आहे.  या परमेश्वरामध्ये मन समर्पित करावे.  परमेश्वराविषयी अन्तःकरणामध्ये भक्तीचा शुद्ध भाव निर्माण झाला की, आपोआपच मन शांत होते.  परमेश्वराचीच काया-वाचा-मनसा सेवा करावी.  हे करीत असताना बहिरंगाने व्यावहारिक जीवन एखाद्या नाटकाप्रमाणे जगावे.  आपली भूमिका, कर्तव्ये पार पाडावीत.  एकटे जगण्यासाठी मनाची तयारी करावी.  मन ईश्वराच्या स्मरणामध्येच तल्लीन, तन्मय व तद्रूप करावे.  

यामुळे कोणत्याही प्रसंगाने मन व्यथित होणार नाही.  समोर मृत्यु जरी दिसला तरी आपण आनंदाने सामोरे जाऊ शकू.  अशी मानसिकता, शक्ति व सामर्थ्य केवळ ईश्वराच्याच उपासनेने प्राप्त होते.  म्हणुनच आचार्य आदेश देतात - भज गोविन्दं भज गोविन्दं गोविन्दं भज मूढमते |   


- "भज गोविंदम् |” या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २०१५   
- Reference: "
Bhaj Govindam" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2015



- हरी ॐ

No comments:

Post a Comment